डॉ. भाऊ दाजी लाड मुंबई शहर वस्तुसंग्रहालय – ठळक घडामोडी 2015 ENGLISH | MARATHI | HINDI    
     
   
  प्रदर्शन उपक्रम पदविका अभ्यासक्रम विक्रीकेंद्र भेट द्या ठळक घडामोडी 2015  
     
 

मित्रांनो,

​२०१५ हे वर्ष उत्सवपूर्ण राहिलं ते विविध प्रदर्शनांच्या नांदीनं. विशेष उपक्रम, चित्रपटांचं स्क्रीनिंग, व्याख्यानं आणि लहानग्यांसाठी विविध कार्य़क्रमांची रेलचेल होती. म्हणूनच हा वार्षिक आढावा आपल्यापुढे सादर करताना आम्हाला अत्यंत आनंद होत आहे. ठळक घडामोडींत वस्तुसंग्रहालयाचा विस्तार प्रकल्प आणि इंडिया आर्ट फेअर, नवी दिल्ली मधला सहभाग यांचा समावेश होतो. नैमित्तिक उपक्रमांसोबत वस्तुसंग्रहालय सातत्यानं संशोधन आणि सर्व कलावस्तुंना डिजिटाईझ करण्याच्या कामात व्यग्र होतं, गेल्या वर्षभरात संपूर्ण संग्रहाचं सखोल दस्तावेजीकरण करण्यात आलं. वस्तुसंग्रहालयाच्या गुगलसोबतच्या भागीदारीतून आता कुणालाही संग्रहालय ऑनलाईन पाहण्याचा लाभ घेता येईल. मुंबई हिरो या मुंबई मिरर या वृत्तपत्राच्या उपक्रमासाठी आपण मला नामांकित केले, आम्ही आपल्या सहकार्याबद्दल आभारी आहोत. आम्ही आशा करतो की आपण वस्तुसंग्रहालयाला भेट देत रहाल आणि याहूनही अधिक उत्साहाने आमच्या विविध उपक्रमांत आपला सहभाग नोंदवाल. मी आपणास ‘फ्रेंडस् ऑफ द म्युझियम अर्थातच संग्रहालयाचे मित्र’ या आम्ही राबवत असलेल्या उपक्रमाचा भाग बनण्याची आणि सोशल मिडियावरुन आमच्या ठळक घडामोडींची माहिती घेत राहण्याची विनंती करते.

तस्नीम झकारिया मेहता
व्यवस्थापकीय विश्वस्त आणि मानद संचालक

 
     
   
     
 

गुगल कल्चरल इन्स्टिट्युट’मध्ये डॉ. भाऊ दाजी लाड वस्तुसंग्रहालयाचं पदार्पण

डॉ. भाऊ दाजी लाड वस्तुसंग्रहालयाला आता आपल्याला गुगुल कल्चरल इन्स्टिट्युटच्या माध्यमातून ऑनलाईन भेट देता येईल हे सांगताना आम्हाला खूप समाधान वाटतंय.

 

गुगलचा वापर करणाऱ्यांना जगातल्या काही सर्वोत्तम वस्तुसंग्रहलयांची दृष्यसफारी करण्याचं गुगुल कल्चरल इन्स्टिट्युट हे एकमेवाद्वितीय माध्यम आहे. इथं जगभरातील सांस्कृतिक ठेवा, इंटरनेट वापरणाऱ्यांसाठी हाताच्या बोटावर उपलब्ध करुन दिला आहे आणि आत्तापर्यंत ५१ लाखांहून अधिक लोकांनी या संकेतस्थळाला भेट दिली आहे.


‘हे शहराचं वस्तुसंग्रहालय आहे आणि ते इथल्या सांस्कृतिक ठेव्याचं जतन करतं’ असं सांगत गुगल कल्चरल इन्स्टिट्युट चे संचालक अमित सुद यांनी २१ जानेवारी २०१६ रोजी झालेल्या पदार्पण सोहळ्यात मुंबईतील वस्तुसंग्रहलयांच्या प्राधान्यक्रमात आम्हाला अग्रस्थानी ठेवल्याचं सांगितलं.


वस्तुसंग्रहालयातील सगळ्यांच्याच दोन वर्षांच्या अथक परिश्रमानंतर आणि गुगल सोबतच्या भागीदारीतून, आमच्या संग्रहातील २०० हून अधिक महत्वपूर्ण कलावस्तू आणि ऐतिहासिक व समकालीन कलाप्रदर्शनांचा दृष्यात्मक आढावा आता आपल्याला घेता येईल. ह्या पुढाकारामुळे, संग्रहालयाच्या ठेव्याच्या ३६० अंशी दृष्यसफारीचा लाभ आपल्याला घेता येईल. विविध संदर्भ विचारात घेऊन केलेली समृदध मांडणी, वस्तुसंग्रहालयाचा जीर्णोद्धार आणि पुनरुज्जीवनाची गोष्ट समजावतात. याशिवाय अतुल दोडियाचं‘७००० वस्तुसंग्रहालयं: प्रजासत्ताक भारताचा प्रकल्प’, ‘झेनिया आर्ट सार्वजनिक / भारत ’ही रीना कल्लाट यांची कलाकृती आणि सुदर्शन शेट्टी यांचं ‘हेही दिवस सरतील’ ही महत्वाची समकालीन कलाप्रदर्शनंही आपल्याला पाहता येतात. गुगुल कल्चरल इन्स्टिट्युच्या सहाय्यानं संग्रहातील कलावस्तुंच्या उच्च दर्जाच्या प्रतिमा, अगदी आपल्याला जवळून पाहता येतील. त्यामुळे पाहणाऱ्याला त्यातील सूक्ष्म बारकावे तर टिपता येतीलच, शिवाय उघड्या डोळ्यांहूनही उत्तम अवलोकन करता येईल.


आमचा वस्तुसंग्रह आणि प्रदर्शनं, या पुढाकारामुळे आता जगभरातील त्या लोकांना पहाता येईल ज्यांना प्रवास करुन इथं येणं आणि वस्तुसंग्रहाला भेट देणं शक्य नसेल.


“डॉ. भाऊ दाजी लाड वस्तुसंग्रहालयासारख्या महत्वाच्या सांस्कृतिक शैक्षणिक संस्थेला मदत करणं आणि त्यांचा समृद्ध ठेवा तंत्रज्ञानाच्या सहाय्याने ऑनलाईन उपलब्ध करुन देणं, हे आमचं सौभाग्य आहे. वस्तुसंग्रहालयाची निवड करताना, आमचा निकष उत्तम संग्रह आणि त्याची संदर्भपूर्ण मांडणी हा राहिला ..आणि हे संग्रहालय आम्ही निश्चित केलेल्या सर्व मापदंडांत उजवं ठरलं” असं वक्तव्य गुगल कल्चरल इन्स्टिट्युटचे संचालक अमित सुद यांनी केलं.


गुगल कल्चरल इन्स्टिट्युटवर वस्तुसंग्रहालयातील ठेवा पहा : bit.do/bdlmuseum

 
   
   
  अमित सुद पदार्पण सोहळ्याच्या पत्रकार परिषदेत संबोधित करताना (डावीकडे); डॉ. भाऊ दाजी लाड वस्तुसंग्रहालय गुगल कल्चरल इन्स्टिट्युटवर (उजवीकडे)  
     
   
   मुंबई हिरो : मुंबई मिररची मोहिम  
   
     
   

ज्यांनी मुंबईकरांना हितकारी ठरणारे प्रकल्प हाती घेतले आणि शहरात मोठे बदल घडवून आणण्यात अग्रणीय भूमिका बजावली, अशा नागरिकांना ‘मुंबई मिरर’ ह्या वृत्तपत्राची ‘मुंबई हिरो’ ही मोहिम अर्पिलेली आहे. ही मोहिम म्हणजे संघर्षमय वाटेनी चालत शहर आणि पर्य़ायानी देश, स्थायिक होण्यासाठी उत्तम जागा बनावी, यासाठी ज्या नागरिकांनी महत्वपूर्ण भूमिका बजावली, त्यांनी घेतलेल्या श्रमाचं कौतुक करते.


डॉ. भाऊ दाजी लाड मुंबई शहर वस्तुसंग्रहालयाच्या व्यवस्थापकीय विश्वस्त आणि मानद संचालक श्रीमती तस्नीम झकारिया मेहता, यांना मुंबई हिरोचा सन्मान बहाल करण्यात आला तो केवळ या वस्तुसंग्रहालयाच्या जीर्णोद्धारासाठी नाही तर वस्तुसंग्रहालायाला सांस्कृतिक घडामोडींचं केंद्र बनवण्यासाठी.


२९ ऑक्टोबर २०१५ रोजी, श्रीमती मेहता पाच मुंबई हिरोंमधील एक असल्याचं जाहिर केलं गेलं. प्रगल्भ कलावंत आणि निवड समितीचे सदस्य अतुल दोडिया म्हणाले, “यांनी एक जीर्णावस्थेतील शैक्षणिक संस्था अगदी अथपासून इतिपर्यंत पुनरुज्जीवीत केली. फक्त माझ्यासारख्या कलावंतांसाठीच नाही तर सर्व स्तरावरील लोकासांठी इथे विविध कार्य़क्रम होत असतात. प्रत्येकासाठी काहीना काही इथं आयोजित केलं जातं. अशी दृष्टी असणं, आणि त्याला दृष्यरुप देताना येणाऱ्या साऱ्या अडथळ्यांना पुरुन उरत दटून राहणं, हे उल्लेखनीय आहे.”

 
     

 

“वस्तुसंग्रहालयातील सर्वच काही अविस्मरणीय आहे. संग्रहालयाची इमारत आणिइथला संग्रह ज्या प्रकारे मुंबईचा इतिहास व कलेचा ठेवा आपल्यासमोर उलगडतो, त्याला तोड नाही. जीर्णोद्धार तर केवळ अजोड!”


