प्रत्येक आठवडाअखेरीस संग्रहालयाच्या
अभिरक्षकांकडून संग्रहालयाची माहिती मिळवा
शनिवार
सकाळी ११.३० वा इंग्रजीतून
दुपारी १२.३० वा मराठी/हिंदी भाषेतून
सर्वांसाठी खुले.
विशेष प्रकल्प दालन, संग्रहालयाचं प्रांगण
सकाळी १०.०० - संध्याकाळी ०५.३०
मोफत प्रवेश
शत-सहस्त्र सूर्य प्रतिमांकनं हे प्रदर्शन रोहिणी दिवेशर यांच्या चार व्हिडिओज् ची प्रभावी आणि भासमान मांडणी भारतात पहिल्यांदाच प्रस्तुत करतं. ज्यात चार वेगवेगळ्या पातळ्यांवर सूर्यप्रतिमांकनाचा वेध घेतला गेला आहे: भौतिक, क्षणिक, वैयक्तिक आणि भौगोलिक. १९०१ पासून कोडाईकनाल येथील सौरवेधशाळेतील कर्मचाऱ्यांनी गेल्या १२५ वर्षांत दररोज आपल्या सर्वात जवळच्या ताऱ्याला छायबद्ध केलं. अशा एकूण १,५७,००० सूर्यप्रतिमांच्या समुच्चयातून सदर दृकश्राव्य कलाकृती आकाराला आली आहे. वेधशाळेतील निरिक्षणांचे दस्तावेज, नासाचा मुक्त वापरासाठी उपलब्ध ऐवज, आपल्या खाजगी संग्रहातील छायाचित्रं, रेखांकनं, व्हिडिओज्, आणि ग्रहणाचा मागोवा घेणाऱ्यांच्या मुलाखतींचं संकलन, यांचा आधार दिवेशर घेतात. यातून त्या खगोलशास्त्रीय निरिक्षणांचा गुंता, आणि पाहण्याचा अनुभव अद्भुत, रंजक, आणि अपेक्षेहून अधिक बहुपदरी कोणकोणत्या माध्यमातून होऊ शकेल याचा मागोवा घेतात. सदर एकल प्रदर्शनात दिवेशर सूर्याच्या अभ्यासास पूरक नोंदींतून तांब्याच्या पृष्ठभागावर साकारलेली सूर्य चित्रं, छायांची प्रतिमांकनं, आणि आकाश अवलोकन, या तीनही कलाकृतींची नवी शृंखला मांडतात.
रोहिणी दिवेशर ह्या डॉइच बँकेच्या २०२४ सालच्या 'आर्टिस्ट ऑफ द इयर' पुरस्काराच्या मानकरी आहेत. ग्रहणांचा माग घेण्याचा दिवेकर यांचा ध्यास आणि हौशी खगोलशास्त्रज्ञ म्हणून त्यांनी नोंदवलेल्या निरिक्षणांचा आधार सांगणाऱ्या त्यांच्या कलाकृती सखोल, आणि संशोधनच्या मजबूत पायावर साकारलेल्या असून, विज्ञान, कला आणि तत्वज्ञान यांचा नेमका समन्वय त्यांत पाहायला मिळतो. दिवेशर यांना मानव आणि मानवेतर विश्वातील उत्पत्तीचा शोध नव्यानं घेण्याचा धागा स्थान, निरीक्षक, आणि निरीक्षणं यांच्या बदलत्या जागांचा माग घेताना गवसत जातो.