अन्वेषण

मोफत अभ्यास दौरे

प्रत्येक आठवडाअखेरीस संग्रहालयाच्या
अभिरक्षकांकडून संग्रहालयाची माहिती मिळवा

शनिवार
सकाळी ११.३० वा इंग्रजीतून
दुपारी १२.३० वा मराठी/हिंदी भाषेतून
सर्वांसाठी खुले.

म्युझियम कट्टा


वर्तमानाविषयी संवेदनशील प्रतिक्रिया नोंदवणारे अन् समृद्ध इतिहासाची कवाडं उघडणारे महाराष्ट्रातील प्रकल्प, प्रयोग आणि कलाकृतींचं कार्यक्रमांच्या माध्यमातून दस्ताऐवजीकरण व्हावं ह्या हेतूने डॉ. भाऊ दाजी लाड संग्रहालय म्युझियम कट्टा ह्या कार्यक्रमांच्या मालिकेचं आयोजन करते. रसिक आणि कलाकार यांच्यातील दुवा बनत महाराष्ट्रातील समकालीन सांस्कृतिक विचारधारेला रंगमंच उपलब्ध करुन देण्याच्या हेतूने संकल्पित ह्या उपक्रमात आम्ही लोककला, चित्रपट, साहित्य, नाटक, संगीत आणि दृष्यकलेचा वेध घेतो.


म्युझियम कट्टा | चैतन्य ताम्हाणे

२१ मे २०२१
सायंकाळी ६ - ७

मुलाखतकार: लेखक, कलाइतिहासतज्ञ आणि आर्ट इंडियाचे संपादक अभय सरदेसाई

'कोर्ट' चित्रपटाला मिळालेल्या घवघवीत यशानंतर, चैतन्य ताम्हाणे 'द डिसाईपल' घेऊन आपल्या भेटीला आले आहेत. व्हेनिस फिल्म फेस्टिवलमध्ये उत्तम स्क्रीनप्ले आणि आंतरराष्ट्रीय क्रिटिक्स पुरस्काराने हा चित्रपट गौरविण्यात आला. हा चित्रपट नुकताच नेटफ्लिक्सवर प्रदर्शित करण्यात आला आहे.

लेखक, कलाइतिहासतज्ञ आणि आर्ट इंडियाचे संपादक अभय सरदेसाई आगामी म्युझियम कट्टामध्ये चैतन्य ताम्हाणे यांच्याशी संवाद साधतील आणि त्यांचा चित्रपटनिर्मितीचा प्रवास, कथेमागील प्रेरणा आणि प्रेक्षकांचा चित्रपटाला मिळालेला प्रतिसाद ह्या साऱ्याविषयी चर्चा करतील. सदर zoomवर आयोजित करण्यात आलं असून सदराअंती आपल्याला आपल्या मनातले प्रश्न विचारता येतील

भाषा: मराठी
मोफत आणि सर्वांसाठी खुले.
सदर zoomवर आयोजित करण्यात आले आहे. मर्यंदित नोंदणीव्यवस्था.
नसंग्रहालयाच्या युट्यूब चॅनेलवरुन हे सदर आपल्याला पाहता येईल.

​​गतकालीन आवृत्त्या


मांघे सावली उरली.. | बहिणाबाईंच्या जीवनावर आणि त्यांच्या समृद्ध साहित्यसंपदेवर आधारित
सादरकर्त्या: हर्षदा बोरकर आणि मन्विता जोशी

मार्च ०७, २०२०     सायंकाळी ५ - ६ .३० सविस्तर वृत्त   

नलिनी मलानी यांच्या ‘साक्षीदार’ ह्या संग्रहालयातील प्रदर्शनावरुन प्रेरीत बहिणाबाई चौधरी. मराठी साहित्यविश्वाला लाभलेलं अद्भुत लेणं. त्यांच्या काव्य, विचार आणि जीवनावर आधारीत 'माझी माय सरसोती' ह्या नृत्यनाट्याच्या जडणघडणीत सापडत गेलेलं एका निरक्षर शेतकरी स्त्रीचं थक्क करणारं जीवनविषयक तत्वज्ञान आपल्या समोर मांडणार आहेत ह्या नाटकाच्या दिग्दर्शिका हर्षदा बोरकर आणि प्रमुख कलाकार मन्विता जोशी.

बहिणाबाईंच्या ओव्यांतून त्यांनी निसर्गाशी आणि जीवनाशी स्वत:ला कसं एकरूप करून घेतलं होतं हे निश्चितपणे जाणवतं. मातीत, शेतात व भवतालात मिसळून गेलेलं त्यांचं जीवन, रोजची कष्टमय कामं, शेतमजूरी आणि संसार ह्याकडे सकारात्मकतेनी पहात बहिणाबाई ह्या सगळ्याचं सार अतिशय सहजतेनी आपल्या काव्यरचनेतून मांडतात. त्यांच्या काव्यपक्तींचाच आधार घेत, कलाकार नलिनी मलानी आपल्याला शहाराचा गाभा दडलाय तरी कशात असा प्रश्न 'आकांक्षांचं शहर: लोकं येतात, जातात' ह्या आपल्या कलाकृतीतून विचारतात.

एक व्यक्ती आणि कलाकार ह्या नात्याने बहिणाबाईंचा घेतलेला अनुभव ओवी संवादातून मांडण्याचा हा सविनय प्रयत्न!


गांंधी: अंतिम पर्व | जेष्ठ रंगकर्मी रत्नाकर मतकरी यांच्या नाटकाचं अभिवाचन आणि पुस्तक प्रकाशन
पॉप्युलर प्रकाशनाच्या सहयोगाने

फेब्रु १३, २०२०     सायंकाळी ५.३० - रात्री ८ सविस्तर वृत्त   

रत्नाकर मतकरी यांच्या नाटकाचं अभिवाचन आणि प्रकाशन सोहळा

पॉप्युलर प्रकाशन, मुंबई यांच्या सहयोगाने

गांधी : अंतिम पर्व

निर्मिती : प्रतिभा मतकरी

सादरकर्ते : योगेश उतेकर, अपूर्वा परांजपे, रोहित मावळे, अभय भोसले, आदित्य कदम, दीप्ती दांडेकर, अभिषेक साळवी, योगेश खांडेकर आणि रत्नाकर मतकरी प्रकाशन रवींद्र रुक्मिणी पंढरीनाथ यांच्या हस्ते

महात्मा गांधी यांच्या दीडशेव्या जयंतीनिमित्त रत्नाकर मतकरी एक नवं नाटक वाचकांच्या भेटीला घेऊन आले आहेत. साहित्यिक, रंगकर्मी, दिग्दर्शक आणि अनेक बालनाट्यांचे निर्माते म्हणून मराठी भाषिकांना परिचित असलेले रत्नाकर मतकरी यांनी नाटक, एकांकिका, बालनाट्य, कथा, गूढ कथा, कादंबरी, ललित लेख, वैचारिक साहित्य अशा विविध साहित्य प्रकारांत दर्जेदार लेखन केलं आहे. दिल्लीतल्या बिर्ला हाऊसमध्ये गांधीजींनी घालवलेल्या अखेरच्या काही दिवसांत घडलेल्या घडामोडींवर मतकरींचं हे नवं नाटक बेतलेलं असून स्वत: मतकरी आपल्या युवा साथीदारांसह ह्या नाटकाच्या अभिवाचनाचे प्रयोग जागोजागी करत आहेत.

