प्रत्येक आठवडाअखेरीस संग्रहालयाच्या
अभिरक्षकांकडून संग्रहालयाची माहिती मिळवा
शनिवार
सकाळी ११.३० वा इंग्रजीतून
दुपारी १२.३० वा मराठी/हिंदी भाषेतून
सर्वांसाठी खुले.
वास्तूचे पुनरुत्थान | वस्तूंचे पुनरुज्जीवन | कलाप्रबंधनाचे विचार | युनेस्कोचा पुरस्कार
१९९७ साली, संवर्धन प्रयोगशाळा स्थापन करण्यासाठी जागा शोधण्याच्या निमित्ताने इन्टॅकच्या अधिकाऱ्यांनी संग्रहालयाला भेट दिली. एकोणिसाव्या शतकातील ह्या विलक्षण वास्तूची दुरावस्था बघून इन्टॅकने बृहन्मुंबई महानगरपालिकेला तात्काळ ह्या वास्तू व त्यातील संग्रहाच्या पुनरुत्थानाचा आग्रह धरला. महानगरपालिकेने संग्रहालयाबाबतच्या ह्या प्रकल्पाला मंजूरी दिली आणि इन्टॅकने खाजगी समुदायांकडून निधी जमा करण्याचे प्रयत्न सुरु केले.
१९९९ साली इन्टॅकने जमनालाल बजाज प्रतिष्ठानाकडे विनंती केली, ज्यांनी उदारपणे संग्रहालयाच्या पुनरुत्थान व पुनरुज्जीवनाकरिता आर्थिक सहाय्य देण्यास सहमती दर्शविली. फेब्रुवारी २००३ मध्ये बृहन्मुंबई महानगरपालिका, जमनालाल बजाज प्रतिष्ठान आणि इन्टॅक ह्यांच्यात त्रिपक्षीय करार केला गेला आणि संग्रहालयाच्या पुनरुत्थान व व्यवस्थापनासाठी डॉ. भाऊ दाजी लाड संग्रहालय न्यासाची स्थापना झाली.
इनटॅकचा ह्या इमारतीच्या पुनरुत्थानाबाबतचा दृष्टिकोन अतिशय काळजीवाहू व विचारी होता. संवर्धन व पुनरुज्जीवनाचा आराखडा बनवण्यासाठी सखोल संशोधन व पूर्व तयारीने प्रकल्पाची संकल्पना एकत्रितपणे मांडण्यात आली.
इमारतीला व्यापक संवर्धनाची आवश्यकता होती, कारण दर्शनी भागाबरोबरच आतील भिंतींचेदेखील मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले होते. बाहेरच्या बाजूने बऱ्याच ठिकाणी एकपेशीय वनस्पती फोफावल्या होत्या आणि त्यांची मुळं इमारतीच्या पार गाभ्यापर्यंत पोहोचली होती. आतील भागातल्या र्हासाने अनेक ठिकाणी लोखंडी खांब भिंतीपासून विलग झाले होते आणि बरीचशी नक्षीदार काचेची तावदाने तुटलेली होती. विद्युत वाहिन्या संपूर्ण इमारतीत उघड्या पडल्या होत्या. मंद प्रकाशामुळे वातावरण नीरस व उद्विग्न भासत होते. विपुल रंगांची व सुबक तपशील असलेली इमारतीची आतली बाजू रयेला येऊन पिवळी झाक आलेल्या पांढऱ्या रंगाने सोनेरी मुलामा व बारीक नक्षीकाम पुसून टाकले होते, आणि त्याचबरोबर संस्थापकांची दूरदृष्टी आणि उद्देश्य देखील धूसर करून टाकले होते. हे सर्व आणि बरंच काही संग्रहालयाच्या संवर्धन आणि पुनरुज्जीवन प्रकल्पाचं काम पाहतांना लक्षात घेणे आवश्यक होते.
संग्रहालयातील बहुतेक वस्तू अतिशय दुर्लक्षित व दुरापास्त अवस्थेत होत्या. त्यांना बुरशी लागली होती आणि चुकीच्या पद्धतीने हाताळल्या व संवर्धन केल्या कारणाने त्यांचे बरेच नुकसान झाले होते.