लॉर्ड स्टिफन ग्रीन, लंडनच्या निसर्ग इतिहास वस्तुसंग्रहालयाचे अध्यक्ष

 

     
   प्रदर्शन | कमलानयन बजाज विशेष प्रदर्शन दालन  

सिल्व्हर मॅजिक: हिंदी चित्रपटसृष्टीतील सुवर्णयुग टिपणाऱ्या छायाचित्रांचं प्रदर्शन, जे. एच्. ठक्कर यांचे व्यक्तिचित्रण

डिसेंबर १४, २०१५ - ३१ मार्च, २०१६

कमलानयन बजाज विशेष प्रदर्शन सभागृह

राष्ट्रीय सलोखा : भारत आणि अमेरिका यांच्यातील नातेसंबंधाचा इतिहास : १७९०-१९४७


सप्टेंबर २४, २०१५ - ऑक्टोबर २७, २०१५

कमलानयन बजाज विशेष प्रदर्शन सभागृह

इंडिया फोटो स्टुडिओचे संस्थापक, जे. एच्. ठक्कर (१९२३-२००३) यांची दुर्मिळ सिल्व्हर जिलेटिन व्यक्तिचित्रण काढलेली छायाचित्रं या प्रदर्शनात सादर करण्यात आली. ठक्कर कराचीहून मुंबईत फाळणीच्या वेळी स्थलांतरीत झाले आणि दादरच्या चित्रा सिनेमाच्या बाजूला त्यांनी इंडिया फोटो स्टुडिओची स्थापना केली. भारतातील स्टुडिओ छायाचित्रणाच्या क्षेत्रात ठक्कर यांचं नाव अग्रक्रमाने घेतलं जातं. त्यांनी कॅमेरात बंदिस्त केलेलं व्यक्तिचित्रण, मुंबईच्या चंदेरी सिनेसृष्टीच्या १९५०-१९६० ह्या सुवर्णकाळाची साक्ष देतो. सिनेसृष्टिवर अधिराज्य गाजवणारे राज कपूर, वहिदा रेहमान, नरगीस आणि इतर अनभिषिक्त सम्राटांचा समावेश यात होतो.


संकल्पना आणि मांडणी राम रेहमान यांची

१८ व्या शतकाच्या उत्तरार्धापासून ते १९४७ साली स्वातंत्र्याप्राप्ती होईपर्य़ंत, अमेरिका आणि भारतातील ऐतिहासिक संवाद, या प्रदर्शनात दु्र्मिळ छायाचित्रं, माहितीपत्रं आणि तत्कालीन दस्तऐवज अधोरेखीत करत मांडला गेला. यात सुरुवातीचे वाणिज्य व्यवहार, सांस्कृतिक, आदर्शवादी आणि वैचारिक घडणीची सांगड, यासोबतच नेतृत्व बदल, दुसरं महायुद्ध आणि इतर अनेक गोष्टींचा वेध घेण्यात आला.


मेरिडिअन इंटरनॅशनल सेंटर, वॉशिंग्टन डि.सी. आणि यु. एस्. दूतावास, नवी दिल्लीच्या संयुक्त विद्यमाने

     

बोर्न अॅंड शेफर्ड : फिगर्स इन टाईम

ऑगस्ट २०, २०१५ - सप्टेंबर १५, २०१५

कमलानयन बजाज विशेष प्रदर्शन सभागृह | मुंबईची जन्मभूमी प्रदर्शन सभागृह

वाराणासीच्या विणकामाच्या अद्भुत गोष्टी

ऑगस्ट २२, २०१५ - ऑक्टोबर १५, २०१५

कमलनयन बजाज मुंबई गॅलरी | औद्योगिक कला दालन | १९ व्या शतकातील चित्रांचं प्रदर्शन

या प्रदर्शनात जगातील सर्वात प्राचीन छायाचित्रण स्टुडियोंपैकी जे आजही त्याच नावानी कलकत्त्यातील एस्प्लॅन्ड येथे कार्यरत आहेत त्या बोर्न अॅंड शेफर्ड यांची दुर्मिळ छायाचित्रे सादर केली गेली. प्रदर्शित केलेली छायाचित्रं ही १९व्या शतकातील सांस्कृतिक आणि ऐतिहासिक कलावस्तुंचा नमुना आहे, जो दर्शकाला एका वेगळ्या काळाची तोंडओळख तर करुन देतोच, शिवाय तो बोर्न अॅंड शेफर्ड यांच्या अतिशय वाखणल्या गेलेल्या शैलीची लक्षणं नेमकेपणानी मांडतो.


तसवीर यांच्या सहकार्याने

पारंपारिक विणकर आणि त्यांच्या कारागीरीला ख्यातनाम डिझाईनरनी दिलेली मानवंदना म्हणजे ‘वाराणासीच्या विणकामाच्या अद्भुत गोष्टी’. ह्या प्रदर्शनानी वाराणसीच्या वस्त्रोद्योगाला कुर्निसाद देण्यासाठी भारतातील प्रतिभावान विणकरांना आणि फॅशन डिझाईनरना एकत्र आणलं गेलं.


संकल्पना आणि मांडणी शायना एन्. सी. यांची


वस्त्र मंत्रालय, भारत सरकार यांच्या सहकार्यानी


लॅक्मे फॅशन वीकच्या सहाय्यानी

     

खेळले जाणारे खेळ - ठुकराल आणि

टागारा

मार्च १८, २०१५ - जुन ९, २०१५

कमलनयन बजाज मुंबई दालन | औद्योगिक कला दालन | १९ व्या शतकातील चित्रांचं प्रदर्शन सभागृह | ‘मुंबईचं जन्मस्थान’ प्रदर्शन दालन

अॅज इफ कंट्री ऑफ द सी - जणू काही समुद्राचा देश III - कॅंप

फेब्रुवारी २२, २०१५ - एप्रिल ७, २०१५

कमलनयन बजाज मुंबई दालन | औद्योगिक कला दालन | १९ व्या शतकातील चित्रांचं प्रदर्शन सभागृह | ‘मुंबईचं जन्मस्थान’ प्रदर्शन दालन

ठुकराल आणि टागारा या कलाद्वयींनी 'खेळ' या संकल्पनेमागील सांस्कृतिक, शारिरीक आणि मानसिक विचार गंजिफाच्या पत्त्यांसारख्या वस्तुसंग्रहालयातील प्राचीन आणि पारंपारिक खेळांतून मांडला आहे. त्यांनी वस्तुसंग्रहालयाचा विचार खेळाच्या परिघातून करतात, जेथे भूत, वर्तमान आणि भविष्य यांचा समावेश करत ते खेळाची संकल्पना शारिरीक, मानसिक आणि आध्यात्मिक या तीन भागांत विभागतात. या कलाकारांनी पारंपारिक खेळ हा खेळकरपणा आणि गांभीर्य यांचा अनुभव देणारं माध्यम असल्याचा पुर्नविचार मांडला. कलाकार एकीकडे दर्शकाला जगण्याचे विविध पैलू म्हणजे जणू संधीचा खेळच आहे, असा विचार करण्याचं आव्हान देतात आणि ह्या विचारातून जीवन आणि कलात्मक अभिव्यक्तीत उमटणारे पडसाद अधोरेखीत करतात. तर दुसरीकडे हे काम पारंपारिकतेतील समकालीन संवेदनशीलता मांडतं. तर कलाकृतींत, कलाकार आपल्या चपखल नर्मविनोदी व्यंगात्मक शैलीत जेव्हा मुंबईवर ब्रिटीशांचं साम्राज्य होतं, त्या काळाचा वेध घेतात.

“समुद्राचा देश” हे प्रदर्शन सागरी जगातील घडामोडींचा लेखाजोखा घेत त्यांच्या दृढ अस्तित्वाचा माग घेणाऱ्या कॅम्पच्या दिर्घ काळ चाललेल्या प्रकल्पाचा, पश्चिम भारतीय समुद्राच्या भवतालातून आंतर्बाह्य वेध घेतं. प्रदर्शनाचा केंद्रबिंदू ठरलेली आणि भारतात सर्वप्रथम दाखवली गेलेली आणि जगभर मोठा प्रवास करुन आलेली, ‘गल्फ टू गल्फ टू गल्फ’ ही फिल्म; वस्तुसंग्रहालयाच्या अग्रस्थानी सभोवतालचं ऐतिहासिक वातावरण सिनेमाच्या लहरींनी भरत प्रदर्शित केली गेली. एक अनोखा नकाशा तरुण कलाकारांच्या सहकार्यातून कॅंपनी तयार केला, जो आशिया उपखंड आफ्रिकन उपखंडाच्या शेजारी असल्याचं अशा प्रकारे दर्शवतो, जणू काही ह्या दोन्ही उपखंडांत भूगर्भीय उलथापलथ घडण्याची प्रक्रिया सुरु आहे. अन्य अनेक सामायिक एतिहासिक दाखले प्रदर्शनाला त्याचं शीर्षक बहाल करतात.

     
   
     
 

७००० वस्तुसंग्रहालयं : भारतीय प्रजासत्ताकाचा प्रकल्प - अतुल दोडिया

डिसेंबर ११, २०१४ - फेब्रुवारी १०, २०१५

कमलनयन बजाज मुंबई दालन | औद्योगिक कला दालन | १९ व्या शतकातील चित्रांचं प्रदर्शन सभागृह | ‘मुंबईचं जन्मस्थान’ प्रदर्शन दालन

७००० वस्तुसंग्रहालयं : भारतीय प्रजासत्ताकाचा प्रकल्प, हा तैलरंग, जलरंग आणि शिल्पांची गुंफण उलगडत विषयाची व्यापकता सांगतो. हे प्रदर्शन वस्तुसंग्रहालयातील संग्रहाचं सखोल वाचन करत आणि देशाच्या इतिहासातील संस्मरणीय क्षणांचा आधार घेत, कलाइतिहासाचा तसंच वस्तुसंग्रहालयाच्या संज्ञेचा आणि कलावस्तुंच्या मांडणीचा परामर्श करतं.