सदर नाटकाची संहिता पॉप्युलर प्रकाशनातर्फे प्रकाशित होत असून ह्या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा अभिवाचनाच्या कार्यक्रमाच्या सोबतीने करण्याचं आम्ही योजिलं आहे.

पॉप्यलर प्रकाशनाविषयी

पॉप्युलर प्रकाशन ही संस्था गेली शहाण्णव वर्षे इंग्रजी आणि मराठी भाषांतील प्रकाशनाच्या उत्तम दर्जासाठी ओळखली जाते. समाजशास्त्रज्ञ गोविंद सदाशिव घुर्ये, इतिहासकार दामोदर धर्मानंद कोसंबी आणि रोमिला थापर, तसंच राजकीय विचारवंत जयप्रकाश नारायण यांच्या पुस्तकांनी पॉप्युलरच्या इंग्रजी शैक्षणिक विषयींतील प्रकाशनाचा पाया रचला.

पॉप्युलर ही मराठी भाषेतीलही महत्त्वाची प्रकाशनसंस्था असून स्वातंत्र्योत्तर साहित्य चळवळींतले; विशेषत: नवकथा, नवकविता आणि मराठी रंगभूमीवरील नवीन प्रवाह, त्यांनी वाचकांसमोर मांडले. मराठी भाषेतील लेखकांना मिळालेले चारपैकी तीन ज्ञानपीठ पुरस्कार (कवी-नाटककार वि. वा. शिरवाडकर, कवी विंदा करंदीकर आणि कादंबरीकार-कवी भालचंद्र नेमाडे) पॉप्युलरच्याच लेखकांना मिळाले आहेत. त्यांशिवाय दिलीप पुरुषोत्तम चित्रे, ना. धों. महानोर, वसंत बापट, मंगेश पाडगावकर, ग्रेस, विजय तेंडुलकर, वसंत कानेटकर, किरण नगरकर, श्याम मनोहर, दुर्गा भागवत, कमल देसाई अशा मराठीतील श्रेष्ठ साहित्यिकांशी पॉप्युलरचे नाव जोडले गेले आहे.


पुन्हा चित्रे | दिलीप चित्रे यांच्या निवडक कवितांचं अभिवाचन पॉप्युलर प्रकाशनाच्या सहयोगाने

एप्रिल १८, २०१९     सायंकाळी ६ - रात्री ८ सविस्तर वृत्त   

पुन्हा चित्रे

पॉप्युलर प्रकाशन, मुंबई यांच्या सहयोगाने

सादरकर्ते: प्राजक्त देशमुख, सचिन शिंदे, श्रीपाद देशपांडे आणि प्रणव प्रभाकर दिलीप पुरुषोत्तम चित्रे हे नाव मराठी, गुजराथी, हिंदी आणि इंग्रजी भाषावर्तुळात परिचयाचे! कवी, कथाकार, नाटककार, अनुवादक आणि चित्रकार म्हणून चित्रे विविध कलामाध्यतांत लिलया वावरले, आपली निरिक्षणं नोंदवत गेले.

बालपणापासूनच त्यांच्यावर वाङ्मयीन संस्कार झाले. विद्यार्थीदशेतच 'शब्द' या लघुनियतकालिकातून कवितालेखन आणि साहित्यविषयीचा मूल्यविचार त्यांनी मांडला. १९६० ते १९६३ या काळात चित्रे इथियोपियात इंग्रजी अध्यापनासाठी गेले असतानाचे अनुभव 'शिबाराणीच्या शोधात'च्या रूपाने १९७१ साली प्रसिद्ध झाले. त्यांचा पहिला कथासंग्रह 'ऑर्फियस' १९६८ साली प्रकाशित झाला. 'चाव्या', 'तिरकस आणि चौकस', शतकांचा संधिकाल हे लेखसंग्रह, 'मिठू मिठू पोपट आणि सुतक' ही नाटके आणि 'चतुरंग' हे चार लघुकादंबऱ्यांचे संकलन प्रसिद्ध झाले. 'गोदाम' या चित्रपटाचे कथालेखन, दिग्दर्शन व संगीत दिग्दर्शनही त्यांनी केले.

मराठीतल्या ‘शब्द’ या पहिल्या अनियतकालिकोचे प्रवर्तक असणा-या चित्रे यांनी ‘आधुनिक कवितेला सात छेद’, ‘शतकाचा संधिकाल’, अशा लेखमाला लिहिल्या. ‘कविता’, ‘पुन्हा कविता’ हे त्यांचे काव्यसंग्रह. त्यासोबतच ‘सफायर’, ‘रुधिराक्ष’ या लघुकादंब-यांबरोबरच तुकारामांच्या निवडक अभंगांचा आणि ज्ञानदेवांचा इंग्रजी अनुवाद केला. चंद्रकांत पाटील आणि भालचंद्र नेमाडे यांनी १९७८ साली 'कवितेनंतरच्या कविता' हा त्यांचा काव्यसंग्रह प्रसिद्ध केला, तर अशोक शहाणे यांनी 'दहा बाय दहा' हा काही स्वतंत्र आणि काही अनुवादित अशा कवितांचा संग्रह १९८३ मध्ये प्रसिद्ध केला. 'एकूण कविता' हा काव्यसंग्रह चार भागांत, परंतु समग्र स्वरूपात पॉप्युलर प्रकाशनाने नुकताच प्रसिद्ध केला.

​पॉप्युलर प्रकाशनाविषयी :

पॉप्युलर प्रकाशन ही संस्था गेली ८९ वर्षे आपल्या उत्तम दर्जासाठी प्रकाशनाच्या क्षेत्रात भारतात ओळखली जाते. समाजशास्त्रज्ञ गोविंद सदाशिव घुर्ये, इतिहासकार दामोदर धर्मानंद कोसंबी आणि रोमिला थापर, तसंच राजकीय विचारवंत जयप्रकाश नारायण यांच्या पुस्तकांनी पॉप्युलरच्या इंग्रजी शैक्षणिक विषयींतील प्रकाशनाचा पाया रचला.

​पॉप्युलर ही मराठी भाषेतीलही महत्त्वाची प्रकाशनसंस्था आहे. स्वातंत्र्योत्तर साहित्य चळवळींतले, विशेषत्वाने नवकथा, नवकविता, मराठी रंगभूमीवरील नवीन प्रवाह पॉप्युलरच्या माध्यमातूनच वाचकांसमोर आले. मराठी भाषेतील लेखकांना मिळालेले चारपैकी तीन ज्ञानपीठ पुरस्कार (कवी, नाटककार वि. वा. शिरवाडकर, कवी विंदा करंदीकर आणि कादंबरीकार, कवी भालचंद्र नेमाडे) पॉप्युलरच्याच लेखकांना मिळाले आहेत. त्यांशिवाय कवी दिलीप पुरुषोत्तम चित्रे, ना. धों. महानोर, वसंत बापट, मंगेश पाडगावकर, ग्रेस; नाटककार विजय तेंडुलकर, वसंत कानेटकर; लेखक किरण नगरकर, श्याम मनोहर, दुर्गा भागवत, कमल देसाई अशा मराठीतील श्रेष्ठ साहित्यिकांशी पॉप्युलरचे नाव जोडले गेले आहे.