इन्टॅकच्या तज्ञ संवर्धकांनी आजतागायत जवळ जवळ चार हजार वस्तूंचे संवर्धन केले आहे. प्रत्येक वस्तूचे वैयक्तिक नुकसान तपासण्यात येते. संवर्धन प्रक्रियेआधी व नंतर त्याचे छायाचित्र काढण्यात येते. त्याचे मोजमाप व वजन केले जाते आणि सखोल अहवाल बनवला जातो.
येथील प्रत्येक संवर्धन एक उत्सवपूर्ण कामगिरी ठरली आहे. जसे की सध्या मधल्या जिन्यावर थाटात लावलेला येरवडा जेलमधील गालिचा इतक्या दुरावस्थेत होता की तेव्हाच्या कलाप्रबंधकांनी त्याला काढून टाकण्याचे ठरवले. ह्या गालिच्याचे संवर्धन करण्यासाठी खास काश्मीरहून उत्तम कारागिरांना पाचारण करण्यात आले. आवश्यक ती देखभाल करत सहा महिन्यांत त्यांनी हा गालिचा पुन्हा जिवंत केला. मूळ गालिच्यातील धाग्याबरोबर जुळावे म्हणून खास इराणहुन सूत मागवण्यात आले.
कलाप्रबंधनाच्या नियोजनामध्ये संग्रहालयातील वस्तूंच्या मांडणीसाठी अनेकविविध विषयांबद्दल सखोल विचार करून त्या कल्पना प्रदर्शनीय जागेच्या रुपरेषेतही बसवण्याचे विचार करण्यात आले. ह्या सर्वसमावेशक अभ्यासात इतिहासाचे अनेक पैलू उलगडले. अनेक कथा बाहेर पडल्या आणि त्यांतूनच काही नवीन प्रदर्शन जागांची निर्मिती झाली. संग्रहालयातील अवकाशाचे पुनर्नियोजन आणि प्रकाशयोजना दोन्हीही कलाप्रबंधनाच्या आराखडा अभ्यासानुसार केले गेले. ह्या नवीन ज्ञान व अभ्यासाच्या अनुषंगाने पूर्ण संग्रहास नव्याने अर्थ प्राप्त झाला. पूर्ण संग्रहालय पुनःश्च मांडण्यात आले.
आपल्या विलक्षण शहराची गोष्ट अनेकविविध कंगोरे लक्षात घेऊन उलगडून सांगणे हा कलाप्रबंधनाचा प्राथमिक उद्देश्य होता. दोन प्रभावी विषय येथे आढळले जे ह्या शहराचे अद्वितीय व्यक्तिमत्व चित्रित करत होते. पहिले म्हणजे पाणथळ बेटांच्या समूहाचे एका भव्य विश्वव्यापी शहरात रूपांतर, जे एकोणिसाच्या शतकाच्या पूर्वार्धात व्यापाराचे केंद्रबिंदू बनले. दुसरा विषय म्हणजे व्यापार व तांत्रिक कलानिर्मितीच्या विकासाची कथा, जी ह्या शहरात आणि देशातील अनेक महत्वाच्या केंद्रांत घडत होती.
ह्या नवीन माहितीच्या आधारे प्रदर्शन तावदानांचे पुर्नयोजन करून संग्रहाची विचारार्थ मांडणी करावी लागली. प्रत्येक तावदानाच्या नियोजनासाठी वैयक्तिक कथा-इतिहास समजून घेऊन, त्याला सुयोग्यरित्या मांडून, त्याची दृकसंवेदना वृद्धिंगत करण्याचा प्रयत्न केला गेला.
संग्रहालयाच्या संवर्धन प्रकल्पाला २००५ साली युनेस्को आशिया पॅसिफिकचा उत्कृष्ट संवर्धनासाठीचा वारसा जतनीकरणासाठी दिला जाणारा पुरास्कार मिळाला.
