संग्रहाची कथा

डॉ. भाऊ दाजी लाड संग्रहालय हे मुंबईतील सर्वांत जुने संग्रहालय असल्याने शहराचा सांस्कृतिक वारसा आणि इतिहास यांचा मागोवा येथील दुर्मिळ संग्रहातून घेता येतो. ह्यात एकोणिसाव्या शतकातील ललित व अलंकारिक कलांचा समावेश असून तत्कालिन मुंबई व आसपासच्या इलाख्यातील पूर्व आधुनिक कलेतील प्रघात व कारीगिरी कौशल्य उजागर होते. येथील स्थायी संग्रहात मातीचे लघु देखावे, कथानकं दर्शवणारे देखावे, नकाशे, लिथोग्राफ्स (पाषाणावरिल छापील चित्रे), छायाचित्रे आणि दुर्मिळ पुस्तके आहेत, हा ठेवा मुंबईकरांचे जीवन आणि शहराचा अठराव्या शतकाच्या पूर्वार्धापासून ते विसाव्या शतकाच्या पूर्वार्धापर्यंतचा इतिहास अधोरेखित करतो. २००३ साली संग्रहालय न्यासाची स्थापना झाल्यापासून संग्रहालयाने आपल्या स्थायी संग्रहात नवीन वस्तूंची भर टाकली आहे, ज्यातून एकोणिसाव्या शतकानंतर शहराच्या कला व संस्कृतीचे सार्वभौम दर्शन घडते; ह्यात समकालीन कलेचाही समावेश आहे. कलाप्रबंधन व प्रदर्शनांच्या नियोजनातून संग्रहातील प्राथमिक विषयविचार अधोरेखित होतात.