लागोपाठच्या ऐतिहासिक घटनांची अवघड गुंफण दोडिया राजकारण, कला आणि संस्कृतीच्या हस्तक्षेपातून आपल्या कामात मांडतात. दोडिया आपल्या सक्षम व्यापक दृष्टिनी पौराणिक आकृतीबंधांचं समकालीन व्यक्तिरेखांकन करत, वस्तुसंग्रहातील नाट्यमय मातीच्या शिल्पांचा आधार घेत, काचेच्या तावदानांच्या कपाटात, वस्तुसंग्रहालयाच्या मध्यभागी आपल्या कलाकृती पेश करतात. टागोरांच्या कलाकृतींचा आधार घेत, चित्रपट आणि त्यातील महान कलावंतांना मान देत, आपल्या वैयक्तिक स्मृतींना उजाळा देत किंवा मुंबईच्या बाजारातील लोकप्रिय तरिही उथळ गोष्टींना असलेली उचल पेश करत, दोडियांच्या कलाकृती अलगदपणे विविध विषयांना हात घालत पुढे सरकतात.

 
   
 

 

“हे विलोभनीय संग्रहालय आहे आणि ज्याप्रकारे या वस्तुसंग्रहालयाचं पुनरुज्जीवन केलं आहे ते अकल्पित आहे. अतिशय श्रीमंत इमारत, अंतर्गत सजावटीमुळे त्याला एकमेवाद्वितीय बनवते आणि इथल्या संग्रहातून गोष्ट उलगडत जावी असं कलावस्तुंचं केलं गेलेलं सादरीकरण रंजक आहे.”

 

के. के. मित्तल, अतिरिक्त सचिव, सांस्कृतिक मंत्रालय

 

 
   
   प्रदर्शन  | विशेष प्रकल्प सभागृह  

चंबा रुमाल : मरणोन्मुख कलेचं पुनरुज्जीवन

डिसेंबर १८, २०१५ - जानेवारी २०, २०१५

विशेष प्रकल्प दालन I आणि II

थंडी : जुलिअन ओपी

ऑगस्ट ६, २०१५ - सप्टेंबर १३, २०१५

विशेष प्रकल्प दालन I आणि II

चंबारुमाल म्हणजे चौरसाकृती कापडावर केलेलं, चंबा या हिमाचल प्रदेशात प्रचलित पारंपारिक भरतकाम. भरतकाम आणि पहाडी लघुचित्रशैलीच्या अनोख्या मिलाफामुळे या रुमालांवरील कारागीरीला ‘भरतकामातील चित्रं’ म्हंटलं जातं. ही कला नामशेष होण्याच्या दिशेनी प्रवास करत असताना दिल्ली क्राफ्ट कौन्सिलनी ह्या कलेच्या पुनरुज्जावनाचं आव्हान स्वीकारलं. विविध राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय वस्तुसंग्रहाच्या ठेव्यात असलेल्या रुमालांचे तपशील समजून घेऊन, निवडक रुमालांच्या संग्रहाची चंबामधील कारागीरांकडून पुर्ननिमिती करुन घेण्यात आली आणि विशेष प्रदर्शन सभागृहात ते प्रदर्शित करण्यात आले.


दिल्ली क्राफ्टस् काऊंसिल (हस्तकला परिषदेच्या) सहकार्यातून

थंडी या विषयावरिल ७५ प्रिंटस् चा हा संच ज्युलिअन ओपी या कलाकारानं, फ्रेंच ग्रामीण भागाला घातलेल्या वर्तुळाकार फेऱ्याला केंद्रस्थानी ठेवतो. हे प्रिंटस् १७ व्या शतकातील डच निसर्गचित्रण ते गुगुल मॅपस् पर्यंतचे विविध प्रभाव अधोरेखीत करतात आणि ओपीच्या भवतालच्या देखाव्याच्या अनुभवाधिष्टित अभ्यासात आघाडी घेतात.


ब्रिटीश कौन्सिल यांच्या सहकार्यातून

   
   
     
 

नेमाई घोष - सत्यजित रे आणि त्यापुढे

ऑक्टोबर ६, २०१५ – डिसेंबर ८, २०१५ | विशेष प्रकल्प दालन I आणि II

छायाचित्रकार नेमाई घोष हे आपल्या दशकभराच्या सहवासातून सत्यजीत रे या जेष्ठ चित्रपटनिर्मात्याच्या कारकीर्दीचा अचूक वेध घेतात. हे प्रदर्शन, मुख्य प्रवाहात असलेला हिंदी सिनेमा ते स्थानिक बंगाली सिनेमाचा समावेश करत, घोष यांच्या फार प्रचलित नसलेल्या तरीही महत्वपूर्ण ठरणाऱ्या हिंदी चित्रपटांतील दस्तऐवजांवर प्रकाशझोत टाकतात. तब्बल २५ वर्षाच्या काळातील अनेक महत्वपू्र्ण आणि याआधी न पाहिलेले कलाकार, प्रसंग, देखावे आणि ठिकाणांची छायाचित्रं सादर करतात.

 

डिएजी मॉडर्न यांच्या सहकार्यातून

 
     

स्थलांतराच्या ऐतिहासाची क्षणिक ओळख - वलय शेंडे

१० जानेवारी, २०१५ - २८ जानेवारी, २०१५

विशेष प्रकल्प सभागृहI आणि II

सिधपूर : आज आणि काल - सेबॅस्टिअन कार्टेस


मार्च २२, २०१५ - जुन ७, २०१५

विशेष प्रकल्प सभागृह I आणि II

मुंबईस्थित कलाकार वलय शेंडे यांचे शिल्प वस्तू आणि भवताल यांचं प्रतिनिधित्व करतात. वलय शेंडे यांची धातुशिल्पं शेतकऱ्यांची होणारी दैना, पैसा आणि जात यांच्या आधारावर निर्माण केली जाणारी सामाजिक दरी, यासारख्या सामाजिक प्रश्नांवर भाष्य करणायासाठीचे प्रतिक म्हणून सामोरे येतात. दैनंदिन व्यवहारातील ट्रक, म्हैस, डब्बेवाले आणि दुचाकी हे स्थलांतराचा प्रश्न अधोरेखित करतात. प्रदर्शनाचा भाग म्हणून बांधकाम करणाऱ्या मजुरांसोबत ट्रकचं मोठं धातुशिल्प, ट्रान्झिट या नावानी वस्तुसंग्रहालायात प्रदर्षित करण्यात आलं.


साक्षी कलादालनाच्या सहकार्यानी

सेबॅस्टिअन कार्टेस याच्या शृंखलेतून, ‘सिधपूर : आज आणि काल’ हे प्रदर्शन छायाचित्रणाच्या माध्यमातून गुजरातमधील सिधपूर या एका छोट्या खेड्यातील बोहरी समुदायाचा सखोल शोध घेतं. सिधपूरचा संपन्न वारसा आणि वैशिष्ठ्यपूर्ण स्थानिक स्थापत्यशास्त्रानी कार्टेस भारावून गेले. ही छायाचित्रं स्थापत्यशास्त्रावरिल युरोपियन प्रभाव आणि इंडो - इस्लामिक अंतर्गत सजावटीतील जवळीक अधोरेखित करतात.


तसवीर कलादालनाच्या सहकार्यानी

     
 

 

“माझ्या शुभेच्छा आणि वस्तुसंग्रहालयाच्या सुंदर जीर्णोद्धाराची आणि आपल्या संग्रहाची मी वाहवा करतो. मी आपल्या महत्वाकांक्षी विस्तार प्रकल्पाची वाट पाहतो आहे ! ”


थॉमस वाय़डा, परराष्ट्र सचिव यु. एस्.ए.

 

 
   
   बातम्या  
   
     
 

स्टिव्हन हॉल यांचं विस्तार प्रकल्पाचं सादरीकरण

संग्रहालयाच्या सध्याच्या इमारतीच्या उत्तर बाजूला नवीन इमारत विकसित करण्याच्या महत्वकांक्षी विस्तारप्रकल्पाची सुरुवात वस्तुसंग्रहालयाने केली. हा प्रकल्प बृहन्मुंबई महानगर पालिकेच्या सहकार्यानी आणि सार्वजनिक-खाजगी भागीदारीतून राबविला जाईल. वस्तुसंग्रहालयाची ही नवी इमारत हे मुंबईतील ऐतिहासिक व समकालीन सांस्कृतिक विकासाचं प्राथमिक केंद्र असेल. ही नवी इमारत वस्तुसंग्रहालयाला जगातील आघाडीच्या वस्तुसंग्रहालयांत स्थान प्राप्त करुन देण्यास सहाय्यकारी ठरेल.

१० मार्च २०१५ रोजी, स्टिव्हन हॉल, वस्तुसंग्रहालय विस्तार प्रकल्पाचे विजयी स्थापत्यकार, जे अमेरिकेतील महत्वाच्या स्थापत्यकारांत गणले जातात, यांनी ५०० हून अधिक प्रेक्षकांना आधुनिक मुंबईच्या नव्या इमारतीच्या आपल्या विजयी आराखड्याने खिळवून ठेवले. प्रकाश आणि जागा यांच्या मिश्रणातून, संदर्भपूर्ण संवेदनशीलतेसाठी मोठ्या प्रमाणावर ओळखले जाणारे हॉल, स्थानिक प्रभावांना काव्यमय स्थापत्यशास्त्रीय भाषेतून परिमाण देत, एकमेवाद्वीतीय संकल्पना प्रस्तुत करतात. स्टीव्हन हॉल यांना स्थापत्यशास्त्रातील अनेक मानाच्या पारितोषिकांनी आणि बक्षिसांनी सन्मानित करण्यात आलं आहे.

