जमशेटजी जीजीभॉय ह्यांचे व्यक्तिचित्र

सर जमशेटजी जीजीभॉय (१७८३-१८५९) हे एक महत्वाचे व्यापारी, परोपकारी व्यक्ती आणि मुंबई शहरातील एक मानाचे नागरिक होते. त्यांचे समाज विधायक कार्य त्यांनी उभारलेल्या इस्पितळं, शाळा, धर्मादाय संस्था आणि सार्वजनिक इमारतींद्वारे दिसून येते. सर जमशेटजी जीजीभॉय कलामहाविद्यालय, जे पूर्वी मुंबई कलामहाविद्यालय म्हणून ओळखले जात असे, त्यांच्या सहकार्यातून उभारण्यात आलं. त्यांनी डॉ. भाऊ दाजी लाड संग्रहालयाच्या (तेव्हाच्या व्हिक्टोरिया आणि अल्बर्ट संग्रहालयाच्या) स्थापनेसाठी देखील सढळ हातांनी मदत केली.

संग्रहालयाच्या संचयातील जीजीभाईंचे हे छायाचित्र सुरुवातीच्या व्यक्तिचित्रण छायाचित्रणाचा विशेष नमुना आहे, ज्यात चित्रांतील घटक - जसे छायाप्रकाशाचे नियोजन, एकल-बिंदू दृष्टीकोन किंवा व्यक्तीला चित्रकार व छायाचित्रकाराकडे डोळ्यांच्या पातळीवर बघत बसवणे, ह्यांचे अनुकरण केलेले दिसते.