सहभागी कलाकारांविषयी:

प्राजक्त देशमुख : संगीत देवबाभळी ह्या व्यावसायिक रंगभूमीवर अनेक पारितोषिके कमावलेल्या नाटकाचे ते लेखक आणि दिग्दर्शक. एकादशावतार, मून विदाऊट स्काय, मुक्ती, वैजयंती, रेनमेकर, १२ किमी अशा अनेक कलाकृतींचे लेखक.

श्रीपाद देशपांडे : मडवॉक, पाणीपुरी इत्यादी नाटकांचे लेखक असून ते गेल्या १७-१८ वर्षांपासून समांतर रंगभुमीवर कार्यरत आहेत. त्यांनी लोकप्रिय मराठी मालिकांचे संवादलेखन केलं असून त्यांना अनेक राज्यस्तरिय पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे.

सचिन शिंदे : हंडाभर चांदण्या, गढीवरच्या पोरी, मून विदाऊट स्काय, विसर्जन इ. नाटकांचं दिग्दर्शक केलं असून त्यांचा मटा, झी गौरव आणि अन्य अनेक राज्यस्तरिय पुरस्कारांनी गौरव केला आहे. प्रणव प्रभाकर : गेल्या १६-१७ वर्षांपासून समांतर रंगभूमीवर कार्यरत असून हंडाभर चांदण्या, लिअर, पाणीपुरी इ अनेक नाटकांमधून त्यांनी मध्यवर्ती भुमिका केली आहेे. ते अनेक राज्यस्तरिय पुरस्कारांचे विजेते आहेत.


मला उमजलेले पु.ल. | मला उमगलेले गदिमा
सादरकर्ते: प्रा. प्रविण दवणे आणि कवी अरुण म्हात्रे

मार्च ३०, २०१९     सायंकाळी ५ - ७ सविस्तर वृत्त   

पु.ल. देशपांडे आणि ग.दि.माडगुळकर म्हणजे महाराष्ट्रातील दोन प्रतिभावंत माणकं! एकाने काव्यसुमनांनी तर दुसऱ्याने हसत हसवत आपल्या भाषणांनी, एकपात्री प्रयोगांनी, नाटक, गाणी आणि चित्रपटांनीे महाराष्ट्राला साहित्यसंपन्न केले.

म्युझियम कट्टाच्या सदर आवृत्तीत, ह्या दोन्ही साहित्यिकांच्या जन्मशताब्दिवर्षानिमित्त, ह्या दोघांच्या योगदानाचे तितकेच मर्मग्राही मूल्यमापन करतील प्रा.प्रवीण दवणे आणि लोककवी अरुण म्हात्रे!


परवा आमचा पोपट वारला
अभिवाचन: अतुल पेठे

डिसें २, २०१८     सायंकाळी ५ - ७ सविस्तर वृत्त   

भावनिकदृष्ट्या जोडल्या गेलेल्या सजीव पक्ष्याची, आणि त्याच्या मृत्यूआधी आणि मृत्यूनंतर आलेल्या अनुभवांची ही हलकी-फुलकी गोष्ट. डॉ. चंद्रशेखर फणसळकरांच्या ह्या उपहासात्मक शैलीतील एकपात्री नाटकाचं प्रभावी वाचन करतील जेष्ठ रंगकर्मी अतुल पेठे. जरुर या!


माध्यमाच्या स्थित्यंतरात
अभिनेते संदीप कुलकर्णी यांच्या समवेत

ऑक्टो २८, २०१८     सायंकाळी ५ - ७ सविस्तर वृत्त   

.. सर ज जी कलामहाविद्यालयात दृश्यभाषेचं अवलोकन करत असताना एकीकडे संदीप कुलकर्णी प्रतिथयश चित्रकार प्रभाकर कोलते आणि अतुल दोडिया यांच्या प्रोत्साहनामुळे विद्यार्थीविश्वात प्रसिद्ध 'मान्सुन शो'मध्ये आपली चित्रं मांडत तर होते, पण दुसरीकडे नाटकाच्या मंचानंही त्यांना प्रचंड आकर्षित केलं होतं. पं. सत्यदेव दुबेजींच्या तालमीत घडलेल्या ह्या विद्यार्थ्याची नाटक, दूरचित्रवाहिनी आणि सिनेविश्वातील मुशाफिरी आपण जाणतोच.

कसा होता 'मम्मो'च्या निमित्तानं श्याम बेनेगलांसोबत काम करण्याचा त्यांचा अनुभव.. साने गुरुजी साकारताना त्यांच्या विचारांनी भारावणं.. 'डोंबिवली फास्ट'ला मिळालेला लोकांचा प्रतिसाद... 'श्वास'ला मिळालेलं ऑस्कर नामांकन... 'एक डाव संसाराचा'करिता नायजेरिअन फिल्म फेस्टिवलमध्ये मिळालेला उत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार.. अंधाधुंदमुळे चर्चेत असलेल्या श्रीराम राघवन यांच्यासोबत गूढकथा साकारतानाचा अनुभव... आणि कलाप्रदर्शनांना भेट देताना त्यांना आता येणारा अनुभव!

संदीप कुलकर्णींचा हा माध्यमप्रवास विस्तारानं जाणण्यासाठी म्युझियम कट्टाच्या येत्या आवृत्तीसाठी आपली उपस्थिती नोंदवा!


पोवाड्यांचा जागर
सादरकर्ते: गणेश चंदनशिवे, शाहीर यशवंत जाधव आणि मंडळी

सप्टें ३०, २०१८     सायंकाळी ५ - ७ सविस्तर वृत्त   

'एम्. व्ही. धुरंधर: चित्रमय इतिवृत्त' ह्या संग्रहालयात सुरु असलेल्या प्रदर्शनावरुन प्रेरीत महादेव विश्वनाथ धुरंधरांनी छत्रपती शिवाजी महाराजांची यशोगाथा चित्रांकित केली, तर महाराष्ट्रातील लोककलावंतांनी आपल्या पोवाड्यांच्या माध्यमातून शिवचरित्राचा तेजस्वी वारसा लोकांपर्यंत पोहचवला. त्याच पोवाड्यांचं धुरंदरांच्या चित्रांच्या पार्श्र्वभूमीवर गणेश चंदनशिवे, शाहीर यशवंत जाधव आणि त्यांचे सहकारी छत्रपती शिवरायांच्या चित्रांच्या पार्श्वभूमीवर सादरीकरण करतील.


कविस्पर्शाची पालवी | कविवर्य विंदा करंदीकरांच्या लघुनिबंधांचे अभिवाचन
पॉप्युलर प्रकाशनाच्या सहयोगाने

ऑगस्ट २३, २०१८     सायंकाळी ६ - ७.३० सविस्तर वृत्त   

दि. २३ ऑगस्ट २०१८ रोजी विंदा करंदीकरांच्या जन्मशताब्दी वर्षाची सांगता होत आहे. त्या निमित्ताने त्यांच्या लघुनिबंधकार म्हणून असलेल्या रूपाची ओळख वाचकांना करून देण्याचा प्रयत्न आम्ही करणार आहोत.