 
 

 

कोब्रा म्युझियम ऑफ मॉडर्न आर्टच्या सहकार्याने

वस्तुसंग्रहालयाला कोब्रा म्युझियम ऑफ मॉडर्न आर्ट, अॅमस्टेल्वीन, यांच्यासोबतचा आपला सहयोग घोषित करताना आनंद होतो आहे. प्रदर्शनांचं आदान-प्रदान आणि तरुण वर्गासाठी शैक्षणिक कार्यक्रम राबवणं हे या साहचर्याचं लक्ष्य असेल. ही भागीदारी वस्तुसंग्रहालयानं आयोजित केलेल्या एका विशेष कार्यक्रमात घोषित केली गेली आणि अॅमस्टरडॅमचे महापौर श्री. एम्बरहार्ड वॅन डर लान शिवाय अॅमस्टेल्वीनचे महापौर श्री. मिरयॅम वॅन्ट वेल्ड, नेदरलॅंडस् राज्याच्या वकिलातीचे सचिव श्री. जिओफ्रे वॅन, कोब्रा म्युझियम ऑफ मॉडर्न आर्टचे कार्यकारी संचालक श्री. एलिस ओटेनहॉफ आणि अॅमस्टरडॅमच्या विपणन विभागाचे मुख्य कार्यकारी अधिकारी फ्रान्स वॅन डर अव्हर्ट उपस्थित होते.

ऑर्केस्ट्रच्या शाही सामुहिक मैफिलीचं आयोजन भारतात सर्वप्रथमच या उत्सवाच्या प्रसंगी वस्तुसंग्रहालयात आयोजित करण्यात आलं. कॅरेल अपीलच्या कलाकृतीचं अनावरण आणि प्रदर्शन त्या संध्याकाळी केलं गेलं.


कॅरेल अपील हा कोब्रा या युरोपीतील (अवान-गार्ड) पुरोगामी चळवळीचा संस्थापक सदस्य़ होता. १९४८ साली जेव्हा या चळवळीचं नामकरण केलं गेलं, तेव्हा सदस्यांच्या निवासाच्या शहरांची आद्याक्षरं वापरली गेली. कोपेनहेगेनचा को, ब्रुसेल्सचा ब्र आणि अॅमस्टरडॅमचा आ. १९४८ ते १९५१ या कालावधीत सक्रीय असलेली ही चळवळ, विसाव्या शतकातील शेवटची पुरोगामी चळवळ ठरली. या चळवळीत सहभागी युरोपातील कलावंतांनी दुसऱ्या महायुद्धानंतरच्या भिन्न राजनैतिक आणि सामाजित परिस्थितीला प्रतिसाद देणाऱ्या कलाकृती घडवल्या. ह्या चळवळीनं कलेची भूमिका आणि समुदायाला बसलेल्या युद्धाच्या धक्काची तीव्रता कमी करण्यासाठीचा अर्थपूर्ण सहभाग, याचा नवा विचार आपल्या धारणेतून मांडला.

   
 

पोस्ट ग्रॅड्युएशन डिप्लोमा - पदवीपश्चातचं पदविका शिक्षण

दर आठवड्याच्या उत्तरार्धात घेतल्या जाणाऱ्या एका वर्षभराच्या पदविका अभ्यासवर्गाचं हे पाचवं वर्ष. यात १८५० पासून आजपर्यंतच्या भारतीय कलाइतिहासाचा सैद्धांतिक तसंच समीक्षकाच्या पातळीवरुन अभ्यास केला जातो. हा अभ्यासक्रम विद्यार्थ्यांना भारतीय इतिहास, समाजशास्त्र, राजकारण आणि सांस्कृतिकतेच्या परिमाणांचा आधार घेत संदर्भपूर्णतेनी भारतीय कलाइतिहास समजावून सांगतो. पुढे जाऊन हा अभ्यासक्रम भारतीय कलेचं वाचन, आधुनिक आणि आंतरराष्ट्रिय कलेच्या मापदंडांवर अभ्यासण्याची संधी देतो. जानेवारी २०१४ पासून वस्तुसंग्रहालयानं प्रदर्शन संकल्पना आणि मांडणी विषयीचा नवा भागही यात समाविष्ट करुन घेतला. हा ढाचा सहभागी विद्यार्थ्यांना अभिरक्षकाच्या साधनेच्या संदर्भातील गोष्टींची माहिती तर देतोच, शिवाय संवर्धनाचा अनुभवही वस्तुसंग्रहालयाच्या पातळीवर देतो.

 

अधिक माहितीसाठी..

 
     
   
 

इंडिया आर्ट फेअर

जानेवारी २०१५

वस्तुसंग्रहालयाने पहिल्यांदाच इंडिया आर्ट फेअर मध्ये आपला सहभाग नोंदवला. स्थापत्यकार स्टिवेन हॉल यांचं वस्तुसंग्रहालयाच्या नव्या विंगचं संकल्पन फेअर मध्ये प्रदर्शित करणायात आलं. इंडिया आर्ट फेअर हा देशातील सर्वात मोठा कलाविषयक उपक्रम आहे, ज्यात एक लाखाहून अधिक लोक दरवर्षी हजेरी लावतात. या आर्ट फेअरमधील वस्तुसंग्रहालयाच्या उपस्थितीमुळे राष्ट्रीय स्तरावर वस्तुसंग्रहालयाविषयी तसंच इथं राबवल्या जाणाऱ्या उपक्रमांविषयी खूप मोठ्या प्रमाणात जागरुकता निर्माण झाली.

 
     
 

अभिरक्षकांचं केंद्र (संकल्पना मांडणी अड्डा)

 
 

२३-२५ जुलै २०१५ या काळात, डॉ. भाऊ दाजी लाड वस्तुसंग्रहालयाच्या व्यवस्थापकिय विश्वस्त आणि मानद संचालक श्रीमती तस्नीम झकारिया मेहता यांना कलकत्ता येथील प्रयोगशील अभिरक्षकांच्या केंद्रात व्याख्याते म्हणून आमंत्रित करण्यात आलं. ‘बंड करून उठणारा’ या शीर्षकाअंतर्गत, श्रीमती मेहता यांनी वस्तुसंग्रहालयात संपन्न होत असलेल्या समकालीन कलावंतांच्या ‘परंपरेची गुंफण’ या प्रदर्शनांच्या मालिकेचं सादरीकरण केलं.

 
     
   
     
 

सादरीकरणातील काही महत्वाचे मुद्दे

 

“वसाहतवादाच्या मुळ तत्वानुसार वस्तुसंग्रहालय हे कलावस्तुंना अग्रक्रम देतं. मात्र इथं प्रदर्शित कलावस्तुंचं मुर्तरुप साकारणाऱ्या महिला तसंच अन्य कारागीरांचा महत्वपूर्ण सहभाग नाकारतं. ह्यात कलाकृतींना उच्च स्थान देत, त्या कलेची साधना करणाऱ्या स्थानिक कलावंतांना, जे वर्ण वा वंशाबद्दलच्या गैरसमजुतींच्या जंजाळात डावलले गेले वा जे उच्च वा ललित कलेच्या बौद्धिक गरजांना आपल्या अभिव्यक्तीत सामावून घेऊ शकत नाहीत, त्यांना गौण ठरवलं जातं.”

 

वस्तुसंग्रहालयाचा मनसुबा सर्वसमावेशकतेचा ध्यास धरत, या ऐतिहासिक असमतोलाचं समुळ उच्चाटन करण्याचा आहे. स्थानिक कलावंतांना आणि पर्यायानं त्यांच्या कलासाधनेला सशक्त करण्याची कास आम्ही येथे धरत आहोत. ‘ऐंगेजिंग ट्रॅडिशन्स’ ही कलाप्रदर्शनांची मालिका, कलावंतांना बहिष्कृत करत आणि केवळ कलाकृतीशी संबंध सांगणाऱ्या इतिहासाला प्रतिसाद देण्यासाठी सिद्धहस्त कलावंतांना आमंत्रित करते. सुदर्शन शेट्टी, जितिश कल्लाट, शिबा छाछी, एल्. एन्. तल्लुर, अतुल दोडिया, कॅंप व ठुकराल आणि टागरा यासारख्या ख्यातनाम कलाकारांनी ह्या परंपरेचा भाग होणं पसंत केलंय.

 
     
 

 

“मला या जागेतून निघताना गतस्मृतींना उजाळा देणारी ओढ लागून राहते. इथं कितीही वेळ व्यतीत केला, तरी तो पुरेसा वाटत नाही ! नेहमीच मी या जागेच्या प्रेमात पडते.”


कृष्णा मेहता, संकल्पक

 

 
     
   शैक्षणिक उपक्रम


कहानी कार्निवल २०१५

डॉ भाऊ दाजी लाड वस्तुसंग्रहालयाने कहानी कार्निवल ट्रस्टसोबत संयुक्त विद्यमाने एक नवीन उपक्रम राबविला आहे. वर्षातून चार वेळा होणाऱ्या ह्या साहित्यिक उत्सवाला ‘कहानी कार्निवल’ असं नाव देण्यात आलं. कहानी कार्निवल ट्रस्ट ही एक स्वयंसेवी संस्था असून वाचनातील निखळ आनंद कला, नाटक आणि नृत्याच्या माध्यमातून लहान मुलांपर्यंत पोहचवण्याचं काम ते करतात. तत्सम शैक्षणिक उपक्रमांना व्यासपीठ उपलब्ध करुन देण्याची भूमिका घेत वस्तुसंग्रहालय त्यांना सहकार्य करतं.

