संग्रहालयाबद्दल थोडक्यात:

मोफत अभ्यास दौरे

प्रत्येक आठवडाअखेरीस संग्रहालयाच्या
अभिरक्षकांकडून संग्रहालयाची माहिती मिळवा

शनिवार
सकाळी ११.३० वा इंग्रजीतून
दुपारी १२.३० वा मराठी/हिंदी भाषेतून
सर्वांसाठी खुले.

संग्रहालयाबद्दल थोडक्यात:

डॉ. भाऊ दाजी लाड मुंबई शहर संग्रहालय ही बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या अखत्यारीत असलेली संस्था आहे. भारतात प्रथमच सांस्कृतिक संस्थेच्या व्यवस्थापनाकरिता सार्वजनिक-खाजगी स्वरूपाची भागीदारी येथे केल्याचं बघायला मिळतं. फेब्रुवारी २००३ मध्ये बृहन्मुंबई महानगरपालिका, जमनालाल बजाज प्रतिष्ठान आणि इनटॅक (इंडियन नॅशनल ट्रस्ट फॉर आर्ट अँड हेरिटेज) यांच्यात करार करण्यात आला.

ह्या संग्रहालयाची स्थापना व्हिक्टोरिया आणि अल्बर्ट संग्रहालय, बॉम्बे ह्या नावाने १८७२ साली झाली होती. मुंबईचे हे पहिलेच संग्रहालय, ललित व उपयोजित कलांच्या दुर्मिळ संग्रहातून मुंबई शहराचा सांस्कृतिक वारसा आणि इतिहास येथे प्रदर्शित गेला. ह्या संग्रहातून बॉम्बे प्रेसिडेंसीतील पूर्व आधुनिक कला तसेच विविध हस्तकला समुदाय आपल्याला बघावयास मिळतात. येथील स्थायी संग्रहात मातीचे लघु देखावे, कथानकं दर्शवणारे देखावे, नकाशे, लिथोग्राफ्स (पाषाणावरिल छापील चित्रे), छायाचित्रे आणि दुर्मिळ पुस्तके आहेत, जी मुंबईवासियांचे जीवन आणि शहराचा अठराव्या शतकाच्या उत्तरार्धापासून ते विसाव्या शतकाच्या पूर्वार्धापर्यंतच्या इतिहासाचे दस्तऐवजीकरण करतात.

काही काळ पडद्याआड गेलेले हे संग्रहालय पाच वर्षांच्या व्यापक संवर्धनानंतर नव्याने उभारले आणि संवर्धनाच्या ह्या प्रकल्पास २००५ साली युनेस्को (UNESCO) ने उत्कृष्ठ सांस्कृतिक संवर्धनासाठी गौरविले. २००८ साली एक भव्य प्रदर्शनाने ह्या संग्रहालयाच्या कामकाजास पुनःश्च सुरुवात झाली आणि आता हे समकालीन कला व संस्कृतीच्या प्रगतीकरिता मोठ्या प्रमाणावर काम करते.

ह्या संग्रहालयाने जगभरातील इतर संग्रहालयं आणि सांस्कृतिक संस्थांच्या सहयोगातून अनेक समकालीन कलाकारांची प्रदर्शने तसंच आंतरराष्ट्रीय प्रदर्शनांचं आयोजन केलं आहे, जी संग्रहालयातील स्थायी संग्रहाशी संबंधित असतील.

२०१२ च्या डिसेंबर मध्ये संग्रहालयाने म्युझियम प्लाझा ह्या प्रवाही सांस्कृतिक केंद्राची सुरुवात केली, जे सर्वांकरीता नवनवीन प्रयोग, मैदानी क्रिडा आणि कार्यशाळांसाठी खुले आहे. संग्रहालयाने उपयोगात नसलेल्या जागा पुनरूत्थित करून तेथे विशेष प्रकल्प दालन, उपहार गृह, भेट वस्तूंचे विक्री केंद्र आणि शैक्षणिक केंद्रांची मुहूर्तमेढ केली.