संग्रहालयाबद्दल थोडक्यात

मोफत अभ्यास दौरे

प्रत्येक आठवडाअखेरीस संग्रहालयाच्या
अभिरक्षकांकडून संग्रहालयाची माहिती मिळवा

शनिवार
सकाळी ११.३० वा इंग्रजीतून
दुपारी १२.३० वा मराठी/हिंदी भाषेतून
सर्वांसाठी खुले.

संग्रहालयाची गोष्ट

डॉ. भाऊ दाजी लाड संग्रहालय १८५७ साली सर्वांसाठी खुले झाले, मुंबईतील हे सर्वात जुने संग्रहालय. हे पूर्वीचे व्हिक्टोरिया आणि अल्बर्ट संग्रहालय. ह्या संग्रहालयाची इमारत शहरातील अतिशय महत्वपूर्ण ऐतिहासिक वास्तूंपैकी एक. ही पहिली औपचारिक इमारत जी संग्रहालयाची स्थापना करण्याच्या हेतूने बांधण्यात आली. मुंबई तेव्हा भारतातील अतिशय श्रीमंत व्यापारी शहर तसंच भारताच्या पूर्वेचे प्रवेशद्वार मानले जाई; भारतातील हे पहिले शहर ज्याला जगासमोर समृद्ध भारतीय संस्कृती व परंपरा प्रदर्शित करण्याचा मान मिळाला.

जवळ जवळ एका शतकानंतर, १ नोव्हेंबर १९७५ साली, संग्रहालयाचं नव्यानं डॉ. भाऊ दाजी लाड संग्रहालय म्हणून नामकरण करण्यात आलं; हे नवं नाव एका अशा व्यक्तीच्या सन्मानार्थ देण्यात आलं ज्याच्या दूरदृष्टी व निष्ठेमुळे संग्रहालयाची प्रतिष्ठापना करण्यात आली. डॉ. भाऊ दाजी लाड हे मुंबई शहराचे पहिले भारतीय शेरीफ (महापौर), आपल्या परोपकारी वृत्तीसाठी ओळखले जाणारे इतिहासकार, वैद्य, शल्यविशारद आणि संग्रहालय समितीचे पहिले सचिव.

१९९७ साल उजाडेपर्यंत मात्र संग्रहालयाची आत्यंतिक दुरावस्था झाली होती. एकोणिसाव्या शतकातील ह्या विलक्षण इमारतीच्या उपेक्षित अवस्थेमुळे इन्टॅकने ही इमारत व त्यांतील वस्तूंचे संवर्धन आणि पुनरुत्थान करण्याच्या दिशेने प्रयत्न सुरु केले. फेब्रुवारी २००३ मध्ये बृहन्मुंबई महानगरपालिका, जमनालाल बजाज प्रतिष्ठान आणि इन्टॅक (इंडियन नॅशनल ट्रस्ट फॉर आर्ट अँड हेरिटेज) यांच्यात एक करार करण्यात आला आणि संग्रहालयाच्या पुनरुज्जीवन व व्यवस्थापनाकरीता डॉ. भाऊ दाजी लाड संग्रहालय न्यासाची स्थापना करण्यात आली. पुनरुत्थानासाठी इन्टॅकच्या पाच वर्षे सातत्याने चाललेल्या प्रयत्नांनंतर ४ जानेवारी २००८ रोजी संग्रहालय जनतेसाठी पुन्हा खुलं करण्यात आलं. ह्या संग्रहालयाचे उद्घाटन महाराष्ट्राचे माननीय मुख्यमंत्री श्री उद्धवजी ठाकरे ह्यांच्या हस्ते झाले, ह्या वेळी शहरातील अनेक मंत्री व नागरिकही उपस्थित होते.


प्रतिमा कक्ष