 

जानेवारीची आवृत्ती

१६ आणि १७ जानेवारी २०१५ रोजी, वस्तुसंग्रहालयात आयोजित करण्यात आलेल्या भव्य सोहळ्यात, ह्या भागीदारीचा शुभारंभ झाला. हा उत्सव म्हणजे विविध कलाप्रकारांना एकत्रित गुंफणारं संमेलन ठरलं. या बालमहोत्सवात प्रतिष्ठीत कलाकार अतुल दोडिया यांच्या प्रदर्शनातून प्रेरीत होऊन ‘माझे वस्तुसंग्रहालय’, नर्तक आणि कथाकथानात कुशल मीराबेल डी. कुन्हा यांच्या ‘गजपती कुलपती’चं वाचन, केटी बगली यांच्यासोबत वीरमाता जिजाबाई उद्यानाचा धावता दौरा आणि ‘धरा की कहानी’ ही कोणतीही गोष्ट फेकून न देता त्याचा पुर्नवापर करुन भूमातेच्या समृद्धतेचं जतन कसं करता येईल, हे सांगणारी नाटुकली पेश करण्यात आली. दोन दिवसांत साधारण १५०० लोकांनी ह्या सोहळ्यात आपली उपस्थिती नोंदवली.


एप्रिलची आवृत्ती

२६ एप्रिल २०१५ रोजी संग्रहालयानी ‘छोटी कहानी कार्निवल’चं आयोजन केलं. ह्यात कथाकथन आणि नाटुकल्यांसोबतच विविध प्रकारच्या कार्यशाळा आयोजित केल्या. “विंडोज्” नामक कार्यशाळेत एक कोलाज सहभागी बालचमुनं तयार केलं, जे आज वस्तुसंग्रहालयातील कॅफेच्या भिंतीची शोभा वाढवतंय. लहान मुलांच्या कल्पनाशक्तीला धुमारे फुटण्याची संधी देणाऱ्या उपक्रमांचा या एकदिवसीय महोत्सवात समावेश केला गेला.

 

नोव्हेंबरची आवृत्ती

कहानी कार्निवलचं तिसरं संस्करण “भाषा” ह्या विषयाला समर्पित केलं गेलं. २८ आणि २९ नोव्हेंबर रोजी, वस्तुसंग्रहालयातील प्लाझाला कथाकथन, नृत्य, संगीत आणि इतर कलांच्या सुगंधानं भारावलेल्या आनंदोत्सवात रुपांतरीत केलं गेलं. भारतातील विविध भाषांचा परिचय करुन देणाऱ्या कार्यशाळा, लेखकांचं वाचन, आपल्या भवताली विखुरलेल्या विविध वस्तुंतून आशयघन कथा बनवणं आणि त्यांचं सादरीकरण करणं, कठपुतल्या बनवणं, विनोदी चित्रमाला बनवणं, बागकाम आणि इतर अनेक विषयांना सामावून घेत विविध उपक्रम राबवले गेले. यात ५००हून अधिक बालक आपल्या पालकांसमवेत सहभागी झाले.

 

अधिक माहितीसाठी

संपर्क साधा education@bdlmuseum.org वर

 
   

व्याख्यानमाला

विशेष व्याख्यानांचं आयोजन

वस्तुसंग्रहालय सगळ्यांसाठी दर शनिवारी खुल्या व्याख्यानमालेचं आयोजन करतं. ह्या व्याख्यानमालेत वस्तुसंग्रहालयाच्या पदविका अभ्यासक्रमात अध्यापन करणारे भारतभरातून येणारे प्रथितयश कलाइतिहासतज्ज्ञ, संशोधक, कलानिर्मिती प्रक्रियेत सहभागी होणारे अभ्यासक आणि व्याख्यात्यांना आमंत्रित केलं जातं. ह्या व्याख्यानमालेत विविध कला तसंच सांस्कृतिक प्रश्नांचा समीक्षकाच्या नजरेतून अभ्यासपूर्ण विचार मांडला जातो. ह्या वर्षी वस्तुसंग्रहालयानं नामांकित कलाअभ्यासक शुक्ला सावंत यांना शांतीनिकेतनमधील कलावंतानी केलेलं निसर्गचित्रण, प्रा. पारुल दवे-मुखर्जी यांना कलाकार, समाजाचा शास्त्रीय अभ्यास आणि पुरातन दस्ताऐवज, यांचा परस्परबंध या विषयावर आणि प्रा. ज्योतिन्द्र जैन यांना देवी आणि देवीचं दृष्य प्रतिमांकन या विषयावरिल तौलनिक विचार मांडण्यासाठी आमंत्रित केलं गेलं.

वस्तुसंग्रहालय अनेक आंतरराष्ट्रीय स्तरावर नावाजलेल्या विद्वानांना सर्वांसाठी खुलं व्याख्यान देण्यासाठी आमंत्रित करतं. इथिओपियास्थित पर्यावरणाविषयीचा सखोल विचार मांडणाऱ्या मानववंशशास्त्रज्ञ, प्रदर्शन संकल्पक आणि लेखक मेस्केरेम अस्सेगुएद यांनी जागतिक स्तरावर समकालीन कला आणि मानववंशशास्त्राच्या आधाराने आफ्रिकन कलेचे प्रदर्शन संकल्पित करताना आपल्याला आलेले अनुभव सांगितले. अस्सेगुएद हया झोमा कन्टेम्पररी आर्ट सेंटरच्या संस्थापक असून ही आर्टिस्ट रेसिडन्सी, इथिओपियातील अदिस अबाबा आणि हार्ला या डायर डावाच्या दक्षिणेकडील छोट्या गावात आयोजित केली जाते. याशिवाय आम्ही ब्रिटीश म्युझियमचे डॉ. इरविंग फिन्केल ह्यांना भारतात खेळल्या जाणाऱ्या बोर्ड गेम्सचा अर्थातच पटलावर खेळल्या जाणाऱ्या खेळांचा इतिहास आणि नॉर्थ आयर्लंडमधील सीसीए डेरी-लॉंडॉन्डेरीचे संस्थापक मॅट पॅकर यांना समकालीन अभिरक्षकाचा अभ्यास या विषया संदर्भातील आपले विचार मांडण्यासाठी आमंत्रित केलं.

   

सगळ्यांसाठी खुला वस्तुसंग्रहालयाचा दौरा

प्रौढ शिक्षण

वस्तुसंग्रहालयाचा मोफत अभ्यास दौरा आमच्या अभिरक्षक समितीच्या सदस्यांच्या मार्गदर्शनाखाली दर आठवड्याच्या अखेरीस, शनिवारी आणि रविवारी आयोजित करण्यात येतो. हे दौरे वस्तुसंग्रहालयाला भेट देणाऱ्या विविध पार्श्र्वभूमीतून आलेल्या सर्व वयोगटांच्या आणि आवडी-निवडी असलेल्या जनतेला, आमच्या संग्रहाची माहिती, त्याचा इतिहास, स्थापत्यशास्त्र आणि समकालीन कलाप्रदर्शनांशी ओळख करुन देतात. यासाठी पूर्वनोंदणीची आवश्यकता नाही. शनिवारी आणि रविवारी आयोजित केले जाणारे हे दौरे इंग्रजी, मराठी आणि हिंदी भाषेतून आयोजित केले जातात.


वस्तुसंग्रहालयाची ओळख करुन देणाऱ्या या मोफत अभ्यासदौऱ्यांबरोबरच खाजगी गटांसाठीही आगाऊ नोंदणी केल्यास, नोंदणीशुल्क भरुन विषयानुरुप माहिती दौऱ्यांचं ओयोजन आम्ही करतो. आमचे मुंबईचा इतिहास, विकास आणि सांस्कृतिक वारस्याची सखोल माहिती सांगणारे दौरे विषेश प्रचलित आहेत. विविध गटांसाठी अस्थायी प्रदर्शनांचे संवादस्वरुपात घेतले जाणारे माहिती दौरेसुद्धा आयोजित करु शकतात.


अधिक माहितीसाठी

वस्तुसंग्रहालय महिन्यातून एकदा तरुण कुशल व्यावसायिकांना प्रौढ शिक्षण कार्यशाळा घेण्यासाठी आमंत्रित करतं. सहभागी सदस्यांना आपल्या कुशलतेनुसार नव्यानं ओळख झालेल्या कलेला, प्रयोगात्मक प्रतिसाद देण्याचा फायदा होतो. याशिवाय वस्तुसंग्रहालयातून ते प्रेरित होऊन बाहेर पडतात. गेल्या वर्षी आयोजित केलेल्या, कॉमिक्स अर्थातच मनोरंजक चित्रं बनवणं, शॅडो बॉक्स बनवणं, मातीकाम आणि कुंभारकाम, सुलेखन आणि व्यंगचित्रं रेखाटनाच्या कार्यशाळांना उत्तम प्रतिसाद मिळाला. व्यावसायिक छायाचित्रकारांसोबत वारस्याची ओळख करुन देणारे अभ्यास दौरे छायाचित्रण कलेला प्राधान्य देतही आम्ही आयोजित केले.


अधिक माहितीसाठी

     
 
 

नवयुवकांसाठी कार्यशाळा

कुमारांसाठी कार्यशाळा

विशेष उपक्रम

 
 

वस्तुसंग्रहालयातील ठेव्याची, इतिहासाची आणि प्रदर्शनांची महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना आणि नवयुवकांना ओळख व्हावी या हेतूनी, त्यांना कलादालनांचे दौरे आणि कार्यशाळांसाठी आमंत्रित केलं. डॉ. भाऊ दाजी लाड वस्तुसंग्रहालयाने आयोजित केलेल्या उपक्रमांना प्राधान्य देत, मुंबईचा इतिहास आणि ऐतिहासिक वारसा उलगडणारी सत्रं, सजावट कौशल्यावर आधारीत परंपरा आणि समकालीन कलासाधनेची सत्रं विशेष लोकप्रिय ठरली.


