बघदादचे यहूदी जोडपे, मुंबईतील लोकसमूह  
१९०९-१९१२
रंगविलेली अर्धी भाजलेली टेराकोटा माती

सदर प्रतिमा बघदादी यहुदी यजमान आणि त्याच्या पत्नीची आहे. अठराव्या आणि एकोणिसाव्या शतकांत परदेशातून मुंबईत स्थलांतरित झालेल्या समुदायांपैकी एक बघदादचे यहुदी होते. ह्यातील बरेचसे यहुदी परिवार भायखळ्यातच रहात, जिथे आज संग्रहालय स्थित आहे. ह्या प्रतिमां पारंपरिक यहुदी वेशात आणि शिरेटोपांत नटलेल्या आहेत. ह्या 'ज्यू' समुदायास भारतात यहुदी म्हणून संबोधले गेले.

एकोणिसाव्या शतकाच्या पूर्वार्धापासून ते विसाव्या शतकाच्या पूर्वार्धापर्यंत मुंबई शहरातील माणसं, त्यांची जीवनशैली आणि संस्कृती यांचं दर्शन कमलनयन बजाज मुंबई दालनातील मातीच्या प्रतिमांचा संचय घडवतो. ह्या प्रतिमा त्या काळातील कला ऐतिहासिक बदल आणि नवीन कला प्रकारांच्या निर्मितीसाठी केलेले नाविन्यपूर्ण उपक्रम चित्रित करतात.