प्रदर्शने

मोफत अभ्यास दौरे

प्रत्येक आठवडाअखेरीस संग्रहालयाच्या
अभिरक्षकांकडून संग्रहालयाची माहिती मिळवा

शनिवार
सकाळी ११.३० वा इंग्रजीतून
दुपारी १२.३० वा मराठी/हिंदी भाषेतून
सर्वांसाठी खुले.

फुलांची गुंफण, भिरभीरते डाग आणि तरंगते रेशीम

एकल प्रदर्शन अर्चना हन्दे

प्रदर्शन संकल्पना तस्नीम झकारिया मेहता

१० जानेवारी - १ मार्च, २०२६

कमलनयन बजाज विशेष प्रदर्शन दालन, चित्रकला दालन, मुंबईचे उगमदालन, औद्योगिक कलादालन



डॉ. भाऊ दाजी लाड संग्रहालय सहर्ष प्रस्तुत करीत आहे, कलाकार अर्चना हन्दे यांचे प्रदर्शन, ‘फुलांची गुंफण, भिरभीरते डाग आणि तरंगते रेशीम’. हन्दे शांतीनिकेतन आणि एम.एस. युनिव्हर्सिटी बडोदा येथील माजी विद्यार्थिनी आहेत. त्यांचे कार्य, कामगारविषयक धोरणे आणि पद्धतींच्या माध्यमातून ओळख आणि संस्कृतीमध्ये वसाहतवादाने केलेल्या फेरफाराचा शोध घेते. त्यांनी मुंबई, बेंगलुरू, मंगळुर, चेन्नई, कोलकाता, कोची आणि इतर शहरांचा पाया ठरलेल्या कापड उद्योगाचा क्लिष्ट इतिहास मांडला आहे. ह्याद्वारे त्या नागरी संस्कृतीतील बदल आणि आकांक्षा; सत्तासंबंध निर्माण करणारे सूक्ष्म पैलू; कामगारांचे/कारागिरांचे दुर्लक्षित राहिलेले अपार कष्ट; स्थलांतर, अधिवास आणि उपजीविका हिरावली गेल्यामुळे होणारा वारशाचा ऱ्हास; तसेच कापडात विणलेले इच्छा आणि स्मृतींचे गूढ व उत्कट अनुभव यांवर भाष्य करतात. त्यांनी मुंबईतील कापड उद्योग आणि कामगार चळवळींचा सखोल अभ्यास केला असून, त्यांच्या कलाकृती ह्या संशोधनाचा आधार घेत अत्यंत ताकदीने दृश्य कथा प्रस्तुत करतात.

हन्दे यांनी एक कापड निर्मितीचं माध्यम – जॅकार्ड पंचिंग पटल आणि त्यांनी स्वतः कोरीव काम केलेले ब्लॉक प्रिंट्स ह्यांचा वापर एक 'ज्ञानशास्त्रीय साधन' म्हणून आणि त्याचबरोबर अदृश्य आणि उपेक्षित कारागीर व श्रमिकांना वाहिलेली एक 'कलात्मक आदरांजली' म्हणून केला आहे. त्यांची ही कलाकृती संग्रहालयातील वस्तू घडवणाऱ्या त्या अज्ञात कारागिरांच्या स्मृतींनादेखील उजाळा देते. सुरुवातीच्या काळातील मानववंशशास्त्रज्ञ आणि पुराभिलेखागारांप्रमाणेच त्यांनी ह्या कष्टकऱ्यांच्या कथा एकत्रित करून, त्यांच्याआधारावर स्वतःचे कथाविश्व विणले आहे.

हा विस्तीर्ण कॅनव्हास म्हणजे जणू काही एक शहर आहे, जिथे औद्योगिकीकरणामुळे विस्थापित झालेल्या कापड गिरणी कामगारांसह अनेक स्थलांतरित रोजगाराच्या शोधात येतात. त्यांच्या आकांक्षा आणि इच्छा ह्या जगाला सजवणाऱ्या कापडामध्येच विणलेल्या असतात. हन्देंच्या कलाकृती पुढे सौंदर्याच्या धारणा आणि लोकांच्या अस्मिता व समाज ह्या संकल्पनांवर जगणाऱ्या जाहिरातबाजीच्या कुटिल आकर्षणाचाही वेध घेतात.


अधिक माहिती   

पिढीजात वारशाने पुढे आलेले ग्रामीण उद्योग ते गिरण्यांमध्ये प्रचंड प्रमाणावर होणाऱ्या कापड उत्पादनापर्यंत, कापड उद्योगाचे झालेले स्थित्यंतरच भारत आणि जगातील अनेक शहरांची समृद्धी आणि विकासाचा पाया ठरले. विरोधाभास असा की, हे आजच्या काळात घडणाऱ्या तांत्रिक परिवर्तनाचेच प्रतिबिंब आहे. हे काम जरी भूतकाळाचे कथन करत असले, तरी ते भविष्याचाही वेध घेते; आणि आपल्याला आपल्या पर्यावरणसाठीच्या प्रतिक्रिया व स्वतःच्या आकांक्षांचा विचार करण्यासाठी एक दृश्य आराखडा उपलब्ध करून देते.

प्रदर्शन सहकार्य केमोल्ड प्रेस्कॉट रोड
अतिरिक्त सहाय्य मॅक्स म्युलर भवन, मुंबई


Exhibitions