अधिक माहितीसाठी

वस्तुसंग्रहालयाने कुमारांसाठी अनेक शाळा आणि स्वयंसेवी संस्थांसोबत विविध संवादात्मक दौरे आणि चर्चार्सत्रं आयोजित केली. आमच्या संग्रहाला केंद्रस्थानी ठेवून सृजनात्मक उपक्रम राबविले गेले. चांदीवरील नक्षीकाम, कुंभारकाम, स्मृती आणि संलग्न स्थानं, रागमाला चित्रं आणि कठपुतल्या बनवण्याचे प्रशिक्षण देणाऱ्या कार्यशाळांचं विशेष कौतुक झालं.


अधिक माहितीसाठी

वस्तुसंग्रहालय विद्यार्थ्यांना समीक्षकाच्या नजरेतून पाहण्याची आणि कल्पकतेनी प्रतिसाद देण्याची संधी बहाल करतं. समकालीन कलाप्रदर्शनांचा आस्वाद घेण्यासाठी कलादालनांचे दौरे तसंच कार्यशाळांचं आयोजन केलं जातं. यासोबतच खास तयार करण्यात आलेल्या वर्कशीटस् विद्यार्थ्यांना दिल्या जातात. हे शैक्षणिक उपक्रम विभिन्न समुहाला नजरेसमोर ठेवून आखले जातात. यात कार्यशाळेत सहभागी होणाऱ्या विद्यार्थ्यांना इंग्रजी, हिंदी आणि मराठी भाषेतील वर्कशीटस् वितरीत केल्या जातात.


अधिक माहितीसाठी

   
 
 

वस्तुसंग्रहालयात उन्हाळयाची लज्जत

खेळांची जत्रा

डायेन फेरलात्ते यांचं संवादात्मक कथाकथन

 
 

मे महिन्यातील प्रत्येक आठवड्याच्या अखेरीस वस्तुसंग्रहालयाचा शैक्षणिक विभाग संपूर्ण कुटुंबाकरीता रोमांचकारी उपक्रम राबवितो. ह्यामध्ये मुलांना संग्रहालयात भरवण्यात आलेली प्रदर्शने, मैदानी खेळ, ऐतिहासिक वारसास्थळांचा दौरा आणि संवर्धन, बोलक्या बाहुल्या, मातीकाम, नकाशे आणि देखावे बनविण्याची संधी उपलब्ध करुन दिली गेली.


अधिक माहिती जाणण्यासाठी संपर्क साधा: education@bdlmuseum.org
022-23731234


अधिक माहितीसाठी

2 आणि 30 मे रोजी, ‘खेळ जे लोक खेळतात’ या ठुकराल आणि टागरा या कलाकारांच्या प्रदर्शनावर आधारीत खेळांची जत्रा वस्तुसंग्रहालयाने आयोजित केली. भेट देणाऱ्यांनी ठुकराल आणि टागरा यांनी संकल्पिलेल्या खेळांत, वॉक ऑफ लाईफ, वर्बल कबड्डी आणि अनोख्या टेबल टेनिसच्या खेळात आपला सहभाग नोंदवला. त्यादिवशी वस्तुसंग्रहालयाच्या प्लाझाचं रुपांतर खेळाच्या मैदानात झालं होतं. वस्तुसंग्रहालयाच्या ठेव्यात प्रदर्शित करण्यात आलेले पारंपारिक मैदानी तसंच घरात खेळता येण्यासारखे खेळ खेळले गेले. भव्य आकारची सापशिडीसोबतही मुलं मनसोक्त खेळली.

वस्तुसंग्रहालयाने ८ संप्टेंबर २०१५ रोजी, 2008 साली ग्रॅमी पुरस्काराचं मानांकन प्राप्त झालेल्या आंतरराष्ट्रीय ख्यातीच्या डायेन फेरलात्ते, यांच्या संवादात्मक कथाकथनाचा कार्यक्रम आयोजित केला. फेरलात्ते यांना वाटतं की इतरांना गोष्टी सांगणे आणि त्यांच्या गोष्टी ऐकणे, ह्यातून केवळ परस्परांकडून शिकण्याची सोयच होत नाही तर एकमेकांना समजून घेण्याची संधीही मिळते. ह्या कार्यक्रमास १०० हून अधिक समविचारी कुमारवयीन मुलं तसंच प्रौढांनी हजेरी लावली.

 

 
   

लहानग्यांसाठी चित्रपट महोत्सव

विव्हींग टेलस् अर्थातच गुंफलेल्या गोष्टी

जुलै महिन्यापासून प्रत्येक महिन्याच्या एका रविवारी खास लहानग्यांसाठी चित्रपटांचं प्रदर्शन केलं जातं. या चित्रपट महोत्सवात बालक तसंच त्यांच्या पालकांना खिळवून ठेवणाऱ्या जगभरातील कथा नाट्यरुपात वा अॅनिमेशनच्या माध्यमातून दाखवल्या जातात. कॅनडा वकीलातीच्या संयुक्त विद्यमाने हे चित्रपट दाखवले जातात.


अधिक माहिती जाणण्यासाठी संपर्क साधा: education@bdlmuseum.org
022-23731234

३० ऑगस्ट २०१५ रोजी मुलांनी वस्तुसंग्रहालयामध्ये प्रदर्शित केलेल्या कलावस्तू, नकाशे आणि प्रदर्शित केलेल्या देखाव्यांच्या माध्यमातून, शहराच्या इतिहासाचा शोध घेतला. त्यांनी त्यांच्या व्यक्तिरेखा बनवल्या, प्रसंग, ठिकाणं आणि इतर गोष्टी त्याअनुषंगाने निवडल्या आणि हे सारं एकत्रित करुन एकमेवाद्वितीय ऐतिहासिक कल्पनारम्य कथा गुंफली. हा उपक्रम तीन महिन्यांतून एकदा ‘रायटरर्स बग’ ह्यांच्या सहकार्याने आयोजिला केला जातो.

अधिक माहिती जाणण्यासाठी संपर्क साधा: education@bdlmuseum.org

   
 

 

“मी खूप दिवसांपासून डॉ. भाऊ दाजी लाड वस्तुसंग्रहालयाला भेट देण्याचं ठरवत होते. मला खूप आनंद होतोय की अखेरीस माझं येणं झालं. माझ्या अपेक्षांना, इथं येण्याच्या आणि वस्तुसंग्रहालयाविषयी अधिक जाणण्याच्या उत्कटतेला हे निश्चितच पात्र ठरलं.”


रत्ना पाठक शहा, अभिनेत्री

 

   
   विविध माध्यमांतून समाजाला वस्तुसंग्रहालयाशी जोडणारे उपक्रम  

 

मुव्हीज् अॅट द म्युझियम अर्थातच वस्तुसंग्रहालयात चित्रपटांचं प्रदर्शन

वस्तुसंग्रहालय चित्रपटांच्या प्रदर्शनाचा सशक्त उपक्रम आपल्या शैक्षणिक केंद्रात राबवितं. ३ एप्रिल २०१५ रोजी प्रारंभ झालेला ह्या उपक्रमात, 'मुव्हीज् अॅट द म्युझियम' या शीर्षकाअंतर्गत महिन्यातून एकदा चित्रपटाचे प्रदर्शन आयोजित केलं जोतं. हा उपक्रम दिग्दर्शक व सिनेमॅटोग्राफर मुकुल किशोर आणि वास्तुविशारद व शहर रचनाकार रोहन शिवकुमार यांच्या संकल्पनेतून साकार झाला आहे. विभिन्न शैलीतील माहितीपर, कल्पनारम्य, अॅनिमेशन आणि दृष्य कलेवर आधारित आशयघन चित्रपट आणि व्हिडिओज् चा समावेश यात करण्यात येतो. या उपक्रमाअंतर्गत, चित्रपटाच्या वा त्यात हाताळल्या गेलेल्या विषयाच्या अनुषंगाने चित्रपट, कला तसंच शैक्षणिक क्षेत्रातील तज्ज्ञांना वेळोवेळी आमंत्रित करुन त्याविषयी चित्रपट प्रदर्शनानंतर चर्चा होते. हे चित्रपट प्रदर्शन सगळ्यांसाठी खुलं आणि विनामुल्य असतं.


दादासाहेब फाळकेंना मुजरा करत या प्रदर्शन मालिकेचा प्रारंभ झाला. दादासाहेब फाळके यांनी दिग्दर्शित केलेल्या लघुपटाच्या प्रदर्शनानंतर, कमल स्वरूप यांची ‘रंगभूमी’ ही दादासाहेब फाळके ह्यांच्यावर बेतलेली फिल्म दाखवण्यात आली. श्री. स्वरूप यांनी दोन्ही चित्रपटांचा परिचय करून दिला आणि चित्रपट प्रदर्शनानंतर झालेल्या चर्चेत सहभाग घेतला. २०० प्रेक्षकांनी हया कार्यक्रमात आपली उपस्थिति नोंदवली.


१ मे या महाराष्ट्र दिनी, वस्तुसंग्रहालयामध्ये व्हि. शांताराम दिग्दर्शित दोन चित्रपटांचे प्रदर्शन करण्यात आलं. चित्रपट इतिहास अभ्यासक प्रा. सुरेश छाब्रिया यांनी या चित्रपटाविषयी संवाद साधला. त्याशिवाय या उपक्रमाअंतर्गत जे चित्रपट दाखवले गेले आणि ज्यांनी या चित्रपटाविषयी संवाद साधला, ते याप्रमाणे : 'ऑलिंपिया' - लेनी रैफ़ेन्स्थल आणि जॉर्ज जोस, 1963-2012 या काळातला महत्वपूर्ण सिनेमा 'अज्ञात प्रदेश' - अशीम अहलुवालिया, होमी वाडिया यांचा 'डायमंड क्वीन' - परोमिता व्होरा, पासोलिनी आणि लुई माले यांचा 'नोटस फॉर अ फिल्म ऑन इंडिया' आणि 'फॅंटम इंडिया' - गिरीश शहाणे. ह्या चित्रपट प्रदर्शनाच्या कार्यक्रमाला प्रेक्षकांकडून उत्तम प्रतिसाद लाभत असून प्रत्येक स्क्रीनींगला सरासरी ८० प्रेक्षक उपस्थित असतात.

