प्रदर्शने

मोफत अभ्यास दौरे

प्रत्येक आठवडाअखेरीस संग्रहालयाच्या
अभिरक्षकांकडून संग्रहालयाची माहिती मिळवा

शनिवार
सकाळी ११.३० वा इंग्रजीतून
दुपारी १२.३० वा मराठी/हिंदी भाषेतून
सर्वांसाठी खुले.

बंगालची माणसं: एफ्. बाल्टाझार्ड सॉल्व्हेन्स यांचे बहुरंगी एचिंग्जस्

कलाकाराने पॅरिस आवृतीत प्रस्तुत केलेल्या सर्व एचिंग्जस् चं डि.ए.जी.चं प्रदर्शन

२७ एप्रिल - २९ जुन २०२४

सकाळी १० - संध्याकाळी ५.३०
मोफत प्रवेशसॉल्व्हेन्स (१७६०-१८२४) हा एक फ्लेमिश कलाकार होता ज्याने १७९०च्या दशकात बंगालमध्ये राहून येथील लोकसंस्कृती आणि जीवनशैलीचं दस्तऐवजीकरण केलं. १८०८ ते १८१२ दरम्यान पॅरिसला जाऊन त्याने 'द हिंदुज्' या शीर्षकाअंतर्गत आपल्या शंभरहून अधिक रेखाचित्रांच्या एचिंग्जस् ची चार खंडांची दुसरी आवृत्ती प्रकाशित केली, आणि त्यातीलच एचिंग्जस् सदर प्रदर्शनात मांडण्यात आली आहेत. अठराव्या शतकाच्या अखेरीस, पूर्व भारतातील लोक आणि त्यांच्या रीतिरिवाजांचे वैश्विक दृष्टिकोनातून, आम्लाच्या उठावानं धातूवर साकारलेल्या रेखांकनांच्या बहुरंगी प्रती ‘द हिंदूज्’ ह्या चार दिर्घ खंडांच्या मालिकेच्या माध्यमातून फ्रँकोज् बाल्टाझार्ड सॉल्व्हेन्स याने साकारल्या. हा कलाकार १७९१ साली कलकत्त्यात आला आणि एका दशकाहून अधिक काळासाठी तो इथे राहिला. यादरम्यान त्याच्या कामाचा केंद्रबिंदू बंगाल आणि त्यानजीकच्या प्रदेशातील लोक बनले.

सॉल्व्हेन्सचा जन्म आणि त्याचं प्रशिक्षण अँटवर्पमध्ये झालं. सॉल्व्हेन्स आपलं नशीब आजमावण्याच्या हेतूने भारतात आला. ईस्ट इंडिया कंपनीच्या संचालक मंडळाच्या परवानगीशिवाय कलकत्त्यात आल्यामुळे तो युरोपियन समाजाच्या मुख्य वस्तीपासून एका अंतरावरच राहिला. आपल्या वास्तव्यादरम्यान तो भवतालच्या भारतीय जीवनाच्या बहुविध पदरांचा मागोवा घेऊ लागला. पडतील ती कामं करत, त्याने 'हिंदूंचे शिष्टाचार, चालीरीती आणि पोशाख' ह्या सर्वसमावेशक सर्वेक्षणाचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प हाती घेतला. हाताने रंगवलेल्या आणि आम्लाच्या उठावानं धातूवर साकारलेल्या रेखांकनांच्या २५० प्रतींची पहिली आवृत्ती त्याने १७९६ ते १७९९ दरम्यान कलकत्त्यात प्रकाशित केली. ही आवृत्ती व्यावसायिकदृष्ट्या यशस्वी ठरली नाही आणि मग सॉल्व्हेन्स युरोपला परतला. अपयशाने खचून न जाता, त्याने पॅरिसला जाऊन १८०८-१२ दरम्यान, फ्रेंच आणि इंग्रजी अशा दोन भाषांत वर्णनात्मक मजकूर समाविष्ट करत, आणि काही अतिरिक्त प्लेट्स् चा समावेश करत,एकूण २८८ प्लेटस् ची विस्तारित आवृत्ती प्रकाशित केली.