अतिशय काव्यात्म शैलीत लिहिलेले विंदा करंदीकरांचे लघुनिबंध म्हणजे जणू गद्य काव्यच. काही लघुनिबंधांमधून करंदीकरांच्या लेखनातला नर्म विनोद, त्यातली भावुकता वाचकांना सुखावून जाते तर काही लघुनिबंध वाचताना एखादी उत्तम कथा वाचत असल्याचा प्रत्यय आपल्याला येतो. ज्येष्ठ समीक्षक विजया राजाध्यक्ष यांनी म्हटल्याप्रमाणे, 'हे लघुनिबंध म्हणजे भाषेच्या विविध रूपांची आणि त्यांचा आविष्कारासाठी उपयोग कसा करून घ्यावा याची आंतरिक जाण असलेल्या कवीचा सहजस्फूर्त प्रयत्न आहे. या प्रयत्नांतून जन्मलेल्या शैलीत संभाषण आणि निरूपण या दोहोंचे संश्लेषण झाले आहे. करंदीकरांमधला कवी हाच त्या संश्लेषणाचा कर्ता.' त्या कवीनेच 'स्पर्शाची पालवी' व 'आकाशाचा अर्थ' या दोन्ही संग्रहांतील लघुनिबंधांत एक अद्भुत कर्म करून ठेवले आहे! कविवर्य करंदीकरांविषयी

भारतीय ज्ञानपीठ पुरस्कार विजेते मराठी साहित्यिक विंदा करंदीकर यांची प्रथम ओळख ही जरी कवी म्हणून असली तरी त्यांनी गो. वि. करंदीकर नावाने महत्त्वाचे गद्य लेखनही केले होते. विशेषतः मराठीत लघुनिबंध हा वाङ्मयप्रकार लोकप्रिय करण्याचे बरेचसे श्रेय गो. वि. करंदीकर यांनाच जाते. 'स्पर्शाची पालवी' आणि 'आकाशाचा अर्थ' असे त्यांचे दोन लघुनिबंध संग्रह प्रसिद्ध आहेत. त्याशिवाय 'अरिस्टोटलचे काव्यशास्त्र', 'फाउस्ट', 'राजा लिअर' अशा महत्त्वाच्या इंग्रजी पुस्तकांचे अनुवाद, संत ज्ञानेश्वरांच्या 'अमृतानुभव' या ग्रंथाचे अर्वाचीन मराठी भाषेत रूपांतर त्यांनी केले आहे. हे अनुवाद करताना त्यांनी प्रत्येक पुस्तकाला गरजेनुसार प्रदीर्घ प्रस्तावना, टीपा दिल्या आहेत. करंदीकरांनी मराठी आणि इंग्रजीत समीक्षालेखनही केले आहे. 'परंपरा आणि नवता' हा त्यांचा मराठीतला समीक्षालेखांचा संग्रह आजही अभ्यासकांना उपयुक्त ठरतो.

किशोर कदम

‘गारवा’च्या कविता अन् गाण्यांनी कवी सौमित्र घराघरात पोहचले. अभिनय क्षेत्रातला त्यांचा वावर त्याहीआधीचा! ते पं. सत्यदेव दुबे यांचे पट्टशिष्य. वाचिक अभिनयावर त्यांचं प्रभुत्व. रंगभूमीवरील त्यांची हरिलालची भूमिका विशेष गाजली. त्यानंतर ‘घराबाहेर’ चित्रपटातील तरुण कार्यकर्ता असो वा अलीकडच्या ‘नटरंग’ किंवा ‘जोगवा’ चित्रपटातील त्यांच्या व्यक्तिरेखा असोत. नवं स्वगत मांडणाऱ्या त्यांच्या व्यक्तिरेखा रसिकांच्या मनावर कोरल्या गेल्या. नोव्हेंबर 2017 मध्ये त्यांनी संग्रहालयात पश्चिम बंगाल आणि बांग्लादेश भागात आजही लोकप्रिय असलेल्या १९ व्या शतकाच्या उत्तरार्धात आणि २० व्या शतकाच्या पूर्वार्धात फुललेल्या बाऊल ह्या लोकसंगीताच्या परंपरेचा वारसा सांगणाऱ्या ‘बाऊल’ ह्या आपल्या दिर्घकवितेचं वाचनही केलं होतं.

ओंकार गोवर्धन

ओंकार गोवर्धन हे नाव मराठी रंगभूमी, टीव्ही मालिका आणि चित्रपटसृष्टीला परिचित असे आहे. लहानपणापासून अभिनयाची आवड असलेल्या ओंकार गोवर्धन यांचे नाव मराठी नाट्यरसिकांच्या प्रथम परिचयाचे झाले ते 'सत्यशोधक' नाटकांमधल्या त्यांच्या अभिनयामुळे. त्या नाटकात त्यांनी साकारलेली महात्मा जोतीराव फुले यांची व्यक्तिरेखा रसिक आणि समीक्षकांनी नावाजली होती. त्यानंतर त्यांनी अनेक मराठी चित्रपट, टीव्ही मालिकांमधून केलेल्या भूमिका आजही प्रेक्षकांच्या स्मरणात आहेत.

पॉप्युलर प्रकाशनाविषयी :

पॉप्युलर प्रकाशन ही संस्था गेली ८९ वर्षे आपल्या उत्तम दर्जासाठी प्रकाशनाच्या क्षेत्रात भारतात ओळखली जाते. समाजशास्त्रज्ञ गोविंद सदाशिव घुर्ये, इतिहासकार दामोदर धर्मानंद कोसंबी आणि रोमिला थापर, तसंच राजकीय विचारवंत जयप्रकाश नारायण यांच्या पुस्तकांनी पॉप्युलरच्या इंग्रजी शैक्षणिक विषयींतील प्रकाशनाचा पाया रचला.

पॉप्युलर ही मराठी भाषेतीलही महत्त्वाची प्रकाशनसंस्था आहे. स्वातंत्र्योत्तर साहित्य चळवळींतले, विशेषत्वाने नवकथा, नवकविता, मराठी रंगभूमीवरील नवीन प्रवाह पॉप्युलरच्या माध्यमातूनच वाचकांसमोर आले. मराठी भाषेतील लेखकांना मिळालेले चारपैकी तीन ज्ञानपीठ पुरस्कार (कवी, नाटककार वि. वा. शिरवाडकर, कवी विंदा करंदीकर आणि कादंबरीकार, कवी भालचंद्र नेमाडे) पॉप्युलरच्याच लेखकांना मिळाले आहेत. त्यांशिवाय कवी दिलीप पुरुषोत्तम चित्रे, ना. धों. महानोर, वसंत बापट, मंगेश पाडगावकर, ग्रेस; नाटककार विजय तेंडुलकर, वसंत कानेटकर; लेखक किरण नगरकर, श्याम मनोहर, दुर्गा भागवत, कमल देसाई अशा मराठीतील श्रेष्ठ साहित्यिकांशी पॉप्युलरचे नाव जोडले गेले आहे.


आज या देशामध्ये !
सादरकर्ते: चंद्रकांत काळे

ऑगस्ट १५, २०१८     सायंकाळी ६ - ७ सविस्तर वृत्त   

स्वातंत्र्योत्तर काळात जशा मराठी भाषेमध्ये 'स्वातंत्र्या' बद्दल आणि सामाजिक अस्वस्थतेवर भाष्य करणाऱ्या कविता विपुल प्रमाणात लिहिल्या गेल्या, तशाच त्या तामिळ, बंगाली, मणिपुरी, सिंधी, कन्नड, मलयालम तसंच इतर भारतीय भाषांमध्येही लिहिल्या गेल्या. भवतालाचा वेध घेणाऱ्या कवितांच्या संकलनातून चंद्रकांत काळे यांनी ह्या कार्यक्रमाची गुंफण केली आहे.