     
 
 

मुंबई गॅलरी वीकएन्ड अर्थातच मुंबईतील कलादालनांना भेट

फोकस फोटोग्राफी फेस्टिवल

परिसंवाद

 
 

14 ते 18 जानेवारीमध्ये आयोजित मुंबई गॅलरी वीकएन्डदरम्यान वस्तुसंग्रहालयाने कलावंत अतुल दोडिया यांच्या '७००० वस्तुसंग्रहालये' या प्रदर्शनाच्या निमित्ताने एका विशेष कार्यक्रमाचे आयोजन केलं. कलाक्षेत्रातील मान्यवरांना अतुल दोडिया यांनी आपल्या कलाकृतींची ओळख आणि कलानिर्मितीची प्रक्रिया संग्रहालयातील कलादालनांत नेऊन करुन दिली. वस्तुसंग्रहालयाच्या संचालिका श्रीमती मेहता यांनी दोडिया यांच्याशी यानंतर संवाद साधला.

2015 साली आयोजित करण्यात आलेल्या ‘फोकस फोटोग्राफी फेस्टीवल’ला छायाचित्रांच्या प्रदर्शनाकरिता वस्तुसंग्रहालयानी आपली जागा उपलब्ध करुन दिली. ‘कॉल फॉर एन्ट्रीज्’ अर्थातच सहभागासाठी आमंत्रित करणारा हा छायाचित्रांचा महोत्सव १२ मार्च ते १० एप्रिल २०१५ या कालावधीत वस्तुसंग्रहालयच्या प्लाझामध्ये आयोजित करण्यात आला. 126 आंतरराष्ट्रीय स्तरावरिल प्रस्तुतींमधून, 'क्रॉसओवर्स' या प्रदर्शनासाठी २० छायाचित्रकारांची परीक्षकांनी निवड केली. फोकसच्या समिती सदस्यांनी तंत्रज्ञांच्या साहाय्याने संकल्पित केलेल्या विशेष मांडणीत १०० छायाचित्रांच्या प्रिंट्स प्रदर्शित केल्या गेल्या. प्रदर्शनाची संकल्पना आणि मांडणी या विषयावर प्रदर्शनाला भेट देणाऱ्यांसाठी दौरे आणि चर्चासत्रे आयोजित करण्यात आली.

वस्तुसंग्रहालयाने ‘व्हू फ्रॉम द बोट’ अर्थातच ‘नावेवरून दिसणारा देखावा’ या शीर्षकाअंतर्गत शैक्षणिक परिसंवादाचं आयोजन, ‘कॅम्प’ या कलाकारांच्या गटाने केलेल्या सागरी दुनियेच्या ‘अॅज इफ - कन्ट्री ऑफ द सी’ या अभ्यासपूर्ण प्रदर्शनाच्या प्रेरणेतून आयोजित केलं. या परिसंवादात भारत आणि यु.के.मधील नामांकित कलाइतिहासतज्ज्ञ आणि विद्वानांनी आपला सहभाग नोंदवला. 22 फेब्रुवारी ते 7 एप्रिल 2015 दरम्यान या प्रदर्शनाचं आयोजन करण्यात आलं.

 
   
 
 

कुमाऱ सहानी यांचा वारसा

आंतरराष्ट्रीय बालिका दिन

जागतिक वारसा दिनाचा समारंभ

 
 

कुमार सहानी यांच्या गेल्या काही वर्षांत मुंबईत दाखवल्या न गेलेल्या चित्रपटांचं प्रदर्शन आणि सहानी यांच्या 'द शॉक ऑफ डीझायर आणि अदर एसेज' ह्या पुस्तकाचे अनावरण ५ डिसेंबर २०१५ रोजी वस्तुसंग्रहालयामध्ये करण्यात आलं. ह्या एकदिवसीय कार्यक्रमाअंतर्गत सहानी यांचे तरंग, माया दर्पण आणि खयाल गाथा हे चित्रपट दाखविण्यात आले. चित्रपट प्रदर्शनानंतर आयोजित करण्यात आलेल्या परीसंवादात आशिष राजाध्यक्ष, रजत कपूर, अरुण खोपकर आणि प्रभा महाजन यांनी प्रेक्षकांशी संवाद साधला.


'द शॉक ऑफ डीझायर अँड अदर एसेज्' ह्या पुस्तकाचे अनावरण तस्नीम झकारिया मेहता, अरुण खोपकर, आशिष राजाध्यक्ष यांच्या शुभहस्ते झालं. याप्रसंगी कुमार सहानी स्काईपच्या माध्यमातून कार्यक्रमास उपस्थित राहिले. या एकदिवसीय कार्यक्रमाला २०० प्रेक्षकांनी हजेरी लावली.

११ ऑक्टोबर २०१५ रोजी, वस्तुसंग्रहालयामध्ये आंतरराष्ट्रीय बालिका दिनाच्या निमित्ताने दोन विशेष चित्रपटांचं प्रदर्शन आयोजित करण्यात आलं. जुआनिता पीटर्स यांची 'हॅनाज् स्टोरी अर्थातच हॅनाची गोष्ट' ही ११ वर्षाच्या मुलीच्या, प्रसंगी थोरांनाही अचंबित करणाऱ्या आणि बदल घडवून आणण्याची प्रेरणा जागवणाऱ्या, ‘सर्व काही शक्य आहे’ या दृढविश्वासाची गोष्ट आहे. यानंतर पियर-लुक ग्रॅनियो यांचा ‘मॉली इन स्प्रिंगटाइम’ हा अॅनिमेशनपट दाखवण्यात आला. कॅनडाच्या वकीलातीच्या सहकार्याने हे चित्रपट प्रदर्शन आयोजित करण्यात आले.

जागतिक वारसा दिनानिमित्त १८ एप्रिल २०१५ रोजी, पूर्वाश्रमीचे व्हिक्टेरिया टर्मिनस आणि आताचे छत्रपती शिवाजी टर्मिनस, ह्या जागतिक वारसा स्थळाचा दर्जा लाभलेल्या वास्तुचा माहिती दौरा सुपरिचित संवर्धन स्खापत्यकार आणि इन्टॅकच्या बृह्न्मुंबई विभागाचे सहाय्यक संवर्धक विकास दिलावरी यांच्या सहकार्याने संपन्न झाला. मुंबईतील 19 व्या शतकाची ओळख बनलेल्या या अद्वितीय वास्तुचा नमुना, पुनरुज्जीवीत केलेल्या गॉथिक शैलीचा पारंपारिक भारतीय स्थापत्यशैलीशी घातलेला मेळ अधोरेखित करतो. दौऱ्याची अखेर छत्रपती शिवाजी टर्मिनसचा इतिहास सांगणाऱ्या रेल्वेच्या संग्रहालयाला भेट देऊन झाली. ह्या दौऱ्याचं आयोजन इन्टॅक बृहन्मुंबईच्या प्रभागाने केलं होतं.

 

 
   

प्रदर्शन आणि त्यावर आधारीत चर्चासत्र

प्रतिष्ठापित कलाकृती मोकळी कशी करावी याविषयावरील कार्यशाळा

ब्रिटिश समकालीन कलेवर आधारित असलेला 'टेट शॉट्स्' हा लघुपट 3 सप्टेंबर 2015 रोजी वस्तुसंग्रहालयात दाखवण्यात आला आणि त्यावर चर्चासत्र आयोजित केलं गेलं. हा लघुपट दाखविण्याआधी वस्तुसंग्रहालायाच्या संचालिका श्रीमती मेहता आणि ब्रिटिश कौन्सिलच्या पश्चिम भारत विभागाच्या संचालिका शेरॉन मेमिस यांनी सुप्रसिद्ध कलाकार ज्युलियन ओपी यांच्या वस्तुसंग्रहालयात आयोजित करण्यात आलेल्या ‘विंटर’ अर्थातच हिवाळा, या प्रदर्शानासंदर्भात संवाद साधला.

डेव्हीड गर्नेट, ब्रिटिश कौन्सिलचे दृष्यकला कार्यशाळा आयोजित करणाऱ्या विभागाचे उपव्यवस्थापक, यांनी कलाकृतीची प्रतिष्ठापना आणि ती प्रदर्शित केल्यानंतर कलाकृती मोकळी करुन पाठवण्याची प्रक्रिया, या विषयावर एक अनौपचारिक सत्र घेतले. त्यांनी प्रदर्शनाची संकल्पना, प्रदर्शनाची मांडणी आणि मांडणीपूर्व तयारी, त्यासाठी आवश्यक पूर्वनियोजन आणि कलाकृतीची योग्य ती काळजी घेण्याच्या दृष्टीने आवश्यक देखभाल, याविषयीवर विस्तृत माहिती दिली. हया सत्राकरिता शहरातून अनेक अभिरक्षक, कलादालनांचे प्रमुख आणि विद्यार्थी उपस्थित होते.

