प्रदर्शने

मोफत अभ्यास दौरे

प्रत्येक आठवडाअखेरीस संग्रहालयाच्या
अभिरक्षकांकडून संग्रहालयाची माहिती मिळवा

शनिवार
सकाळी ११.३० वा इंग्रजीतून
दुपारी १२.३० वा मराठी/हिंदी भाषेतून
सर्वांसाठी खुले.

राहून गेलेलं क्षेत्रावलोकन

रीना सैनी कल्लाट
संकल्पना तस्नीम झकारिया मेहता

३१ जानेवारी - ६ एप्रिल २०२५

कमलनयन बजाज विशेष प्रदर्शन दालन
सकाळी १०.०० - संध्याकाळी ०५.३०



डॉ. भाऊ दाजी लाड संग्रहालयास राहून गेलेलं क्षेत्रावलोकन ह्या प्रदर्शनाचं लोकार्पण करताना अतिशय आनंद होतो आहे. भारतातील प्रथितयश कलाकारांत समाविष्ट रीना सैनी कल्लाट यांचं हे एकल सर्वेक्षण प्रदर्शन असून, त्या सर ज. जी. कलामहाविद्यालयाच्या माजी विद्यार्थी आहेत. कलामहाविद्यालय आणि संग्रहालय, यांतील सामाईक ऐतिहासिक बांधणीमुळे त्यांची नाळ परस्परांशी जोडलेली राहिली.

सैनी कल्लाट यांच्या कलाकृतींत, अन्याय आणि माणसाचा मदमत्त स्वभाव यांच्यातील घट्ट नात्याचं प्रतिबिंब उतरलेलं दिसतं. माणसांचं परस्परांसोबतचं नातं, त्यांना आपल्या मातीबद्दल वाटणारी जवळीक, बांधिलकी आणि काळजी, यांतच मनुष्यस्वभावाच्या विविध छटांची मुळं दडलेली दिसतात. इतिहासातील प्रक्षुब्ध कालक्रमाचा आणि दुरावलेल्या समुदायांचा मागोवा, त्या काटेरी तारांच्या रुपकातून प्रस्तुत करतात. सीमारेषांच्या अविचारी रेखांकनातून, अन्यायाचा ऐतिहासिक कालपट आपल्यापुढे उभा राहतो; वसाहतवाद्यांनी आपल्या वसाहतींसाठी सारासार विचाराअभावी आखलेल्या सीमा आज जगाला सातत्याने वेठीस धरुन असलेल्या तणावाचं कारण बनल्यायेत. सरत्या काळासोबत तसंच मध्यस्थी करताना धुसर होत गेलेले चिंतेचे विषय, सैनी कल्लाट आपल्या कलाविष्कारातून अधोरेखित करतात, त्यांना केंद्रस्थानी आणतात. १९ व्या शतकात संग्रहालयाची स्थापना सांस्कृतिक विचारधारा नियंत्रित करणारी पुरातन वसाहतकालीन संस्था म्हणून करण्यात आली. सैनी कल्लाट यांच्या कलाकृती संग्रहालयात मांडल्यानंतर, त्यांना येथील ऐतिहासिक संदर्भांमुळे विशेष आयाम लाभतो.


अधिक माहिती   

एकीकडे सीमावाद, तर दुसरीकडे निसर्ग ज्याला कोणत्याही सीमा माहित नाहीत; सैनी कल्लाट, ह्या साऱ्या संदर्भांचं एकत्रित अवलोकन करत अश्या जगाची कल्पना करतात जिथं संघर्ष सोडवले जातात, ऐक्याचं बीज पेरत, सर्व प्राणीमात्रांच्या फायद्याच्या उदात्त विचारानं, व्यर्थ विचार दूर सारले जातात. हवामानातील संतुलन उध्वस्त करणाऱ्या अनेक आपत्तींना माणसाने आपल्या मदमत्त स्वभावामुळे आमंत्रित केलं, अनेक प्रजाती नामशेष होण्यास पूरक वातावरण निर्माण केलं. ह्या विषयावर भाष्य करताना, आपण आपल्याला एकत्र बांधून ठेवणाऱ्या, खोलवर रुजलेल्या नीतीमूल्यांची पुर्नओळख करुन घेण्यासाठी सैनी कल्लाट आपल्याला साकडं घालतात. पृथ्वीवरील जीवन कायम ठेवणारे बंध घट्ट करण्याचा जागरुक विचार लावून धरणाऱ्या सैनी कल्लाट यांच्या कलाकृती, दयाळू, सौम्य, आणि अधिक न्याय्य जगापुढे केलेलं काव्यात्म आवाहनच आहे.

केमोल्ड प्रेस्कॉट रोड, नेचर मॉर्ट, आणि मास्टर आर्ट लॉजिस्टिक यांच्या सहकार्याने.