युनेस्को उत्कृष्ट संवर्धन पुरस्काराचे प्रशस्तीपत्र:
प्रबोधन पुनरुज्जीवन शैलीतील वास्तुकलेचा उत्कृष्ट नमुना असलेले मुंबईतील डॉ. भाऊ दाजी संग्रहालय आपल्या पूर्वीच्या ऐतिहासिक वैभवात पुनरुत्थित करण्यात आले. हे घडले बृहन्मुंबई महानगरपालिका, भारतीय राष्ट्रीय कला व सांस्कृतिक वारसा संस्था (इन्टॅक) आणि जमनालाल बजाज प्रतिष्ठान यांच्यातील अग्रणीय सार्वजनिक-खाजगी भागीदारीमुळे.
सर्वांगीण संवर्धनाच्या योजनेत संग्रहालयाची इमारत व संग्रहालयातील कलावस्तू या दोहोंचा समावेश आहे; हा प्रकल्प भारत व प्रदेशातील संग्रहालयांच्या संवर्धनाचा एक उच्चतम मापदंड प्रस्थापित करतो. इमारतीच्या आतील सूक्ष्म कलात्मक घटकांच्या संवर्धनाकडे लक्ष देऊन व त्याचेबरोबर आतील रचनेत आधुनिक फेरबदल करून ह्या प्रकल्पाने संवर्धनाच्या अभिजात तंत्रावरील पकड आणि कारागिरीतील कौशल्य ह्यांच्यात संतुलन साधता येते हे दाखवले आहे.
ह्या प्रकल्पात यशस्वीरीत्या कालबाह्य होणाऱ्या सोन्याचा मुलामा देण्याच्या पद्धतीचा वापर आणि आकार-नक्षीच्या प्रति निर्माण करण्यासारख्या तंत्रांच्या पुनर्जीवनाचा वापर यशस्वीपणे केल्याचे दिसते. आज ही इमारत व्हिक्टोरियन वास्तुकलेच्या विकासाची, विशेषतः एकोणिसाव्या शतकातील भारतीय परंपरा व संकरीत बांधकाम, तसेच देशातील सर्वात सुरुवातीच्या संग्रहालयात सामाजिक परंपरांच्या संलग्नतेची अद्वितीय साक्षी आहे.
युनेस्को आशिया पॅसिफिक उत्कृष्ट संवर्धनासाठी वारसा जतन पुरास्काराचं संयोजन संबंधित प्रदेशातील ऐतिहासिक वारसा असलेल्या वास्तूंच्या यशस्वी संवर्धनासाठी व्यक्ती, खाजगी विभागातील संघटना व सार्वजनिक-खाजगी ध्यास प्रकल्पांच्या कामगिरीला प्रोत्साहन देण्यासाठी करण्यात आलं आहे.
हा प्रकल्प युनेस्कोच्या "संस्कृतीच्या क्षेत्रात मसुदे व आदर्श साधन उपयोग उन्नत करण्याच्या" वैश्विक नियोजित उद्देश्याला भरारी देतो. जागतिक चौकटीत हा प्रकल्प स्थानिक कार्यस्तंभाच्या आधारे "सांस्कृतिक व्यवसायाच्या स्थानिक बढती व सशक्तीकरणातून आदर्शांचा विकास व अंमलबजावणी" करतो.
युनेस्को च्या संकेतस्थळावर प्रशस्तीपत्र बघण्याकरीता येथे क्लिक करा
डॉ. भाऊ दाजी लाड मुंबई
शहर संग्रहालय समाजाच्या सेवेकरिता एक अशी संस्था म्हणून काम करण्याचे उद्देश्य ठेवते जी उत्कृष्ट प्रदर्शनांद्वारे आणि विविध दृक व वैचारिक माध्यमांतून सांस्कृतिक ज्ञानाच्या प्रसाराकरिता समर्पित असेल.
बृहन्मुंबई महानगरपालिकेची संस्था
जमनालाल बजाज प्रतिष्ठानाच्या सहकार्याने कार्यरत
इन्टॅक, इंडियन नॅशनल ट्रस्ट फॉर आर्ट अँड कल्चरल हेरिटेज द्वारे पुनरुज्जीवीत
पत्ता
वीर माता जिजाबाई भोसले उद्यान (राणीची बाग),
९१/अ, डॉ. बाबासाहेब आंबेडकर मार्ग,
भायखळा पूर्व, मुंबई ४०००२७, महाराष्ट्र, भारत
वेळ:
तात्पुरते बंद
दू. : +९१ २२ २३७४१२३४