   

भायखळ्यातील वारस्याचा माहिती दौरा

भुलेश्वरचा ऐतिहासिक वारसा सांगणारा माहिती दौरा

इन्टॅकच्या सहाय्याने नियमितपणे आपल्या वारसास्थळांना भेट देणारे अभ्यासपूर्ण माहिती दौरे आयोजित केले जातात. ऐतिहासिक वारसा तज्ज्ञ अलिशा सदिकोट यांनी ‘भायखळ्यातील शेजार’ ह्या दौऱ्यात सहभागी समुदायाला मार्गदर्शन केलं. उपस्थितांनी मुंबईच्या इतिहासातील सात बेटापैकी एक असं माझगांव बेट आणि त्याचे ऐतिहासिक महत्व जाणून घेतलं. या परिसरात आकाराला आलेले स्थापत्यकलाशास्त्रातील विविध प्रवाह, इथं स्थायिक झालेल्या विविध जमाती आणि त्यांचा परस्परांतील सलोखा, डेव्हिड ससून यांचे जुने घर आणि दिमाखात उभे असलेले पूर्वाश्रमीचे व्हिक्टोरिया आणि अल्बर्ट वस्तुसंग्रहालय आणि आताचे डॉ भाऊ दाजी लाड वस्तुसंग्रहालय, यांना भेट दिली.

स्थापत्यकार आणि शहर अभ्यासक कैवान मेहता यांनी मुंबईतील भुलेश्वर भागातील सांस्कृतिक आणि स्थापत्यशास्त्रीय वारसा माहिती दौऱ्यात सहभागी झालेल्यांसमोर पेश केला. कैवान मेहता यांचा या विषयावरिल सखोल अभ्यास ‘एलिस इन भुलेश्वर’मध्ये सामावला आहे. ते इथल्या मुळ गावाविषयी आणि आज या भागात निर्माण झालेल्या असुरक्षित गुंतागुंतीविषयीसुद्धा बोलले. हा माहिती दौरा इन्टॅकने आयोजिक केला होता.

     

 

“ही जागा तर नेत्रदीपक आहेच, शिवाय इथला संग्रहसुद्धा बॉम्बेमधील, भारतातील आणि जगभरातील लोकांना जाणण्याची अभुतपूर्व संधी बहाल करतो, शहराच्या ऐतिहासिक वारस्यालाही स्पर्श करतो. मी प्रचंड प्रमाणात विविध सामाजिक वर्गांतून येणाऱ्या आणि वस्तुसंग्रहालयाला भेट देण्याऱ्या, तसंच इथल्या कलावस्तु पाहताना रंगून जाणाऱ्या जनतेला पाहून अचंबित झाले. त्यांच्या चेहऱ्यावरील समाधान भावनेचं मनापासून कौतुक ! ही जागा लोकांना कलेच्या संपर्कात कसं आणायचं, याचे धडे आम्हाला देणारी मार्गदर्शक जागा ठरली आहे. वस्तुसंग्रहालयाच्या अत्योत्कृष्ट अभ्यासपूर्ण माहिती दौऱ्यासाठी मी आपली आभारी आहे.”


माया कोस्काया, कला समीक्षक आणि प्रदर्शन संकल्पक

 

   
 


‘फ्रेंडस् ऑफ द म्युझियम’ अर्थातच वस्तुसंग्रहालयाचे मित्र

वस्तुसंग्रहाला ‘फ्रेंडस् ऑफ द म्युझियम’ अर्थातच वस्तुसंग्रहालयाचे मित्र हा कार्यक्रम जाहीर करताना अतिशय आनंद होतोय. हा उपक्रम शहाराच्या कला आणि सांस्कृतिक इतिहासाशी जुळलेले ऋणानुबंध दृढ करण्याचा प्रयत्न आहे. ह्या उपक्रमाअंतर्गत वैयक्तिक, कौटुंबिक आणि संस्थात्मक सदस्यत्वाचा पर्याय उपलब्ध करुन देण्यात येतो. सदस्यत्वाच्या वर्गवारीनुसार विविध सुविधा आणि संधी सदस्य़ांना बहाल केली जाते. ह्या उपक्रमाच्या माध्यमातून इच्छुक जनतेला आपली समृद्ध सांस्कृतिक नाळ, वस्तुसंग्रहालयाचं आणि पर्यायानं वस्तुसंग्रहालय राबवत असलेल्या उपक्रमांचं समर्थन करत समाजाशी जोडता येईल. याशिवाय शहरात रुजलेल्या सांस्कृतिक धारणेचं पुनरुज्जीवन करता येईल.

 

अधिक माहितीसाठी

 
     

 

“मी अतिशय आभारी आहे आणि हया वस्तूसंग्रहालयाला आधी भेट द्यायची राहूनच कशी गेली या विचारानं अचंबित आहे, नाराज आहे. मला वस्तुसंग्रहालयाला पुन्हा भेट द्यायला जरुर आवडेल. अनंत आभार”


नसुरुद्दीन शाह, अभिनेता

 

   
   
 

वस्तुसंग्रहालयाचं विक्रीकेंद्र

वस्तुसंग्रहालयाच्या विक्री केंद्रात नव्यानं दाखल झालेल्या वस्तूंची विस्तृत श्रेणी पहायला मिळते. ज्यात विविध कलाकारांवरील पुस्तकं, 19 व्या शतकातील नैमित्तिक जीवनाचा घटक असणारे विविध व्यावसायिक, रामोशी, आया वा प्रसिध्द मच्छीवाले अर्थात कोळी यांच्या चित्रांनी सजलेल्या नोंदवह्या, जुन्या वस्तुंची जाहिरात करणारे पोस्टकार्डस् यांचा समावेश आहे. नाजुक आणि सुंदर कलाकुसर केलेली गणेशाची तांब्याची मूर्ती घरच्या देव्हाऱयात, टेबलावर किंवा मित्रपरिवाराला भेट देण्यास उत्तम आहे. राष्ट्रीय पुरस्कारानी सन्मानित कुशल कारागीरांनी घडवलेल्या देव-देवतांच्या अतिशय नक्षीदार सुबक मुर्ती, धातुंच्या ओतकामातील मेणाला धातुनं पुर्नस्थापित करण्याच्या पारंपारिक पद्धतीनं साकारलेल्या आहेत. आम्ही नव्यानं संकल्पित केलेल्या कलावस्तुसुद्धा विक्री केंद्रात दाखल झाल्या आहेत. वस्तुसंग्रहालयातील ठेव्यानं प्रेरित होऊन कागदावर वजन ठेवण्यासाठीचं घड्याळ, नोंदवही, फ्रीजवर लावायचं चुंबक, चहाचा कप ठेवण्यासाठीच्या प्लेटस्, टी-शर्टस् अशा अनेक उपयोजित कलावस्तु विक्रीकेंद्रात समाविष्ट करण्यात आल्या आहेत.

 

 

“वस्तुसंग्रहालयाची समाज शिक्षणविषयीची दृढ आस्था आणि राबविले जाणारे उपक्रम, अप्रतिम संग्रह, संकल्पित केली जाणारी प्रदर्शनं पाहून मी अतिशय भारावले आहे. या साऱ्यासाठी ही नितांतसुंदर जागा आहे!”

 

रीबेका मॅकगेनिस, द मेट्रोपोलिटन म्युझियम ऑफ मॉडर्न आर्ट, न्यूयॉर्क

 

     
 संवर्धन

 

तांब्याचे पदक, ‘१८६२, लंडनी हॉनरीस कॉसा’, वस्तुसंग्रहालयाच्या ठेव्यातून

२०१५ साली, संग्रहालयातील विविध कलावस्तु, दुर्मिळ पुस्तकं आणि चित्रांचं संवर्धन अतिशय काळजीनं वस्तुसंग्रहालयाच्या संवर्धन प्रयोगशाळेत केलं गेलं. १८६२ सालचं तांब्याचं पदक हे संवर्धन केल्या गेलेल्या कलावस्तुंत सर्वात महत्वपूर्ण ठरतं. कमालीच्या सुंदर सूक्ष्म उत्थित पद्धतीत घडवलेल्या तांब्याच्या गोलाकार पदकावरील प्रतिमांकन अतिशय मळकट आणि गडद गुलाबी रंगाच्या थरानी, धुळ तसंच अनेकदा हाताळल्यामुळे पडलेल्या हाताच्या ठस्यांमुळे, पर्यावरणातील विविध वायुंमुळे अत्यवस्थ आणि विद्रुप झालं होतं. याआधीही ह्या पदकाला त्याचं मुळचं संपन्नरुप बहाल करण्यासाठीचा प्रयत्न बाजारात उपलब्ध असलेल्या रासायनिक द्रव्यांचा वापर करुन अनेकदा केला गेला. मात्र त्यामुळे या द्रव्यांचे विविध थर ह्यातील खाचांमध्ये अडकले आणि त्यात नव्या हिरव्या थराची भर पडली.

 

प्रक्रिया: लिखित तसंच छायाचित्रणाच्या माध्यमातून नोंद करत संपूर्ण प्रक्रियेचे दस्तऐवज तयार करत, निर्माण झालेले अनावश्यक थर, विविध रसायनांच्या मिश्रणातून काढण्यात आले. सूक्ष्मदर्शकाखाली काळजीपूर्वक संवर्धन करत आणि मेडलच्या खाचांमधून एक एक थर अलग करत, आमच्या संवर्धकांनी या पदकाला त्याचं गतवैभव प्राप्त करुन दिलं. ह्यात या नाजुक धातूच्या पदकाला कोणतीही इजा होणार नाही वा त्याची हानी होणार नाही, याची संपूर्ण काळजी घेण्यात आली.

हे पदक मऊ नॉयलॉनच्या हेअर ब्रशनी आणि रासायनिक मिश्रणांनी स्वच्छ केले गेलं. अखेरीस धूळ, पर्यावरणातील हानिकारक वायू तसंच हाताळल्यानं होणाऱ्या हानीपासून संरक्षण मिळावे, म्हणून त्यावर एक संरक्षक लेप देण्यात आला.

 

 

 

बृहन्मुंबई महानगरपालिका द्वारा संचालित संस्था | जमनालाल बजाज प्रतिष्ठानच्या सहाय्याने | पुर्नस्थापना इन्टॅक

To ensure you receive our e-newsletter, make sure you add subscribe@bdlmuseum.org to your address book.

Design by: Radhika Chopra | Developed by: Pi Techniques