मेनका शिवदासानी, नीलमणी फुकन, जी. एस्. शिवरुद्रप्पा, शक्ती चट्टोपाध्याय, ए. के. रामानुजन, अयप्पा पणीकर, अख्तर उल इमान, के. जी. शंकर पिल्लई अशांसारख्या कित्येक प्रतिभावंतांच्या विविध भारतीय भाषांतील कविता प्रसिद्ध आहेत. ह्या कवितांचा अनुवाद अनुपमा उजागरे यांनी काही वर्षांपूर्वी मराठी भाषेत केला आहे. चंद्रकांत काळे ह्या कवितांचं वाचन करतील.

सदर कार्यक्रमात गायनासाठी निवडलेल्या कविता ह्या मराठी भाषेतील प्रतिभाशाली कवी कै. बा. सी. मर्ढेकर, कुसुमाग्रज, अरुण कोलटकर आणि विं. दा. करंदीकर यांच्या आहेत. ‘प्रीतरंग’, ‘शेवंतीचं बन’, ‘अमृतगाथा’ आणि कवी ग्रेस यांच्या कवितांचं वाचन करणारे अभिनेते-गायक चंद्रकांत काळे यांनी सातत्यानं विविध कल्पना मांडणारे कार्यक्रम शब्दवेधच्या माध्यमातून रसिकांसमोर आणले आहेत. याहीवेळी त्यांनी हाती घेतलेला विषय असाच वेगळा आहे.


‘तें’च्या नाटकांतील स्वगते
पॉप्युलर प्रकाशन, मुंबई यांच्या सहयोगाने सादरकर्ते: आविष्कारचे कलावंत

जून २१, २०१८     सायंकाळी ६ - ७.३० सविस्तर वृत्त   

ख्यातनाम नाटककार विजय तेंडुलकर यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ, आविष्कारचे कलावंत सादर करतील तेंडुलकरांच्या नाटकांतील निवडक प्रवेशांचं अभिवाचन! जरूर उपस्थित राहा!

कार्यक्रमात सहभागी कलाकार :

सुनिल जोशी, मानसी कुलकर्णी, चिन्मयी सुमित, सुशील इनामदार, दीपक राजाध्यक्ष

विजय तेंडुलकरांविषयी

विजय तेंडुलकर (१९२८-२००८) हे विसाव्या शतकातील महत्वाचे रंगकर्मी. प्रख्यात नाटककार, पटकथाकार, चतुरस्र लेखक, पत्रकार, संपादक आणि सामाजिक भाष्यकार म्हणून ते आपल्याला परिचित आहेत. १९५० नंतरची तब्बल पाच शतकं त्यांचा मराठी नाट्यविश्वात सक्रिय राबता राहिला. त्यांनी ३० नाटकं आणि अनेक एकपात्री प्रयोगांचं लेखन केलं. त्यांच्या अजरामर कलाकृतींत ‘शांतता कोर्ट चालू आहे’(१९६७), ‘सखाराम बाईंडर’ (१९७१), ‘गिधाडे’ (१९७१) आणि ‘घाशीराम कोतवाल’ (१९७२) ह्या नाटकांचा समावेश होतो.

तेंडुलकरांची नाटकं मानवी नात्यांची गुंतागुंत मांडतात आणि आधुनिक भारतीय समाजव्यवस्थेवर टिप्पणी करतात. तेंडुलकरांनी आपल्या लेखन क्षेत्रातील करीअरची सुरुवात वृत्तपत्रकारितेपासून केली. त्यांचं ‘महाराष्ट्र टाइम्स’ ह्या वृत्तपत्रातून दैनंदिन सदर प्रसिद्ध होऊ लागलं.

तेंडुलकरांनी नाटकांच्या सोबतीनं मराठी आणि हिंदी भाषेतून चित्रपटांसाठी पटकथालेखनही केलं. त्यांच्या ‘मंथन’ह्या चित्रपटाच्या पटकथेला १९७६ साली राष्ट्रीय पुरस्कारने गौरविण्यात आलं. १९८४ साली त्यांना पद्मभूषण ह्या भारतातील महत्त्वपूर्ण नागरी सन्मानानं भूषविण्यात आलं. १९९८ साली, संगीत नाटक अकादमी फेलोशिपने त्यांना जीवनगौरव पुरस्कार देण्यात आला.

​​पॉप्युलर प्रकाशनाविषयी :

पॉप्युलर प्रकाशन ही संस्था गेली ८९ वर्षे आपल्या उत्तम दर्जासाठी प्रकाशनाच्या क्षेत्रात भारतात ओळखली जाते. समाजशास्त्रज्ञ गोविंद सदाशिव घुर्ये, इतिहासकार दामोदर धर्मानंद कोसंबी आणि रोमिला थापर, तसंच राजकीय विचारवंत जयप्रकाश नारायण यांच्या पुस्तकांनी पॉप्युलरच्या इंग्रजी शैक्षणिक विषयींतील प्रकाशनाचा पाया रचला.

पॉप्युलर ही मराठी भाषेतीलही महत्त्वाची प्रकाशनसंस्था आहे. स्वातंत्र्योत्तर साहित्य चळवळींतले, विशेषत्वाने नवकथा, नवकविता, मराठी रंगभूमीवरील नवीन प्रवाह पॉप्युलरच्या माध्यमातूनच वाचकांसमोर आले. मराठी भाषेतील लेखकांना मिळालेले चारपैकी तीन ज्ञानपीठ पुरस्कार (कवी, नाटककार वि. वा. शिरवाडकर, कवी विंदा करंदीकर आणि कादंबरीकार, कवी भालचंद्र नेमाडे) पॉप्युलरच्याच लेखकांना मिळाले आहेत. त्यांशिवाय कवी दिलीप पुरुषोत्तम चित्रे, ना. धों. महानोर, वसंत बापट, मंगेश पाडगावकर, ग्रेस; नाटककार विजय तेंडुलकर, वसंत कानेटकर; लेखक किरण नगरकर, श्याम मनोहर, दुर्गा भागवत, कमल देसाई अशा मराठीतील श्रेष्ठ साहित्यिकांशी पॉप्युलरचे नाव जोडले गेले आहे.

आविष्कारविषयी:

१९७१ साली आविष्कार ह्या नाट्यसंस्थेची स्थापना मुक्त विचार आणि कल्पना मांडण्याच्या हेतूने झाली. आविष्कारनिर्मित विविध संवेदनशील नाटकांच्या सोबतीने त्यांची बालनाट्यंही गाजली. आविष्कारने आजवर १७० हून अधिक नाटकांचे ४२०० हून अधिक प्रयोग केले आहेत. त्यांनी तरुण दिग्दर्शकांना प्रोत्साहन देण्यासाठी विजय तेडूलकरांना समर्पित २४ हून अधिक नाट्यमहोत्सव आयोजित केले. याशिवाय छबिलदास प्रायोगिक नाट्यगृहात, आविष्कारच्या सहयोगाने ५० हून अधिक प्रायोगिक नाटके सादर करणाऱ्या नाट्यसंस्थांनी २००० हून अधिक नाटकांचे प्रयोग केले आहेत.


