प्रत्येक आठवडाअखेरीस संग्रहालयाच्या
अभिरक्षकांकडून संग्रहालयाची माहिती मिळवा
शनिवार
सकाळी ११.३० वा इंग्रजीतून
दुपारी १२.३० वा मराठी/हिंदी भाषेतून
सर्वांसाठी खुले.
दहा वर्षांपूर्वी प्रफुल्ला डहाणूकर कला प्रतिष्ठानाने सुरू केलेला कलानंद हा अनुदान देणारा ऑनलाईन उपक्रम असून, याअंतर्गत भारतातील शहरांसोबतीनं दुर्गम भागांतीलही उदयोन्मुख कलाकारांना, सातत्याने प्रोत्साहन देत, त्यांच्या कलाकृती प्रदर्शित करण्याची संधी प्रदान केली जाते. कलाकृतींची निवड सुप्रसिद्ध कला इतिहासकार, समीक्षक आणि कलाकार यांचा समावेश असलेली निवडसमिती, अतिशय जबाबदारीनं आणि विचारपूर्वक निश्चित करण्यात आलेल्या प्रक्रियेद्वारे करत असते. ऑनलाईन नोंदींचे पुनरावलोकन तीन प्रख्यात विषयतज्ज्ञांच्या समितीकडून दोन टप्प्यांत केलं जातं. निवडसमितीतल्या सदस्यांना कलाकारांची नावं न कळवता, वस्तुनिष्ठ पद्धतीनं, मूल्यांकन केलं जातं. २०२३-२४च्या कलानंद स्पर्धेच्या आवृत्तीसाठी तीनशेहून अधिक प्रवेशिका प्राप्त झाल्या. यांतील दहा कलाकारांना अखिल भारतीय सुवर्णपदकानं, तर पंधरा कलाकारांना गुणवत्ता प्रमाणपत्रानं सन्मानित करण्यात येत आहे. पुरस्कारप्राप्त कलाकृतींच्या ह्या प्रदर्शनासाठी, सर्व विजेत्या कलाकारांना आमंत्रित करण्यात आलं आहे.
डॉ. भाऊ दाजी लाड संग्रहालयाला प्रफुल्ला डहाणूकर कला प्रतिष्ठानाच्या सहयोगाने, उदयोन्मुख कलाकारांना प्रोत्साहन देण्याच्या हेतूनं, २०१९नंतर दुसऱ्यांदा व्यासपीठ उपलब्ध करुन देताना, कलानंद प्रस्तुत करताना आणि स्पर्धेतील विजेत्यांच्या कलाकृतींचे प्रदर्शन आयोजित करताना आनंद होत आहे. चित्रकला, रेखाचित्र, मुद्रणकला, मातकाम, शिल्पकला आणि टेपेस्ट्री या सहा श्रेणींमधील पंचवीस विजेत्या कलाकृती प्रदर्शनात सादर केल्या जात आहेत.
प्रफुल्ला डहाणूकर कला प्रतिष्ठान ही ना-नफा तत्वावर काम करणारी संस्था असून त्यांचा मानस भारतातील कलाकारांचा समुदायाची वीण घट्ट करण्याचा, आणि प्रतिभावान उदयोन्मुख कलाकारांना हेरुन, त्यांच्या कलाकृतींना प्रसिद्धी मिळवून देण्याचा आहे. कलानंद अनुदान कार्यक्रमाअंतर्गत भारतातील उदयोन्मुख कलाकारांना सहाय्य केलं जातं, प्रतिष्ठानाच्या ह्या उपक्रमाला भौभोलिकदृष्ट्या व्यापक क्षेत्रातून प्रतिसाद मिळतो.