प्रदर्शने

मोफत अभ्यास दौरे

प्रत्येक आठवडाअखेरीस संग्रहालयाच्या
अभिरक्षकांकडून संग्रहालयाची माहिती मिळवा

शनिवार
सकाळी ११.३० वा इंग्रजीतून
दुपारी १२.३० वा मराठी/हिंदी भाषेतून
सर्वांसाठी खुले.

अभिजात लघु-वेशभुषा

गीता खंडेलवाल

२ ऑक्टोबर ते २८ ऑक्टोबर २०१९

भारतीय महाराजांनी उत्सवप्रसंगी आणि दैनंदिन जीवनात इ. स. १८५०-१९५० दरम्यान परिधान केलेल्या पेहरावांवरुन प्रेरित

भारतीय पेहरावांचं क्षेत्र विविधांगी आणि व्यापक आहे, जे निगुतीनं विणलेल्या सुती कापडासोबत दर्जेदार रेशमी ब्रोकेडपासून ते उंची वेल्वेटला सामावून घेतं.वस्त्राचा प्रत्येक नमुना माध्यमांतील वैविध्य आणि देशातील विणकामाची विविध तंत्रं पेश करतो; नाजुक भरतकाम, मणी वा साधारण दर्जाच्या खड्यांनी केलेलं आभूषण यांचा समावेश वस्त्रकामाच्या सुशोभनात होतो.

दरबारातील आपलं स्थान आणि आपल्याकडील सुबत्ता प्रदर्शित करण्याच्या हेतूने राजे-महाराजे उत्तम पोषाख वापरत असत; वस्त्र परिधान करण्याची मौज त्यांच्याइतकी इतर कुणीही अनुभवली नाही. भारतीय वातावरणात वस्त्र जतन करणं अतिशय कठिण बनतं; त्यामुळे आज गतकालीन वस्त्रांचे नमुने पेहरावांच्या मुळ स्वरुपात दुदैवाने उपलब्ध नाहीत. वेशभूषांतील संपन्न वैविध्य अभ्यासताना, त्यांच्या दृष्यरुपाचा अंदाज बांधत ती पाहणं हे तत्कालिन ऐतिहासिक दस्ताऐवज, चित्रं तसंच शिल्पांच्या माध्यमातून शक्य होतंय. काही पारंपारिक पद्धती आणि तंत्रांचं अवलोकन आजही देशात केलं जातं आणि त्या पद्धतींनी वस्त्रनिर्मिती केली जाते.

वस्त्र आणि वेशभूषा कलाकार गीता खंडेलवाल यांनी सदर प्रदर्शनात भारतातील राजा-महाराजांनी उत्सवाच्या प्रसंगी आणि दैनंदिन जीवनात इ. स. १८५०-१९५० दरम्यान परिधान केलेल्या पेहरावांचे अतिशय निगुतीनं बनवलेले छोटेखानी नमुने मांडले आहेत. बी. एन्. गोस्वामी आणि कल्याण कृष्णा यांच्या ‘इंडियन कॉस्च्युमस् इन द कलेक्शन ऑफ द कॅलिको म्युझियम ऑफ टेक्टाईलस्’ ह्या कॅलिको संग्रहालयावरिल प्रकाशनावरुन वस्त्र आणि वेशभूषाकार गीता खंडेलवाल यांची ही पुर्ननिर्मिती आधारलेली आहे. तरला पी. धुंढ ह्यांनी अचूक मोजमापं मांडत पेहरावांच्या नमुन्यातील विविध भागांची नोंद सदर प्रकाशनाकरता केली आहे. पेहरावांच्या पुर्ननिर्मितीकरता वापरलेल्या कापडांचे विविध प्रकार, भरतकामाचे तपशील, बटणं आणि वीणीच्या प्रकारांची रेखांकनासोबत नोंद त्यांनी घेतली आहे.

पुस्तकातील वस्त्रनमुन्यांचा आधार घेत, गीता यांनी जामा, अंगरखा, चोगा आणि शेरवानीसोबतचा लांब झग्याचा पुरुषांचा पेहराव साकारला आहे. प्रत्येक छोटेखानी कलाकृती ही भरतकाम आणि शिवणकाम करणाऱ्या तज्ञ कारागीरांच्या सहयोगाने गीता यांनी हाताने साकारली आहे. एकोणिसाव्या शतकाच्या पूर्वार्धापासून भारतीय वस्त्रनमुन्यांत आढळून येणारं वैविध्य अधोरेखित करत, गीता त्यांच्या वैयक्तिक संग्रहातील गतकालाचं स्मरण करुन देणाऱ्या वस्त्रनमुन्यांचा वापर आपल्या प्रतिकृतींच्या निर्मितीसाठी करतात. वारणासीतील तलम रेशीम आणि ब्रोकेड, गुजरात आणि राजस्थानमधील हातानं मारायच्या ठस्यांचा (ब्लॉक प्रिंटींगचा) वापर, बंगालमधील मस्लिन कापड, काश्मिरमधील पश्मिना जामावर आणि लखनौमधील चित्रकारी भरतकामाचा ह्यात समावेश होतो.

गीता खंडेलवाल ह्या मुंबईस्थित वस्त्र आणि वेशभूषाकार कलावंत असून त्या गेली पन्नास वर्षं सदर क्षेत्रात कार्यरत आहेत. त्या तळमळीनं गोधडय़ा विणणाऱया विणकार आहेत, तसंच त्या २००३ ते २००८ दरम्यान इंटरनॅशनल क्विल्ट स्टडी सेंटरच्या मंडळावर होत्या. त्यांनी जगभरातील गोधडीच्या विविध प्रदर्शनात आपला सहभाग नोंदवला असून त्यात हुस्टन क्विल्ट फेस्टिवल (१९८५) आणि पॅचवर्क क्विल्च फेस्टिवल ऑफ ऍलसाक्, फ्रान्स (२०१४) यांचा समावेश होतो. गीता ह्या ‘गोधरीज् ऑफ महाराष्ट्र, वेस्ट इंडिया’ ह्या पुस्तकाच्या लेखिका आहे. (२०१४)

- मोनिषा अहमद