कार्यशाळा: कागदी शिल्पं​
​स्वप्नाली मठकर ​

​जून १०, २०१८     सकाळी ११ - दुपारी १२.३० सविस्तर वृत्त   

तुम्ही कधी कागदाच्या घड्या घालत त्यातून शिल्प साकारण्याचा प्रयत्न केलाय?

ओरिगामी कला आणि जपानच्या संस्कृतीशी असलेलं ह्या कलेचं नातं उलगडून दाखवतील छायाचित्रकार आणि बालकथा लेखिका स्वप्नाली मठकर. त्या ओरीगामीचा वापर करुन फळं कशी बनवायची ते शिकवतील. तुम्हांला माहितीये, जपानमध्ये लोक भेट म्हणून मस्त सजवलेली फळं देतात. ही त्यांची पारंपारिक पद्धत आहे. ह्या आणि अशा गंमत गोष्टी ऐकण्यासाठी जरुर सहभागी व्हा!


पक्ष्यांच्या दुनियेत | किरण पुरंदरे
ज्योत्स्ना प्रकाशनाच्या सहयोगाने

जून ३, २०१८     सायंकाळी ५ - ६.३० सविस्तर वृत्त   

आभाळातले दूत नयनरम्य रंग लेवून आपल्या भवताली वावरतात. ह्या पक्ष्यांचा अधिवास कुठं, त्यांची स्थानिक आणि शास्त्रीय नावं काय, त्यांच्या सवयी - घरटी - वीण- निसर्गातील भूमिका याविषयी छायाचित्रांच्या माध्यमातून संवाद साधतील निसर्गअभ्यासक किरण पुरंदरे. २००१ पासून तब्बल १३००हून अधिक दिवस नागझिरा अभयारण्यात आणि परिसरात वास्तव्य केलेल्या पुरंदरे यांच्या 'आभाळवाटांचे प्रवासी' आणि 'सखा नागझिरा' ह्या पुस्तकांना उत्कृष्ट साहित्यकृतीचा पुरस्कार महाराष्ट्र शासनाने जाहीर केला आहे.

कोणत्याही कृत्रिम साधनांचा वापर न करता पुरंदरे काही पक्ष्यांच्या आवाजांच्या नकला करुन दाखवतील.

ज्योत्स्ना प्रकाशनाविषयी:

ज्योत्स्ना प्रकाशन गेली साठ वर्षे सातत्याने बालसाहित्य आणि दृष्यकला या विषयांची पुस्तके प्रकाशित करीत आहे. कलेचे विद्यार्थी, हौशी चित्रकारांपासून ते चित्रकलेत रुची असणाऱ्या सर्वानाच ही पुस्तके आवडली आहेत. त्याचबरोबर निसर्ग आणि वन्यप्राणीजीवनावरही काही देखणी पुस्तके त्यांनी प्रकाशित केली आहेत. प्रसिद्ध पक्षी निरीक्षक किरण पुरंदरे, सर्पतज्ञ नीलिमकुमार खैरे अशा नामवंत तज्ञांची ही पुस्तके रंगीत छायाचित्रे आणि अचूक माहिती यामुळे निसर्गप्रेमींच्या पसंतीस उतरली आहेत.


सुमित्रा भावे आणि सुनील सुकथनकरांच्या चित्रपटांचा महोत्सव

मे १४-२०, २०१८ (बुधवार, १६ मे २०१८ व्यतिरिक्त)     सायंकाळी ५.३० वा. - रात्री ८ सविस्तर वृत्त   

सुमित्रा भावे ह्या समाजशास्त्र विषयातील संशोधिका असून, १९८५ पासून सुनिल सुकथनकर यांच्या सोबतीनं त्यांनी चित्रपटनिर्मितीस सुरुवात केली. त्यांनी १५ चित्रपटांचं दिग्दर्शन केलं असून ५० हून अधिक लघुपट, दूरचित्रवाणीकरिता ५ मालिका आणि काही चित्रपट केले आहेत. ह्या दिग्दर्शक द्वयीने स्वतंत्रपणे आणि संवेदनशीलतेनं सामाजिक विषय हाताळता यावेत म्हणून निर्माते म्हणूनही काम केलं. त्यांच्या चित्रपटांना ६ आंतरराष्ट्रीय पुरस्कार, ११ राष्ट्रीय पुरस्कार (सुवर्ण कमळासोबत), इतर अनेक राष्ट्रीय पुरस्कार, ४५ हून अधिक राज्य पुरस्कार आणि अनेक राज्यस्तरावरिल पुरस्कार मिळाले आहेत.

महोत्सवाचे वेळापत्रक:

सोमवार, १४ मे २०१८ | वास्तुपुरुष
(मराठीतून इंग्रजी उपशीर्षकांसह, १५४ मिनिटं, २००२) सरंजामशाही आणि जातीव्यवस्थेपलीकडे जात सामाजिक पातळीवर सगळ्यांना जोडणाऱ्या नव्या जागतिक दृष्टिकोनाची मांडणी

मंगळवार, १५ मे २०१८ | देवराई
(मराठीतून इंग्रजी उपशीर्षकांसह, १२० मिनिटं, २००४)
एका स्किझोफ्रेनियाच्या रुग्णाच्या नजरेतून साकारलेलं देवाच्या राईचं रुपक.

*बुधवारी संग्रहालय जनतेसाठी बंद ठेवण्यात येत असल्याने, त्यादिवशी चित्रपटाचे प्रदर्शन केले जाणार नाही.

गुरुवार, १७ मे २०१८ | संहिता
(मराठी इंग्रजी उपशीर्षकांसह, १३८ मिनिटं, २०१२)
एका महिला चित्रपटनिर्मातीच्या आयुष्याची कथा ती लिहित असलेल्या संहितेच्या माध्यमातून

शुक्रवार, १८ मे २०१८ | हा भारत माझा
(मराठीतून इंग्रजी उपशीर्षकांसह, ११५ मिनिटं, २०११)
भ्रष्टाचाराच्या विरोधातील अण्णा हजारेंच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर एका मध्यमवर्गीय कुटुंबाने घेतलेला आपल्या मूल्यांच्या वेध

शनिवार, १९ मे २०१८ | नितळ
(मराठीतून इंग्रजी उपशीर्षकांसह, १२८ मिनिटं, २००६)
सुंदर दिसणं म्हणजे आपली सह्रदयता आणि वेगळेपणा जपणं, हा विश्वास जपणाऱ्या कोड आलेल्या तरुण डॉक्टर मुलीची गोष्ट

रविवार, २० मे २०१८ | फिर जिंंदगी
(हिंदीतून इंग्रजी उपशीर्षकांसह, ५५ मिनिटं, २०१४)
मृत्यूवर मात करणारं अन् कुणालातरी नवं आयुष्य बहाल करणारं अवयवदान हे श्रेष्ठ दान
चित्रपट प्रदर्शनानंतर चित्रपटनिर्मात्यांची मुलाखत :
महोत्सवाच्या समारोपास सुमित्रा भावे आणि सुनिल सुकथनकर उपस्थित असतील. डॉ. आनंद नाडकर्णी त्यांच्याशी संवाद साधतील.


