प्रदर्शने

मोफत अभ्यास दौरे

प्रत्येक आठवडाअखेरीस संग्रहालयाच्या
अभिरक्षकांकडून संग्रहालयाची माहिती मिळवा

शनिवार
सकाळी ११.३० वा इंग्रजीतून
दुपारी १२.३० वा मराठी/हिंदी भाषेतून
सर्वांसाठी खुले.

महादेव विश्वनाथ धुरंधर (१८६७ -१९४४)

चित्रमय इतिवृत्त

१९ ऑगस्ट - १ऑक्टोबर २०१८

वसाहतकालीन भारतात वेगानं घडत असलेल्या बदलांचे महादेव विश्वनाथ धुरंधर (१८६७ -१९४४) हे साक्षीदार होते. सदर काळातील मानवीय विषयविश्वाचं खुसखुशीत दस्ताऐवजीकरण त्यांच्या लेखी असलेली कुशाग्र निरीक्षण शक्ती आणि खोलवर रुजलेल्या सांस्कृतिक संवेदनांनी केलं. नेमक्या दृष्य प्रतिमांकनाचा, संदर्भ आणि शैलीचा आधार घेत, त्यांच्या कलाकृती भारताचं वेगळेपण एतद्देशीय दृष्टिकोनातून साकारलेलं चित्रण रेखाटतात.

धुरंधरांनी मुंबईतील सर ज. जी. कलामहाविद्यालयात शिक्षण घेतलं आणि तेथेच पुढे त्यांनी मुख्याध्यापक पदाचा कार्यभारही सांभाळला. त्यांच्या युरोपिअन यथार्थदर्शन शैलीत केलेल्या रेखांकनातील कौशल्याकरीता त्यांना अनेक पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आलं. त्याकाळातील इतर अनेक कलाकारांप्रमाणे, त्यांनीही सौंदर्याविषयीच्या वसाहतकालीन प्रमाणांतून मार्ग काढत अभिव्यक्तीची आपली एक स्वतंत्र शैली निर्माण केली (सावंत,१०४). ते ‘दस्ताऐवजीकरण तसंच यथार्थ दर्शनाच्या आखीव चौकटीत’ आणि पाश्चात्य संकल्पनांना प्रतिसाद म्हणून त्यांनी ‘नव्यानं ढुंढाळलेल्या एत्तदेशीय भारतीय यथार्थदर्शनाच्या शैलीत’, काळात बंदिस्त करण्यापल्याडच्या घटिकांच्या त्यांनी केलेल्या चित्रणासाठी ओळखले जातात (जैन,१४५). एकोणिसाव्या शतकाच्या उत्तरार्धात आणि विसाव्या शतकाच्या पूर्वार्धात, आधुनिक संकल्पनानुसार कलाकाराची प्रतिमा ही रम्य सृष्टीत वावरणाऱ्या भवतालच्या जगाशी फारकत घेतलेल्या व्यक्ती अशी ठसलेली होती, असा उल्लेख ख्यातनाम कलाइतिहासतज्ञ पार्था मित्तर करतात (मित्तर,८६). धुरंदरांची कलासाधना ह्या रुढ प्रतिमेला छेद देते. त्यांच्या कलाकृती, ज्या अनेकदा काळाची क्षणचित्रे मानली जातात, त्या कलाकृती विसाव्या शतकात प्रमाणबद्ध मानल्या जाणाऱ्या यथार्थदर्शी शिक्षणप्रणालीशी बांधिलकी सांगतात. धुरंधर ह्या प्रयोगशील कलावंताने आपल्या उभ्या आयुष्यात ज्या विविध कलासाधनांचा, विषयांचा आणि संकल्पनांचा अभ्यास केला त्यांचा हे प्रदर्शन आढावा घेण्याचा प्रयत्न करते.

आपल्या समकालीनांपासून फारकत घेणारी धुरंदरांची रेखाचित्रं मार्मिक जागतिक दृष्टिकोन मांडतात. त्यांच्या कलाकृती त्यामुळेच केवळ दस्ताऐवज न राहता ते नाटय़मय वर्तमानाचा तोल राखणारे दुवे बनतात. विसाव्या शतकाच्या उत्तरार्धात, मुंबईमध्ये मराठी आणि पारसी नाटय़सृष्टी तसंच स्टुडिओ फोटोग्राफी भरभराटीला आली होती. धुरंदर ह्यांचे तेव्हाचे आघाडीचे नाटय़ाभिनेते बालगंधर्व ह्यांच्याशीही सौहाद्राचे संबंध राहिले, ते त्यांच्या स्टुडिओलाही अनेकदा भेट देत असत (धुरंदर,४३). नाटकांचा त्यांच्या कलाकृतींवरील प्रभाव त्यांच्या कलाकृतींच्या शृखंलांतील व्यक्तिरेखांच्या देहबोलीतून आणि चेहऱ्यावरिल हावभावांतून प्रतित होतो. त्यांच्या चित्रांतील सचेतनता त्यांनी केलेल्या रेखांकनाना शास्त्रीय प्रलेखन बनू देत नाही.

बदलत्या काळातील शहराच्या वाढत्या कक्षा मांडणारे कथाकार तसंच परंपरा, नीतीमूल्यं आणि आपल्या कलेप्रती नितांत निष्ठा बाळगणाऱ्या धुरंधरांची झलक सदर प्रदर्शन आपल्याला देतं. ‘कलामंदिरातील एक्केचाळीस वर्षे’ ह्या आपल्या आत्मचरित्रात तरुण कलावंतांना संदेश देताना धुरंधर म्हणतात,

“कलेची उपासना हे एक योगसाधन आहे, आणि ते साध्य करुन घेण्यासाठीं चित्रकाराने आपल्या आचरणांत नेहमी पवित्रता ठेवावी लागते. पवित्र आचरण ठेवल्याशिवाय कलोपासना यथायोग्य होणार नाहीं. म्हणून चित्रकलेत जर यशस्वी व्हावयाचे असेल, तर चित्रकाराने आपलें चरित्र शुद्ध ठेऊन भक्तीयुक्त अंतःकरणाने कलोपासना करावी म्हणजे कलेमध्ये प्रगति होईल. चित्रकाराने काढलेली चित्रे इतर चित्रकारांस पसंत होऊन सर्वसाधारण जनतेस ग्राह्य झाली म्हणजे त्याची प्रगति झाली असे समजावे.”

धुरंदर हे यथार्थदर्शी चित्रणात तरबेज होते, मात्र एक व्यक्ती म्हणून ते परंपरागत विचारांचे पाईक होते. आपल्या कलासाधनेप्रती त्यांची असलेली निष्ठा आणि आपण जिथून शिक्षण घेतलं त्या संस्थेला ते ‘मंदिर’ मानत. त्यामुळेच परंपरेची कास धरत ते आधुनिकतेचा विचार मांडतात!

संकल्पना हिमांशू कदम आणि तस्नीम झकारिया मेहता यांची

संदर्भसूचीः
अंबिका धुरंधर, माझी स्नरणचित्रे, ४३
महादेव विश्वनाथ धुरंधर, कलामंदिरातील एक्केचाळीस वर्षे
पार्था मित्तर, आर्ट ऍंड नॅशनलिझम्, ८६
कजरी जैन, गॉडस् इन् बझारः द इकोनॉमिक्स ऑफ इंडियन कॅलेंजर आर्ट, १४५
शुक्ला सावंत, पी.एच्.डी.साठी प्रस्तावित अप्रकाशित शोधनिबंध, १०४