संग्रहालयाबद्दल थोडक्यात

मोफत अभ्यास दौरे

प्रत्येक आठवडाअखेरीस संग्रहालयाच्या
अभिरक्षकांकडून संग्रहालयाची माहिती मिळवा

शनिवार
सकाळी ११.३० वा इंग्रजीतून
दुपारी १२.३० वा मराठी/हिंदी भाषेतून
सर्वांसाठी खुले.

संचालकांची टिपणी

प्रिय मित्रानो,

डॉ. भाऊ दाजी लाड संग्रहालयाचा आपणास परिचय करून देताना आम्हाला अतिशय आनंद होतोय. एकोणिसाव्या शतकात व्हिक्टोरिया आणि अल्बर्ट संग्रहालयाची स्थापना झाल्यापासून आजतागायत संग्रहालय जसेच्या तसे अस्तित्वात आहे. हे संग्रहालयांबद्दलचे संग्रहालय आहे. इथे आपल्याला संग्रहालयांच्या स्थापनेचा आणि संग्रहमांडणीचा इतिहास जाणता येतो, आणि प्रारंभीच्या काळातील त्यांचा उद्देश्य व आकांक्षा काय होत्या ह्याची माहिती मिळते. जमनालाल बजाज प्रतिष्ठान व बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या संयुक्त विद्यमाने इनटॅकने नोव्हेंबर २०१२ साली पूर्ण केलेल्या पुनरुत्थान प्रकल्पात संग्रहालयाचे मूळ स्वरूप कायम राखण्याचा सर्वतोपरी प्रयत्न करण्यात आला; त्याचबरोबर संग्रहालयाचा दर्जा व कारभार उत्तम चालवण्याच्या हेतूने अत्याधुनिक संयोजन, तंत्रज्ञान व अद्ययावत सुविधाही पुरवण्यात आल्या.

अद्वितीय वास्तुशिल्प आणि नेत्रदीपक सौंदर्याच्याबरोबरीने, येथील संग्रह विलक्षण भारतीय कारागिरी व पूर्व आधुनिक कलाकरांच्या प्रतिभेचे सूक्ष्म दर्शन घडवतो. येथील मुंबई शहराविषयीची माहिती देणारं दालन अतिशय रंजक असून अभ्यागतांना एकोणिसाव्या शतकातील मुंबईतील देखावे व मातीच्या प्रतिकृतींद्वारे जुन्या मुंबईचं वास्तव दाखवते. कलावस्तुंचे हे नमुने हीच संग्रहालयाची विशेषता आहे.

कमलनयन बजाज विशेष कलादालन आणि संग्रहालयाच्या मुख्य इमारतीत नामांकित कलाकारांना आमंत्रित करुन त्यांना संग्रहालय, मुंबई शहर आणि पुराभिलेखांना आपल्या कलाकृतींच्या माध्यमातून प्रतिसाद देण्यास विशेष प्रदर्शनांच्या मालिकेतून उद्युक्त केलं जातं. त्याचबरोबर विशेष प्रकल्प दालनात व संग्रहालयाच्या प्रांगणातदेखील छोटेखानी प्रदर्शने मांडली जातात. संग्रहालयात आंतरराष्ट्रीय संग्रहालये व संस्थांच्या सहयोगाने प्रदर्शनांचं आयोजन केलं जातं, ज्यात व्हिक्टोरिया आणि अल्बर्ट संग्रहालय, लंडन तसंच गुगेनहाईम संग्रहालय, न्यूयॉर्क इत्यादींचा समावेश होतो. संग्रहालयाने नेदरलँड्स, इटली, बेल्जियम, कॅनडासारख्या देशांचे दूतावास, तसंच ना-नफा तत्वावर काम करणाऱ्या अनेक सामाजिक सांस्कृतिक संघटना आणि स्विस आर्टस् कौन्सिल प्रो हेलवेशिया, पोलिश इन्टिट्यूट ऑफ न्यू दिल्ली आणि ॲलियान्स फ्रान्से सारख्या संस्थांच्या सहयोगाने वैविध्यपूर्ण कार्यक्रमांचं शहरात आयोजन केलं आहे. भारतीय कारागिरी व कलांच्या उन्नतीसाठी काम करणाऱ्या संस्थांना संग्रहालय मुक्त प्रवेश देते आणि प्रख्यात कारागीर आणि समकालीन कलाकार ह्या दोहोंबरोबर त्यांना प्रोत्साहन देण्यास व त्यांच्या कलाकृती प्रदर्शित करण्यास सहाय्य करते.

संग्रहालय शैक्षणिक कार्यक्रम राबवण्यासाठी महाविद्यालयात पदवी अभ्यासक्रम पूर्ण करत असलेल्या विद्यार्थांना इंटर्न व डोसेन्ट म्हणून नियुक्त करते. ते संग्रहाचं महत्व विशद करणारे माहिती दौरे, सार्वजनिक उपक्रम व कार्यशाळांच्या आयोजनात संग्रहालयातील कर्मचाऱ्यांना सहाय्य करतात. हे उपक्रम विविध वयोगटांकरिता राबविले जातात. संग्रहालय अनेक आंतरराष्ट्रीय शाळांबरोबर भागीदारी करण्यास उत्सुक असते, ज्यात विद्यार्थ्यांसाठी 'सृजनात्मकता, कार्यवाहकता, सेवा' ह्या मूल्यांवर आधारित स्वयंसेवक कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. ह्यात विद्यार्थ्यांना संग्रहालयासाठी कार्यपत्रके आणि इतर शैक्षणिक साहित्य निर्मितीची संधी मिळते. आमच्याकडे विस्तारित शैक्षणिक व लोकव्यापक कार्यक्रम आहेत जे बहुविध वयोगट आणि आवडींना अभिभाषित करतात.

आम्ही आपले संग्रहालयात स्वागत करण्यास उत्सुक आहोत

आपली विनम्र,
तसनीम झकारिया मेहता
व्यवस्थापकीय विश्वस्त व मानद संचालक