लिहावे नेटके - माधुरी पुरंदरे | मराठी भाषेच्या समृद्धीची ओळख
पालक व शिक्षकांची दोन दिवसीय कार्यशाळा

एप्रिल २१-२२, २०१८     सकाळी ११ - सायंकाळी ५ m सविस्तर वृत्त   

2010 साली प्रकाशित करण्यात आलेल्या ​माधुरी पुरंदरेंच्या 'लिहावे नेटके' ह्या पुस्तकांच्या ​संचावर आधारीत सदर कार्यशाळा आहे. स्वाध्यायपुस्तिकेच्या माध्यमातून भाषाविकासाचे तंत्र आणि भाषेचा सांस्कृतिक ठेवा जपण्याचा वारसा आपल्या मुलांपर्यंत​ आणि पुढच्या पिढीपर्यंत​ पोहचवण्यासाठी ही कार्यशाळा मदत करेल.

​माधुरी पुरंदरे ह्या मराठी भाषेतील प्रचलित लेखिका आहेत. दृश्यकलावंत म्हणून तालीम घेतलेल्या पुरंदरे ह्यांनी इंग्रजी आणि मराठी भाषेतून लहान मुलांकरिता अनेक पुस्तके लिहिली असून त्यांकरिता रेखांकनही केलं आहे.

​सहभाग शुल्क:​ प्रत्येकी रु.३००/-​
* 'लिहावे नेटके' हा पुस्तकांचा संच सर्वांना सोबत बाळगावा लागेल. विक्रीसाठी सवलतीच्या दरात ही पुस्तके उपलब्ध असतील. सवलत शुल्क: रु.४००/-

संग्रहालयाच्या युट्यूब चॅनेलवरुन हे सदर आपल्याला पाहता येईल.


लघुपट प्रदर्शन मालिका: दिग्दर्शन आणि संशोधन अंजली किर्तने यांचं

दुसऱ्या गुरुवारी | एप्रिल - जुलै २०१८     सायंकाळी ५.३०-७ सविस्तर वृत्त   

एप्रिल - जुलै 2018 दरम्यान, दुसऱ्या गुरुवारी लेखिका आणि दिग्दर्शिका अंजली किर्तने यांच्या

चित्रपटांचं प्रदर्शन आयोजित करण्यात आलं आहे, त्या चित्रपटाचा परिचय करुन देतील.

गुरुवार, १२ एप्रिल २०१८: संगीताचे सुवर्णयुग (१८५०-१९५०) (७० मिनिटं)

गुरुवार, १० मे २०१८: दुर्गा भागवत: एक शोध (७० मिनिटं)

गुरुवार, १४ जुन २०१८: डॉ. आनंदीबाई जोशी: काळ आणि कर्तृत्व (२० मिनिटं)

गुरुवार, १२ जुलै २०१८: गानयोगी: पं. दत्तात्रय विष्णू पलुस्कर (१३० मिनिटं)

अंजली किर्तने ह्या मुंबईत स्थित संशोधिका, लेखिका आणि चित्रपटनिर्मात्या आहेत. त्यांच्या विविध कलाकृती वाचक, प्रेक्षक तसंच नामवंतांनी वाखणल्या आहेत. सदर संशोधन विषयावरिल त्यांचं प्रकाशनदेखील उपलब्ध आहे.


उजेडाशी संवाद | स्त्रीवादी गाणी, कविता आणि किस्से यांची मैफिल

जाने ७, २०१८     सायंकाळी ५ - ७.३० सविस्तर वृत्त   

लोकशाही सर्वांना समान संधी आणि प्रगतीचं आश्वासन देते, तरीही स्त्रियांवर होणाऱ्या अत्याचारांचं प्रमाण कमी होण्याऐवजी वाढतानाच दिसतं. ‘उजेडाशी संवादा’च्या माध्यमातून समाजात वा संस्कृतीमधे पुरुषप्रधान संस्कृती कशी रुजलीये ह्यावर चर्चा होईल. स्त्रीवादी गाणी, कविता आणि दैनंदिन जीवनातील घडामोडींवर नजर टाकत खुलत जाणारा सदर संवाद प्रेक्षकांना आपल्या मनातील लैंगिकतेविषयीच्या संकल्पना, लिंगभेद आणि त्यासोबत -अनवधानानं वा जागरुकतेनं- जोडला गेलेला उच्च-नीच भाव यांवरही भाष्य करेल. मराठी, हिंदी आणि इंग्रजी पंक्तींच्या भवताली गुंफलेल्या आणि समानतेच्या मुद्दयाची कास धरणाऱ्या ह्या कार्यक्रमात प्रेक्षकांनाही आपली मतं मांडण्याची संधी मिळेल.


'कोर्ट' - विषय, प्रेरणा आणि सिनेमाची गोष्ट
दिग्दर्शक चैतन्य ताम्हाणे यांच्यासोबत

डिसें ३, २०१७     सायंकाळी ५ - ७ सविस्तर वृत्त   

'कोर्ट' ह्या आपल्या पहिल्या व्यावसायिक चित्रपटानं चैतन्य ताम्हाणे ह्या दिग्दर्शकानं चित्रपटसृष्टीत प्रवेश केला. १८ हून अधिक आंतरराष्ट्रीय पारितोषिकं तसंच सर्वोत्कृष्ट चित्रपटाच्या राष्ट्रीय पुरस्काराने ह्या चित्रपटास गौरवण्यात आलं. काय होत्या ह्या चित्रपटाच्या निर्मितीच्या प्रेरणा, कसा होता ह्या सिनेमाचा कच्चा आराखडा, आणि काय होती आव्हांनं, जाणून घेऊयात ह्या चित्रपटाचे दिग्दर्शक चैतन्य ताम्हाणे यांच्याकडून!


बाऊल // अभिव्यक्तिचा प्रवास
किशोर कदम

नोव्हें १९, २०१७    सायंकाळी ५ - ७ सविस्तर वृत्त   

सौमित्र अर्थातच किशोर कदम सादर करतील आपल्या काही नव्या कविता आणि कथन करतील संहिता तसंच व्यक्तिरेखांसोबतचा त्यांचा प्रवास. जरुर सहभागी व्हा!


हब्रेरियम​: मराठी रंगभूमीचा सुवर्णकाळ साकारताना
सुनील बर्वे

जुलै १६, २०१७     सकाळी ११.३० - दुपारी १.३० सविस्तर वृत्त   

मराठी नाटकांचा सुवर्णकाळ ज्या नाटकांनी रेखाटला ती नाटकं नव्या पिढीसाठी आणली सुनील बर्वे यांनी. काय होता त्यांचा हा प्रकल्प, कसा साकारला आणि कसा प्रतिसाद मिळाला हर्बेरियमला, जाणून घेऊयात सुनील बर्वे यांच्याकडून.