सॉल्व्हेन्सच्या सुधारित आवृत्तीलाही वाचकांचा समाधानकारक प्रतिसाद लाभला नाही. त्यांना भारतीय देखावे आणि येथील भव्य वास्तुरचनांनी संपन्न थॉमस आणि विल्यम डॅनिएल यांच्या नयनरम्य निसर्गचित्रांनी भुरळ घातली होती. त्यांचं कौतुक वाटणं, सॉल्व्हेन्स जे करु पाहत होता त्याच्या तुलनेनं सोपं होतं. सॉल्व्हेन्स सामान्य लोकांवर लक्ष केंद्रित करत होता. त्यानी केलेलं त्यांचं प्रतिमांकन अनेकदा उदासिन असे. आधुनिक विचारात वाढलेल्या समाजाला आज त्याचं काम वेगळ्या नजरेतून पाहता येऊ शकतं. सॉल्व्हेन्सने केलेलं चित्रण हे निश्चितच ह्या मातीतील माणसानं केलेलं नाही, आणि त्याचमुळे तो ज्या दृष्टिकोनातून आपली निरिक्षणं नोंदवतो, त्यात अनेक मुद्दे आक्षेपार्ह, अस्वस्थ करणारे ठरतात. मात्र सॉल्व्हेन्सचं चित्रण तपशीलवार आहे, शिवाय लोकांच्या नजीक जाऊन केलेलं हे व्यक्तिचित्रण आहे. भारतीय समाजाच्या प्रत्येक स्तरातील प्रतिनिधींचा तसंच प्रत्येक व्यवसायाचा समावेश त्याच्या व्यक्तिचित्रणात पाहायला मिळतो. सॉल्व्हेन्स सण आणि पवित्र संस्कारांचं चित्रण करतो; तो संस्कृतीच्या भौतिक परिभाषेचं दर्शन घडवतो, जसं नदीतील नौका, संगीतवाद्यं जी त्या काळी सहज पाहायला मिळत.

प्रत्येक व्यक्ती आणि वस्तू सॉल्व्हेन्सने अगदी जवळून पाहिल्याचं जाणवतं, ती कधी उपहासाने, तर कधी उदास-गंभीर भव्यतेने, मात्र नेहमीच माहितीपूर्ण आणि जिज्ञासू नजरेनी साकारल्याचं आपल्या लक्षात येतं. इतर अनेक कलाकारांनी त्याच्या प्रतिमांच्या प्रतिकृती साकारल्या, त्यांची नक्कल केली, त्यात त्यांनी सॉल्व्हेन्सनं रेखलेल्या प्रतिमांकलाला सोपं आणि अधिक आकर्षक बनवलं, आणि त्याचमुळे त्यांच्या ह्या निर्मितीला उत्तम उचलही राहिली. आज आपल्याला सॉल्व्हेन्स खिळवून ठेवतो कारण तो एक महत्वाचा कलाकार होता, ज्याने आपल्याला आनंदित करण्याचा प्रयत्न न करता, त्यानं निर्माण केलेल्या जगाचा सामना करण्यास, त्याबद्दल थोड्या काळासाठी का होईना चर्चा-विचार करण्यास तो आपल्याला प्रवृत्त करण्याचं माध्यम बनला.

सॉल्व्हेन्सच्या प्रतींवर नमूद केली गेलेली शीर्षकं गोंधळात टाकणारी आहेत, कारण त्यात बंगाली शब्दांचा ध्वनी फ्रेंच भाषेत रुपांतरित करण्याचा प्रयत्न केल्याचं दिसतं. इथं सुचवलेल्या शीर्षकांत आम्ही शब्दलेखनाचं आधुनिक प्रमाण अंगिकारलं आहे, परंतु प्लेटस् वर कोरलेले शब्दही आपल्या संदर्भासाठी आम्ही समाविष्ट केले आहेत.


Image Gallery