प्रदर्शने

मोफत अभ्यास दौरे

प्रत्येक आठवडाअखेरीस संग्रहालयाच्या
अभिरक्षकांकडून संग्रहालयाची माहिती मिळवा

शनिवार
सकाळी ११.३० वा इंग्रजीतून
दुपारी १२.३० वा मराठी/हिंदी भाषेतून
सर्वांसाठी खुले.

जादूघर

मुख्य प्रदर्शन संकल्पक: तस्नीम झकारिया मेहता

१९ मे - ०४ ऑक्टो २०२२

जादूघर प्रदर्शनाची त्रिमितीय मांडणी आता आपल्याला गुगुल आर्टस् आणि कल्चरच्या सहयोगाने, त्यांनी उपलब्ध करुन दिलेल्या मंचावर पाहता येईल. विविध कलादालनांतून मार्गक्रमण करत प्रदर्शन पाहण्याचा अनुभव, तसंच आपल्याला आवडलेल्या कलाकृतीविषयी विस्तारानं जाणण्याची संधी, कलाकृतीचा आस्वाद घेण्याची सवड आणि त्याचं तपशीलवार निरीक्षण करण्याची सोय आम्ही आपल्याला उपलब्ध करुन देत आहोत.

जादूघर प्रदर्शनाचा त्रिमितीय अनुभव घेण्यासाठी इथे क्लिक करा.



१८५७ साली डॉ. भाऊ दाजी लाड आणि डॉ. जॉर्ज बर्डवुड, व्यापारी आणि प्रतिष्ठित नागरिकांसोबत तेव्हाच्या बॉम्बेमध्ये नव्याने उभारल्या जाणाऱ्या संग्रहालयाच्या पायाभरणीत आपलं दायित्व नोंदवण्याच्या हेतूने भेटी घेऊ लागले, तेव्हा डॉ. बर्डवुड यांनी ‘आनंदाच्या बागेत (वनस्पती उद्यान) जादूघर (संग्रहालय)’ उभारण्याचा प्रस्ताव मांडला.

१७व्या आणि १८व्या शतकात, औद्योगिक उत्क्रांतीच्या ओघात नव्या जगाचा शोध जसा लागला, तसं ह्या शोधयुगादरम्यान गोळा केलेल्या वस्तूंचं भांडार म्हणून संग्रहालयाकडे ‘जिज्ञासेचं दालन’ म्हणून पाहिलं जाऊ लागलं. १८व्या आणि १९व्या शतकात, व्यापक भूभागावर आपलं साम्राज्य प्रस्थापित करणाऱ्या ब्रिटिशांच्या अभिरुचीमुळे आणि कुतूहलामुळे भारतात संग्रहालयं विकसित झाली. भारतातील ब्रिटीश साम्राज्याने हाती घेतलेल्या सखोल दस्तऐवजीकरणाचा मुख्य उद्देश व्यापारासाठी कच्चा माल आणि औद्योगिक उत्पादनं हेरणं हा होता. १८५१ साली लंडनमध्ये आयोजित केलेल्या द ग्रेट एक्झिबिशनमध्ये, देशातील सुविकसित हस्तकलांच्या मांडणीसाठी, आणि ह्या मालास आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत मिळालेल्या उत्तम प्रतिसादासाठी, भारताला राजरत्नाचं स्थान देण्यात आलं.संपूर्ण युरोपभरात आणि अमेरिकेत आयोजित करण्यात आलेल्या आंतरराष्ट्रीय प्रदर्शनांतील भारतीय दरबारात प्रसिद्ध कृष्णवर्णी लाकुडकाम, उत्कृष्ट दर्जाची चांदीची भांडी, शोभेचे घडे, मौल्यवान वस्त्रं आणि गालिचे, आभूषणं तसंच धातूसामानाचं शानदार सादरीकरण करण्यात केलं गेलं.

देशातील वास्तुकलेच्या अद्वितीय नमुन्यांनी, सांस्कृतिक संपन्नतेनी, कारागीरांच्या कलाकौशल्यानी आणि परकियांना आकर्षित करणाऱ्या वनस्पती आणि प्राणीसृष्टिने अचंबित होत, ब्रिटिशांनी देशभरात संग्रहालयांची स्थापना केली, जी स्थानिक जनतेसाठी आणि परप्रांतीयांसाठी दृष्यशिक्षणाचं प्रभावी माध्यम ठरली. ही संग्रहालयं केवळ दस्ताऐवजीकरणाची केंद्रंच नव्हती तर व्यापाऱ्यांसाठी औद्योगिक उत्पादनांचं वा व्यापार आणि निर्यातीच्या नमुन्यांची तपासणी करण्याची ठिकाणं बनली. भारतातील साम्राज्याच्या व्यावसायिक उद्दिष्टांची पूर्तता करण्यासाठी, कौशल्यवृद्धीसाठी तसंच संकल्पनांतील नावीन्याला प्रोत्साहन देण्याच्या हेतूने विविध संस्थानांतील संग्रहालयांच्या जोडीने कलामहाविद्यालयांची स्थापना करण्यात आली. जटिल भारतीय समाजव्यवस्था आणि विविध सामाजिक घटकांची जीवनशैली हा प्रारंभीच्या काळात ब्रिटिश राज्यकर्त्यांनी स्थापन केलेल्या संग्रहालयांतील दस्ताऐवजीकरणाचा आणि अवलोकनाचा महत्वाचा विषय ठरला.

एकोणिसाव्या शतकाप्रमाणे चालू घडीला संग्रहालयं केवळ कलावस्तूंच्या प्रदर्शनात मग्न नाहीत, तर ती अभ्यागतांस अर्थपूर्ण वैचारिक देवाणघेवाणीत गुंतवून ठेवणारी केंद्रं बनत आहेत. संग्रहालयाला भेट देताना आता अभ्यागत केवळ भूतकाळात डोकावतच नाहीत, तर ते समकालीन समस्यांवर ऐतिहासिक परिप्रेक्षातून पाहण्यास आणि भविष्याबाबतचं विचारमंथन करण्यास प्रोत्साहित करतात. समकालीन संग्रहालयं ही खऱ्या अर्थानं 'सामाईक संस्कृतीक्षेत्रं' बनत आहेत जी समुदायांच्या सेवेस बांधील राहत गंभीर विचारधारा आणि सर्जनशीलतेच्या मशागतीची आश्वासक केंद्रं बनली आहेत. डॉ. भाऊ दाजी लाड संग्रहालय १५०वा वर्धापनदिन साजरा करत असताना, 'जादूघर' ह्या प्रदर्शनाच्या निमित्ताने, संग्रहालयं अद्भुताच्या ज्या भावनेस प्रभावीपणे स्पर्श करतात त्यांना सचेत करत अभ्यागतांना भविष्यकालीन संग्रहालयांच्या कल्पनांविषयी विचार करण्यास प्रवृत्त करतात.

मुख्य प्रदर्शन संकल्पक: तस्नीम झकारिया मेहता 
अभिरक्षकिय समुहाची प्रमुख: ऋता वाघमारे-बाप्टिस्टा 
अभिरकिय सहाय्य: शिरुई बिलोमोरिया, इश्रत हाकिम, रुचिका जैन आणि स्नेहल मोरे