किशोरी आमोणकर: एक आठवण

जून १८, २०१७     सकाळी ११.३० - दुपारी १.३० सविस्तर वृत्त   

'भिन्न षड्ज्' ह्या किशोरी आमोणकरांच्या सांगितिक प्रवासावर बेतलेल्या चित्रपटाचं प्रदर्शन, माराठी भाषेतून इंग्रजी उपशीर्षकांसाह, ९१ मि. आणि किशोरीताईंचे शिष्य रघुनंदन पणशीकर आणि नंदिनी बेडेकर यांच्यासोबत संवाद

३ एप्रिल २०१७ रोजी गानसरस्वती किशोरी आमोणकर अनंतात विलीन झाल्या. म्युझियम कट्ट्यावरची ही बैठक किशोरीताईंच्या हिंदुस्तानी शास्त्रीय संगीतातील दायित्वाला समर्पित

किशोरीबाई जयपुर घराण्यातील विख्यात कलावंत. त्यांनी भावनेच्या आविष्काराला आपल्या संगीतसाधनेत अग्रक्रम दिला. हे करताना त्यांनी अनेकदा आपल्या घराण्यात आखुन दिलेल्या लयबद्धतेला आव्हान देत, संगीताच्या स्वयंभू मांडणीचा श्रोत्यावर होणारा परिणाम प्रमाण मानत आपली सांगितिक वाटचाल केली.अगदी बालपणीच किशोरीताईंनी गाणं शिकायला सुरुवात केली. त्यांच्या आई, मोगुबाई कुर्डीकर ह्यांनी जयपुर घराण्यातील अल्लादिया खॉंसाहेबांकडून संगीताचं शिक्षण घेतलं. आईकडून जयपुर घराण्याशी परिचित होत असतानाच आमोणकर यांनी स्वत:ची अशी वेगळी शैली घडवली, ज्यावर अनेक घराण्यांतील शैलींचा प्रभाव होता.

'भिन्न षड्ज्' ह्या अमोल पालेकर आणि संध्या गोखले दिग्दर्शित चित्रपटातून आमोणकरांचा सांगितिक प्रवास समोर येतो तो उस्ताद झाकिर हुसैन, पं. हरी प्रसाद चौरसिया आणि उस्ताद अमजद अली खान यांच्या किशोरीबाईंच्या गाण्याबद्दलच्या नोंदीसोबत. त्यांच्या संगीतातील खुबी आणि आर्तता संगीतविश्वातील विविध प्रतिभावंताकडून आपल्याला ह्या चित्रपटातून कळते. किशोरीताई स्वत:, रागामागचा त्यांचा विचार विषद करतात, अद्वैताकडे नेणाऱ्या षड्जाविषयी सांगतात. मोगुबाईंच्या गाण्यांचे रिकॉर्डिंग्ज् ह्या चित्रपटात आपल्याला ऐकता येतात. झाकिर दुसैन म्हणतात, "किशोरीताईंच्या संगीतात ओथंबून वाहणारा आनंद आहे, प्रचंड दुख:, तीव्र द्वेष, निराशा आणि आर्तता आहे. सगळ्यातलं सत्व त्या आपल्या पुढ्यात ठेवतात. ..त्यांचं गाणं ऐकताना एखाद्याच्या व्यक्तिचित्रातल्याप्रमाणं एकन् एक बारकावा टीपत पुढं जावं तसं त्याचं गाणं ऐकताना होतं.

ह्या चित्रपटप्रदर्शनानंतर किशोरीताईंचे शिष्य नंदिनी बेडेकर आणि रघुनंदन पणशीकर आपले किशोरीताईंच्या सहवासातले, त्यांच्याकडून गाणं शिकतानाचे, त्यांना गाण्यात साथ करतानाचे अनुभव कथन करतील.


तमाशाची सद्यस्थिती
संदेश भंडारे ​

जून ११.२०१७    सकाळी ११.३० - दुपारी १.३० सविस्तर वृत्त   

म्युझिय़म कट्टा/ लोककलेच्या ह्या अंकात संदेश भंडारे महाराष्ट्रभर विखुरलेल्या तमाशाच्या फडांवर त्यांनी केलेलं संशोधऩ सादर करतील.

लावण्यगीत सादर करणारी ती लावणी. पेशव्यांच्या अन् मुघलांंच्या दरबारातील लढवय्या कुमकीच्या रंजनाकरिता आकाराला आलेली ही लोककला, तब्बल 300 वर्षं जुनी! तमाशाच्या फडातील स्त्री कलाकारांनी सादर केलली विविध पंक्ती, नृत्यकला आणि मिश्किल रचनांतून साकारलेली ही पेशकश.

२००१ साली, द इंडिया फाऊंडेशन फॉर आर्टनं संदेश भंडारे यांना तमाशाच्या फडांवर संशोधन करण्याकरिता अनुदान जाहिर केलं. महाराष्ट्रातील कोकण, मराठवाडा आणि विदर्भात आयोजित विविध यात्रा अन् जत्रांना भेट देत त्यांनी ह्या लोककलेचं दस्ताऐवजीकरण करायला सुरुवात केली. तब्बल ७००० हून अधिक छायाचित्रांच्या माध्यमातून ह्या फडातील अनेक कलावंतांचं जगणं, सामाजिक आणि सांस्कृतिकदृष्ट्या उपेक्षित अशा ह्या कलाकार वर्गाची परिस्थिती त्यांनी तपशीलवार मांडली. भंडारे यांनी २००६ साली हे सारं आलेखन पुस्तकरुपानं प्रकाशित केलं. फडाची आर्थिक घडी, लावणी सादर करण्याच्या प्रादेशिक शैली, तमाशाच्या रुढ संकल्पना आणि ही लोककला पेश करणाऱ्या कलावंताची विवंचना अन् घुसमट, या साऱ्याचं संवेदनशील टिपण भंडारे यांनी, रुपेरी आणि जसं दिसलं तसं छायांकित केलंय.

संग्रहालयाच्या युट्यूब चॅनेलवरुन हे सदर आपल्याला पाहता येईल.


म्युझियम कट्टा // सिनेमा
अमोल पालेकर

एप्रिल २३, २०१७    सकाळी ११.३० - दुपारी १.३० सविस्तर वृत्त   

समकालीन विषयांना साद घालणारा प्रायोगिक, तसंच उच्च निर्मितीमूल्य असणारा आशयघन सिनेमा म्हणून मराठी चित्रपटांची जगाला होऊ घातलेली असलेली ओळख ही चित्रपट इतिहासातील एका महत्वाच्या टप्प्याची नोंद करते. १९१३ सालापासून आजवर बदलत गेलेल्या मराठी चित्रपटाच्या प्रवासाचा वेध घेतील ख्यातनाम अभिनेते, चित्रपटनिर्माते अमोल पालेकर.

संग्रहालयाच्या युट्यूब चॅनेलवरुन हे सदर आपल्याला पाहता येईल.


शब्द-चित्रप्रवास
माधुरी पुरंदरे

एप्रिल ९, २०१७    सकाळी ११.३० - दुपारी १.३० सविस्तर वृत्त   

लेखन, गायन आणि चित्रकला असे विविध कलाप्रकार लिलया हाताळणाऱ्या माधुरी पुरंदरे​ ​उलगडतील आपला कलाक्षेत्रातील प्रवास!

​पुरंदरे यांनी ​दृष्यकलेची गोडी समाजाला लागावी या हेतूनं​ सुरु​वातीला​ हाती घेतलेल्या प्रकल्पांनी पुढे जाऊन चिमुकल्यांच्या विश्वात प्रवेश केला. शब्द-दृष्यभाषेची लहानग्यांना ओळख करुन देताना​,​ ​त्यांनी ​पालकांनाही ह्या वाचनप्रकल्पांत सामावून घ्यायला सुरुवात केली. ह्या ​वाटचालीतील त्यांच्या प्रेरणा,​ त्यांना पडलेले प्रश्न आणि त्यांतून त्यांच्या ​'​कलाकृती​'​ कशा साकार झाल्या, जाणू​न​ घेऊयात त्यांच्याकडूनच हा ​त्यांचा हा ​शब्द-चित्रप्रवास!